सामी : (सु. १७४३–१८५०). महान सिंधी संतकवी. त्यांचे पूर्ण नाव चैनराय बचूमल (वा मुरलीधर) दत्तारामाणी. ‘सामी’ या टोपणनावाने प्रसिद्घ. सिंधमधील शिकारपूर येथे लुंड जातीत सधन व्यापारी कुटुंबात जन्म. त्यांच्या जन्मवर्षाबाबत तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. तत्कालीन प्रथेनुसार त्यांचा अल्पवयातच विवाह झाला. ते कापडाचे व्यापारी व अडते होते. भाई गंगाराम टिंडिनमलाणी ह्या व्यापाऱ्याचे दलाल म्हणूनही ते काम पाहात. शिकारपूर आणि अमृतसर ही त्यांच्या व्यापाराची दोन मुख्य ठिकाणे होती व तेथे त्यांना व्यापारानिमित्त वारंवार जावे लागे. त्यांच्या कारकीर्दीच्या आरंभकाळातील कवने (श्लोक) त्यांनी शिकारपूरला रचली व उत्तरकाळातील काव्यरचना अमृतसरला केली. बालपणापासूनच त्यांना देवाधर्माची ओढ होती. व्यापार-व्यवसायात त्यांचे मन फारसे रमले नाही. आपल्या काव्याचा त्यांनी ‘खरा व्यापार’ ( सत्य वस्तू ) व ‘फायदेशीर व्यवहार’ अशा आलंकारिक शब्दांत निर्देश केला आहे. वयाच्या सु. तिसाव्या वर्षी त्यांची तत्कालीन विद्वान व वेदान्ती स्वामी मेंघराज यांच्याशी भेट झाली. ही घटना त्यांच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी देणारी, महत्त्वपूर्ण ठरली. त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे व प्रेरक सहवासामुळे सामी चैनराय वेदान्ती बनले. त्यांनी सु. दहा वर्षे मूळ संस्कृतमधून वेदांचे सखोल अध्ययन केले. या व्यासंगातूनच सामींनी आपल्या कवनांमधून वेदांची शिकवण मांडली. वेदान्तावर सिंधीमधून भाष्य केले. शंकराचार्यांचे अद्वैताचे तत्त्वज्ञान, निंबार्काचे द्वैताद्वैत वा भेदाभेद ह्या तत्त्वप्रणालींचा आविष्कार हा सामींच्या सिंधी श्लोकरचनांचा गाभा होता. वेद व पुराणे, षट्दर्शने, भगवद्गीता यांच्याप्रमाणेच सिंधी संतकाव्य, सूफी पंथाचे गूढवादी काव्य यांचाही प्रभाव सामींच्या कवनांमध्ये दिसून येतो. गुरुमुखी व देवनागरी लिप्याही त्यांना उत्तम रीत्या अवगत होत्या. वयाच्या सु. चाळिसाव्या वर्षी उच्च प्रतीची कवित्वशक्ती आत्मसात करून त्यांनी सिंधीमध्ये भावकाव्यात्म व गूढगुंजनपर कवने रचली. ही काव्यरचना त्यांनी आपले गुरु स्वामी (सिंधीमध्ये ‘सामी’) मेंघराज यांना अर्पण केली. त्यामुळे ‘सामी’ या टोपणनावाने चैनराय लोकप्रिय झाले. त्यांनी ही श्लोकरचना सिंधीमध्ये गुरुमुखी लिपीमध्ये केली. ते कागदाच्या तुकड्यां वर श्लोक लिहून ते तुकडे एका मोठ्या रांजणामध्ये साठवून ठेवत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र घनश्यामदास याने हे श्लोक संकलित केले. पुढे सिंधी गद्याचे जनक कौरोमल खिलनानी यांनी सामीआ जा स्लोक (३ खंड) या शीर्षकाने सामी यांनी शिकारपूर येथील वास्तव्यात लिहिलेले एकूण २,१०० श्लोक संपादित व प्रकाशित केले (१८८५–९०). त्याला संपादकीय प्रस्तावनाही लिहिली. तसेच दयाराम गिदुमल यांनी सामींच्या वेदान्ती शिकवणुकीचा सारांश एका लेखात लिहून तो लेख या संकलनात समाविष्ट केला. या खंडांच्या शेवटी श्लोक्रांतील कठीण शब्दांचा अर्थ देणारी परिभाषा-सूचीही जोडण्यात आली. सामीने अमृतसरमध्ये लिहिलेल्या श्लोकांचे संकलन-संपादनही यानंतर प्रकाशित झाले. पुढे गुरुमुखी, देवनागरी व इराणी-अरबी लिप्यांमध्येही सामींच्या श्लोकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्घ झाल्या. बी. एच्. नागराणी यांनी सामींच्या ३,५०० श्लोकांची संपादित आवृत्ती तीन खंडांमध्ये प्रकाशित केली ( खंड १–१९५५ खंड २–१९५८ व खंड ३–१९६७). त्याला एल्. एच्. अजवाणी यांची साहित्यिक प्रस्तावना आहे. ह्यात सामींच्या श्लोकांची विषयवार विभागणी केली आहे. उदा., माया, अविद्या, अज्ञान, गुरुमुख इ. विषयांनुसार श्लोक संकलित केले आहेत. तसेच अकारविल्हे दोन सूच्या दिल्या आहेत : पहिली शिकारपूर (सिंध) येथे लिहिलेल्या श्लोकांची व दुसरी अमृतसर (पंजाब) येथे लिहिलेल्या श्लोकांची. नागराणी यांची ही आवृत्ती प्रमाणभूत व अधिकृत मानली जाते. शांती एल्. सहानी यांनी सामींच्या निवडक श्लोकांचा इंग्रजी अनुवाद करून तो साँग्ज ऑफ द स्पिरिट (१९४७, म. शी. ‘आत्म्याची गीते’) या नावाने प्रसिद्घ केला.
सामी वेदान्ती असले, तरी सिंधमधील इतर सूफी पंथी गूढवादी कवींच्या परंपरेत ते चपखल बसतात. त्यांचे श्लोक शांत, गंभीर, प्रसन्न मनोवृत्तीचे निदर्शक आहेत. त्यांच्या आयुष्यकाळात सिंधमध्ये दोनदा राजकीय सत्ता-पालट झाला पण ह्या राजकीय घडामोडींचे वा सामाजिक बदलांचे, किंबहुना कोणत्याच भौतिक गोष्टींचे साद-पडसाद त्यांच्या काव्यात उमटलेले दिसत नाहीत. उत्कट कृष्णभक्ती व ब्रह्मसूत्रांमधील तत्त्वज्ञान यांचा मिलाफ त्यांच्या काव्यात आढळतो. आत्म्याचे परमात्म्याशी मीलन, अनेकत्वातून प्रतीत होणारे एकत्व अशा तात्त्विक संकल्पनांचा आविष्कार त्यात आढळतो. त्यांच्या काव्यातील प्रतिमा दैनंदिन जीवनात अवतीभवती आढळणाऱ्या गोष्टींच्या निरीक्षणातून येतात.उदा., कमल-भ्र मर, जल-मीन, शिंपा-मोती, सागर-गागर इत्यादी. मृगतृष्णा, सुहागिन ( पतिवता ), बेगमपूर ( दुःख नसलेले शहर ) ह्या अशाच काही लक्षणीय प्रतिमा. सामींची भाषा साधी, सोपी, सरळ (सरेली) व गोडव्याने युक्त शिकारपुरी बोलीत आहे. सिंधी ‘बैत’ ह्या पद्यात्म घाटात त्यांनी श्लोकरचना केल्या. दैवी प्रेम, तर्क-शुद्घता, प्रगाढ शांत भाव हे त्यांच्या काव्याचे विशेष होत. भावार्थ, गांभीर्य व माधुर्य यांची एकरूपता त्यात आढळते. संगीतमय नादयुक्त मधुर काव्य, असे त्याचे सार्थ वर्णन केले जाते. सिंधी भाषेतील वेदांचे भाष्यकार म्हणून सामी यांची प्रामुख्याने ख्याती आहे.
संदर्भ : 1. Advani, Kalyan, Sami, Bombay, 1953.
2. Lekhraj, Aziz, Sami, Bombay, 1965.
3. Sharma, Mohanlal, Sami, Delhi, 1972.
इनामदार, श्री. दे.