सामाजिक सर्वेक्षण पद्घति : एखाद्या लोकसमाजाविषयी अथवा त्यातील विवक्षित विभागाविषयी निरीक्षण करून अथवा व्यक्ती, संस्था इ. संबंधितांकडून शक्य तितकी परिमाणात्मक व आकडेवारीच्या स्वरूपात माहिती गोळा करणे, याला ‘सामाजिक सर्वेक्षण’म्हणतात आणि समाजजीवनाच्या अभ्यासाच्या या पद्घतीला ‘सामाजिक सर्वेक्षण पद्घती’ म्हणतात. स्थूलमानाने असे म्हणता येईल की, सामाजिक सर्वेक्षण म्हणजे समाजजीवनाचे विशिष्ट उद्दिष्ट मनात धरुन केलेले निरीक्षण. सर्वेक्षणाची उद्दिष्टे अनेक प्रकारची असू शकतात. उदा., सरकारला ग्रामीण विभागातील शेतमजुरांच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती हवी असते अथवा कामगार जीवनमानाचा निर्देशांक आधारण्याकरिता शहरी कामगारांच्या कौटुंबिक खर्चाचा तपशील हवा असतो. आपला माल कोणत्या स्तरातील गाहक घेतात आणि त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या यांविषयी माहिती घेणे कारखानदारांना इष्ट वाटते. सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना जनतेच्या आर्थिक व सामाजिक जीवनाचे यथार्थ स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे, याचा शोध घ्यावयाचा असतो आणि त्यात कोणते बदल कसकसे होत आहेत, याचा मागोवा घेणे आवश्यक वाटते. त्यांना आपल्या अभ्यासविषयासंबंधी सामान्य सिद्घांत बांधावयाचे असतात, बांधलेले सिद्घांत वस्तुस्थितीच्या निकषावर पडताळावयाचे असतात आणि सद्यःस्थितीच्या आधारे भविष्यकालाविषयी अंदाज करावयाचे असतात. या सर्वांसाठी सामाजिक व आर्थिक जीवनासंबंधी वास्तविक ज्ञान मिळविणे आवश्यक असते आणि हे ज्ञान सामाजिक सर्वेक्षण करूनच मिळविणे शक्य असते. सामाजिक शास्त्रांतील प्रश्न यथार्थपणे मांडण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी वस्तुस्थितीची माहिती न घेता केवळ तत्त्वमीमांसेवर विसंबून राहता येणार नाही हे उघड आहे.

सामाजिक शास्त्रांची वस्तुस्थिती जाणून घेण्याची पद्घती भौतिक विज्ञानांच्या पद्घतीहून एक प्रकारे अगदी निराळी आहे. भौतिक विज्ञानांत निरीक्षणाप्रमाणे प्रयोगालाही महत्त्वाचे स्थान आहे. [⟶प्रयोगांचा अभिकल्प]. भौतिकी व रसायनशास्त्र या प्रगत शास्त्रांची आधुनिक काळातील उभारणी बहुतांशी प्रयोगपद्घतीवर झालेली आहे. प्रयोग म्हणजे इतर सर्व कारके नियंत्रित करून एका (अथवा क्वचित एकाहून अधिक) विवक्षित कारकांच्या बदलामुळे घडणाऱ्या परिणामांचे निरीक्षण करता यावे, यासाठी मुद्दाम घडवून आणलेली घटना. समाजातील घटकाचे दैनंदिन जीवनातील व्यवहार हेच ज्यांचे अभ्यासविषय आहेत, त्या सामाजिक शास्त्रांत (काही अपवाद वगळता) या अभ्यासविषयांमुळेच प्रयोगपद्घतीला मर्यादा पडते. हवेच्या दाबासंबंधीचे शास्त्रसिद्घांत प्रयोगाने अभ्यासता येतात, परंतु कमाईत वाढ झाली तर कपडालत्त्याचा सर्व खर्च किती प्रमाणात वाढतो, याचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग कोण व कसे करू  शकेल ? या बाबतीत प्रयोगपद्घती उपयोगी पडणार नाही. पण वेगवेगळी कमाई असणारी कुटुंबे कपडालत्त्यावर किती खर्च करतात याची माहिती जमवून, म्हणजेच सर्वेक्षण पद्घतीने, या प्रश्नाचा अभ्यास करता येणे शक्य आहे. घडलेल्या घटनांची संगती लावणे, तदंतर्गत प्रक्रियांविषयी एखादी उपपत्ती अथवा प्रतिकृती योजून त्याच्या साहाय्याने भविष्याविषयी अंदाज घेणे, हेच इतर शास्त्रशाखांप्रमाणे समाजशास्त्रांचेही उद्दिष्ट आहे. येथे प्रयोगपद्घती शक्य नसल्याने घडून गेलेल्या किंवा घडत असलेल्या लोकव्यवहाराचे पद्घतशीरपणे निरीक्षण करणे आवश्यक होऊन बसते. म्हणून भौतिक विज्ञानात जे महत्त्व प्रयोगपद्घतीला आहे, तेच महत्त्व सामाजिक शास्त्रांत सर्वेक्षण पद्घतीला आहे.

सर्वेक्षणांचे प्रकार : सामाजिक सर्वेक्षणांचे विषय सामान्यपणे पाच प्रकारचे असतात (क्वचित एका सर्वेक्षणात अनेक प्रकारचे विषयही असतात) : (१) ⇨जनांकिकी सर्वेक्षणे : यामध्ये समाजातील घटकांविषयी (अथवा जनांविषयी) लिंग, वय, वैवाहिक स्थिती, धर्म, भाषा इ. माहिती मिळविण्याकरिता केलेली सर्वेक्षणे येतात. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना हीसुद्घा सर्वेक्षणच आहे. (२) राहणीविषयक सर्वेक्षणे : लोक कोठे राहतात, कसे राहतात, कोणता उद्योग अथवा व्यवसाय करतात, त्यांची घरे, इतर सुखसोयी इ. माहिती मिळविण्याकरिता केलेली सर्वेक्षणे या प्रकारात मोडतात. (३) व्यवहार, वर्तणूक आणि सवयी यांविषयीची सर्वेक्षणे : लोक आपली कमाई कशी खर्च करतात, रिकामा वेळ कसा घालवितात, त्यांचे परस्परसंबंध इ. या प्रकारच्या सर्वेक्षणांचे अभ्यासविषय असतात. (४) जनसंघटनाविषयक सर्वेक्षणे : कारखाने, सहकारी संस्था, कामगार संघ, शासन, राजकीय पक्ष इ. अनेक प्रकारे जनविभाग संघटित होतात. हेही सर्वेक्षणांचे महत्त्वाचे अभ्यासविषय आहेत. (५) मते, समज व कल्पना यांसंबंधीची सर्वेक्षणे : विकीसाठी असलेल्या वस्तूंबद्दलची गिऱ्हाइकांची मते, रेडिओवरील कार्यक्र मांसंबंधीच्या आवडीनिवडी, प्रचलित सामाजिक व राजकीय प्रश्नांविषयी मते, निवडणुकीसंबंधीचे अंदाज इ. विषयांचा या प्रकारात समावेश होतो.

सर्वेक्षणाच्या विषयाबरोबरच सर्वेक्षणासाठी लोकसमाजाचे किती घटक (घरे, कुटुंबे, व्यक्ती वा अन्य) घ्यावयाचे हेही ठरवावे लागते. या दृष्टीने पाहिल्यास सर्वेक्षणांचे तीन प्रकार मानता येतात : (१) काही सर्वेक्षणांत समाजातील सर्व संबंधित घटकांचे निरीक्षण करतात. अशा सर्वेक्षणाचे स्वरूप जनगणनेसारखे असते. (२) बहुसंख्य सर्वेक्षणांत वरीलप्रमाणे जनगणनेची पद्घती न स्वीकारता प्रतिदर्श घटक निवडून केवळ त्यांचे निरीक्षण करतात. प्रतिदर्श बहुधा संभाव्यतेच्या तत्त्वानुसार निवडतात व अशा सर्वेक्षणाला संभाव्यता प्रतिदर्श सर्वेक्षण म्हणतात. दशवार्षिक गणना सोडली तर भारतात (व इतरत्र) अलीकडच्या काळात झालेली बहुतेक सर्वेक्षणे प्रतिदर्श पद्घतीची आहेत. [⟶प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्घांत] (3) एखाद्या विषयाचा अभ्यास बऱ्याच तपशिलांत जाऊन सखोलपणे करावयाचा असतो. यासाठी घटकांची अगदी मर्यादित संख्या घेऊन त्यांचे शक्य तितके सविस्तर व तपशीलवार निरीक्षण करणे इष्ट असते. अशा सर्वेक्षणाला ( वकिली किंवा वैद्यकीय व्यवसायातील शब्द वापरुन) ‘केस स्टडी’ किंवा व्यक्ती-अध्ययन म्हणतात. उदा., शेतीव्यवसाय अथवा विशिष्ट कारखानदारीच्या विशेष अभ्यासासाठी मोजकेच प्रारू पिक शेतकरी अथवा कारखाने निवडून त्यांचे व्यक्ती-अध्ययन करणे ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने अधिक फायद्याचे असते.

एखाद्या सर्वेक्षणात या सर्व प्रकारांचा कमशः उपयोग केलेला असतो. प्रथम सामान्य माहितीसाठी जनगणना, नंतर प्रतिदर्श निवडून त्यांचे अधिक विस्तृत सर्वेक्षण आणि शेवटी अगदी मोजक्या घटकांचा सांगोपांग विशेष अभ्यास अशा तऱ्हेने हे सर्वेक्षण चालते.


‘शितावरुन भाताची परीक्षा’ हे व्यवहारातील प्रतिदर्शाचे तत्त्व सर्वेक्षण पद्घतीतही फायद्याचे ठरते. प्रतिदर्श सर्वेक्षणाचा मोठा फायदा असा की, निरीक्षणासाठी घेतलेल्या घटकांची संख्या जनगणनेच्या तुलनेने खूप लहान असते. समजा, एका मोठ्या शहरातील जनतेच्या कौटुंबिक खर्चाविषयी अभ्यास करावयाचा आहे आणि शहरात एक लाख कुटुंबे आहेत. प्रतिदर्श पद्घती योग्य प्रकारे वापरली तर फक्त दोन-तीन हजार ( म्हणजे अवघी दोन-तीन टक्के ) कुटुंबांचे सर्वेक्षण करून सरासरी खर्चाविषयी विश्वसनीय अंदाज काढता येतात. म्हणून प्रतिदर्श सर्वेक्षणात जनगणनेपेक्षा वेळ, पैसा व श्रम यांची खूपच बचत होते. तसेच कामाचा व्याप बराच कमी असल्यामुळे प्रतिदर्श सर्वेक्षणात माहिती अधिक कसोशीने घेता येते. अर्थात ती जनगणनेतील माहितीपेक्षा अधिक बिनचूक व विश्वसनीय असते. प्रतिदर्श हा एकूण लोकसमुदायाचा अंशभाग तेव्हा त्यापासून निघणारा अंदाजी आकडा व खरोखरीचा आकडा ( उदा., शहरातील सरासरी कौटुंबिक खर्च) यात तफावत ही राहणारच. परंतु संभाव्यतेच्या तत्त्वानुसार प्रतिदर्श संख्या आणि प्रतिदर्श अभिकल्प निवडून ही तफावत इष्ट प्रमाणात कमी करता येते आणि अंदाजांची परिशुद्घता वाढविता येते. इतकेच नव्हे, तर वर्तविलेल्या अंदाजांच्या अथवा अनुमानांच्या परिशुद्घतेचे मापनही ⇨संभाव्यता सिद्घांताच्या साहाय्याने सर्वेक्षणात मिळालेले आकडे वापरुन करता येते. सर्वेक्षणातील माहिती विश्वसनीय म्हणून अनुमानांच्या परिशुद्घतेविषयीचे हे अंदाजही विश्वसनीय असतात. उलट, जनगणनेतील माहिती तितकी विश्वसनीय नसते आणि तिच्यापासून काढलेली अनुमाने कितपत परिशुद्घ आहेत हेही सांगता येत नाही.

सामाजिक सर्वेक्षण पद्घतीचे सामान्य विवेचन येथपावेतो झाले असून आता एखादे सर्वेक्षण योजून ती पार पाडताना कोणत्या गोष्टी कोणत्या कमाने कराव्या लागतात याचे विवेचन पुढे दिले आहे.

सर्वेक्षणाची पूर्वतयारी : कोणत्याही मोठ्या सामाजिक सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी बरीच पूर्वतयारी करावी लागते. प्रथम सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट निश्चित करावे. नंतर त्या विषयावरील महत्त्वाचे ग्रंथ, लेख आणि त्या अथवा तत्संबंधित विषयावर पूर्वी झालेल्या सर्वेक्षणांचे वृत्तांत वाचावे. ज्यांनी पूर्वीची सर्वेक्षणे केली त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करता आल्यास संधी दवडू नये. या सर्वांची अभिप्रेत उद्दिष्टाचा तपशील व कक्षा निश्चित करण्यास मदत होते आणि प्रत्यक्ष कामातील संभाव्य अडचणी समजतात. त्यानंतर सर्वेक्षणाची व्याप्ती आणि सीमाक्षेत्र ठरवावे. सर्वेक्षणासाठी कोणता भौगोलिक अथवा शासकीय विभाग घ्यावयाचा, कोणता लोकसमुदाय घ्यावयाचा (शहरी, ग्रामीण की दोन्ही ) इ. सीमा निश्चित केल्या पाहिजेत. तसेच लोकसमुदायातील कोणत्या थरांचे सर्वेक्षण करावयाचे हे ठरविले पाहिजे. उदा., शेतमजुरांची पाहणी करावयाची असल्यास सर्वेक्षणात इतर व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश होणार नाही. त्याचबरोबर निरीक्षणासाठी कोणता अंतिम घटक घ्यावयाचा हेही ठरविले पाहिजे. काही सर्वेक्षणांना घर, तर काहींना कुटुंब आणि अन्य काहींसाठी वयात आलेला प्रत्येक स्त्री-पुरुष हा अनुरू प अंतिम घटक असतो. उदा., आर्थिक कमाई हा विषय असल्यास कौटुंबिक की वैयक्तिक कमाई यावर अंतिम घटक कुटुंब की व्यक्ती हे अवलंबून राहील. पुष्कळशी सामाजिक सर्वेक्षणे कुटुंबवार सर्वेक्षणे असतात.

सर्वेक्षणात मिळालेल्या माहितीचे विश्लेषण व विवेचन करताना कोणती वर्गीकरणे उपयोगी पडतील याचा विचार आधीच करून ठेवावा. माहितीचा उपयोग कशासाठी व्हावयाचा यावर हे अवलंबून असते. म्हणजे त्याप्रमाणे इष्ट वर्गीकरणासाठी आवश्यक असणारी माहिती सर्वेक्षणात गोळा करता येते.

बहुतेक सर्वेक्षणे प्रतिदर्श पद्घतीची असल्याने प्रतिदर्श संख्या किती घ्यावयाची हे ठरविले पाहिजे. सर्वेक्षणावरुन वर्तविलेली अनुमाने अथवा अंदाजी आकडे किती परिशुद्घ हवेत यानुसार प्रतिदर्श संख्या ठरते. उलट सर्वेक्षणासाठी वेळ, पैसा व श्रम किती लावावे लागतील, हे ठरविण्यासाठी प्रथम प्रतिदर्शसंख्या निश्चित झाली पाहिजे. सर्वेक्षणे किती दिवसांत पूर्ण करावयाची, त्यासाठी निरीक्षक, पर्यवेक्षक इ. क्षेत्र-कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचारी किती लागतील, त्याकरिता किती खर्च येईल, त्यासाठी लागणारे अनुरू प मनुष्यबळ आणि द्रव्यबळ यांची तरतूद कशी करावयाची याचा विचारही यावेळीच करतात.

कित्येकदा सर्वेक्षण प्रमुखाला सांख्यिकीचे पुरेसे ज्ञान नसते. त्याने सर्वेक्षणाच्या सुरूवातीपासूनच सर्वेक्षणपद्घती व सांख्यिकीय विश्लेषण उत्तम अवगत असलेल्या एखाद्या सांख्यिकीविज्ञाचे साहाय्य घ्यावे. असे न करता पुष्कळदा सर्वेक्षणानंतर गोळा झालेल्या माहितीचे केवळ वर्गीकरण आणि विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकीविज्ञाला पाचारण केले जाते. माहिती योग्य पद्घतीने गोळा केलेली नसल्यामुळे तिच्यापासून उपयुक्त निष्कर्ष काढणे अशक्य असते आणि बराच पैसा खर्च करून पुष्कळ परिश्रमाने मिळविलेली माहिती अखेर वाया जाण्याचा प्रसंग ओढवतो. हा धोका टाळता येण्यासारखा असतो.

सर्वेक्षणाच्या पूर्वतयारीच्या काळात आवश्यक वाटल्यास एक मार्गदर्शी सर्वेक्षण लहान प्रमाणावर घ्यावे. तिचे दोन मुख्य फायदे असतात. कोणत्या प्रश्नांस समाधानकारक उत्तरे मिळतात, कोणास मिळत नाहीत, कशात बदल करावेत, कोणते निखालस गाळावेत, कोणते नवे प्रश्न घालावेत वा दिलेल्या प्रश्नांचा कम बदलावा का, यांसंबंधी उपयुक्त अनुभव मार्गदर्शी सर्वेक्षणामुळे मिळतो आणि प्रश्नावली सुधारता येते. दुसरे, ज्यावरुन प्रतिदर्श घटक निवडावयाचे ती मूळ यादी किंवा प्रतिदर्शी व्यूह कितपत योग्य आहे, इष्ट माहितीची स्वाभाविक चलनशीलता किती, अनुत्तरितांचे प्रमाण अंदाजे किती असेल वगैरे प्रतिदर्श निवडीला आवश्यक असलेली माहिती मार्गदर्शी सर्वेक्षणावरुन मिळते. याशिवाय प्रश्नकर्त्यांना अथवा निरीक्षकांना किती प्रशिक्षण द्यावे लागेल, प्रवासासाठी व प्रत्यक्ष माहितीची नोंद करण्यासाठी किती वेळ लागतो, देखरेख कोणत्या प्रकारची व किती प्रमाणात पाहिजे वगैरे संघटनात्मक बाबी निश्चित करण्यासाठीही मार्गदर्शी सर्वेक्षणाचा फार उपयोग होतो. याच्या अनुभवाने उद्दिष्टांचे तपशील, प्रश्नावली व प्रतिदर्श अभिकल्प यांत सुधारणा करता येते आणि मुख्य सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेला वेळ, खर्च, मनुष्यबळ व संघटना यांसंबंधीचे अंदाज अधिक यथार्थ होऊन प्रसंगी या सर्वांत बरीच बचत होते. म्हणून एखादी देशव्यापी अथवा मोठमोठी सामाजिक सर्वेक्षणे सुरू करताना लहान प्रमाणावर केलेली एक अथवा अनेक मार्गदर्शी सर्वेक्षणे हा पूर्वतयारीचा अत्यावश्यक भाग समजला जातो.


प्रतिदर्शांची निवड : यापुढील पायरी प्रतिदर्श घटक निवडण्याची, म्हणजे लोकसमुदायातून विवक्षित घटक निरीक्षणासाठी निवडण्याची असते. पूर्वी, सर्वेक्षण करणारे लोकसमुदायाचे जे घटक स्वतःला प्रातिऐनिधिक वाटतील ते निवडून प्रतिदर्श बनवीत असे, याला हेतुपूर्व निवड म्हणत. परंतु अशा प्रतिदर्शात कळत वा नकळत पूर्वभाव येऊन तो खरोखरी प्रातिनिधिक होत नाही असे अनेक वेळा दिसून आल्यामुळे अलीकडे संभाव्यतेच्या तत्त्वानुसार यदृच्छ रीतीनेच प्रतिदर्श घटक निवडतात. अशा निवडीसाठी यदृच्छ संख्यांचे कोष्टक वापरतात किंवा संगणकाचा उपयोग करून यदृच्छ संख्या निर्माण करण्याचे सॉफ्टवेअर वापरतात. [⟶ यदृच्छ प्रक्रिया प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्घांत].

प्रतिदर्श निवडण्यासाठी दोन गोष्टींची जरू री असते : (१) प्रतिदर्श अभिकल्प आणि (२) प्रतिदर्शी व्यूह अथवा घटकांची मूळ यादी. प्रतिदर्श सिद्घांतात परिस्थितीला अनुरू प असे अनेक प्रतिदर्श अभिकल्प सांगितले आहेत. मोठ्या सर्वेक्षणासाठी बहुधा लोकसमुदाय लहान स्तरांत विभागून प्रत्येक स्तरातून अनेक टप्पे असलेला प्रतिदर्श निवडला जातो. बहुतेक प्रतिदर्श अभिकल्पांत अशा तऱ्हेचा अनेक टप्प्यांचा स्तरीय प्रतिदर्श घेतलेला असतो. उदा., भारताचे ग्रामीण सर्वेक्षण करावयाचे असेल, तर प्रथम भौगोलिक वा इतर तऱ्हांनी स्तर कल्पून नंतर प्रत्येक स्तरात काही तालुके आणि त्या तालुक्यांत काही गावे व दर गावात काही कुटुंबे अशा तीन टप्प्यांत प्रतिदर्श कुटुंबे निवडता येतील. हा प्रतिदर्श अभिकल्प तीन टप्प्यांचा स्तरीय अभिकल्प झाला. कोणत्या टप्प्यात घटक कसे निवडावयाचे, लोकसंख्येच्या प्रमाणांत की समान संभाव्यतेने निवडावयाचे हे स्वीकारलेल्या प्रतिदर्श अभिकल्पांतच अनुस्यूत असते. तसेच, समान संभाव्यतेने निवडताना सरल यदृच्छ पद्घती की क्र मबद्घ पद्घती अंगीकारावयाची हेही ठरवितात. त्याचप्रमाणे कोणत्या स्तरातून, कोणत्या टप्प्याला त्या प्रकारचे किती घटक निवडावयाचे, म्हणजेच एकूण प्रतिदर्श संख्येची स्तरवार आणि टप्पावार विभागणीही ठरवितात. प्रतिदर्श सिद्घांताच्या तत्त्वानुसार गृहीत लोकसमुदायाच्या स्वरूपाप्रमाणे ही विभागणी ठरविली जाते. एक स्थूल तत्त्व असे की, ज्या स्तरात विषमता अधिक त्यातून अधिक प्रमाणात घटक घेणे इष्ट असते.

ज्या यादीतून घटक निवडावयाचे त्या घटकांच्या यादीला प्रतिदर्शी व्यूह अथवा मूळ यादी म्हणतात. ही यादी सोयीस्कर, पूर्ण बिनचूक आणि अद्ययावत असली पाहिजे. मूळ यादी नेहमीच उपलब्ध असत नाही. वरील उदाहरणात तालुक्यांची वा गावांची सरकारी यादी मिळेल परंतु गावातील कुटुंबांची यादी असेलच असे नाही. तेव्हा निरीक्षकाने प्रथम ती तयार केली पाहिजे. उपलब्ध यादी (उदा., मतदारांची यादी) जुनी असेल तर संभाव्य बदलाची दखल घेतली पाहिजे. प्रतिदर्शी व्यूहासाठी अनेक प्रकारच्या याद्या वापरतात. उदा., मतदारांची यादी, राष्ट्रीय यादी, ( शहरात ) कर भरणाऱ्यांची यादी, घरांची यादी वगैरे. आपल्या सर्वेक्षणाला कोणती यादी अधिक अनुरू प हे सर्वेक्षण करणाऱ्याने ठरवावे.

प्रचलित घडामोडींबद्दलची मते, ग्रा हकांच्या आवडीनिवडी, निवडणुकीबद्दलचे अंदाज इ. झटपट आणि अल्प खर्चाने करावयाच्या सर्वेक्षणांची योजना दीर्घसूत्री असून चालत नाही. अशा सर्वेक्षणांत प्रतिदर्श निवड बहुधा भाग प्रतिदर्शनाने करतात. या पद्घतीत निरीक्षण करावयाचे घटक आधी निवडून ठेवलेले नसतात. लिंग, वय, व्यवसाय इ. ठळक गुणांनुसार घटकांची संख्याच तेवढी आधी निश्चित केलेली असते. या मर्यादेत राहून प्रत्यक्ष घटक निवडण्याची निरीक्षकाला पूर्ण मुभा असते.

संभाव्यतेला धरुन प्रतिदर्श निवडल्यानंतरही इतर कारणांनी (भौगोलिक किंवा इतर सीमाक्षेत्रे नीट मर्यादित न झाल्यामुळे, मूळ यादी अपुरी अथवा जुनी असल्यामुळे वगैरे) पूर्वभाव उत्पन्न होऊ शकतो. ही सर्व काळजी घेतली तरीही पूर्वभावाचे एक कारण शिल्ल्क राहते, ते म्हणजे प्रतिदर्शांतील काही घटक अनुत्तरित राहतात. निवडलेला घटक मुळातच अस्तित्वात नसतो, अगर गाव सोडून गेलेला असतो, घर बंद असल्यामुळे अथवा अन्य कारणाने भेट होत नाही किंवा संबंधित व्यक्ती माहिती देण्याचे नाकारते. पूर्वभाव कमीत कमी व्हावा यासाठी निरीक्षकाने अनुत्तरितांची संख्या शक्य तितकी कमी केली पाहिजे. परंतु अनुत्तरित घटकाकडे किती हेलपाटे घालावयाचे, निरू पायाने तो गाळावयाचे ठरल्यास त्याचऐवजी नवा घटक घ्यावयाचा की नाही, घ्यावयाचा असल्यास तो कसा निवडावयाचा इ. निर्णय प्रतिदर्श निवडीचे वेळीच घेऊन ठेवलेले असावेत. या कामी वर उल्लेखिलेले मार्गदर्शी सर्वेक्षण उपयोगी पडते.

एकाच तऱ्हेची देशव्यापी सर्वेक्षणे कालानुकमाने घ्यावयाची असली तर पुष्कळदा पहिल्या सर्वेक्षणापूर्वी एक प्रातिनिधिक प्रतिदर्श निवडून तोच सर्व सर्वेक्षणाकरिता वापरतात. अशा प्रतिदर्शाला प्रमाण प्रतिदर्श म्हणतात. याचे फायदे दोन आहेत : (१) दर वेळी प्रतिदर्श निवडीचा खटाटोप वाचतो आणि (२) लोकजीवनात कालानुक्र माने होणारे बदल शोधणे सोयीचे होते. अशा प्रतिदर्शात कित्येकदा प्रतिदर्श अभिकल्पाच्या पहिल्या काही टप्प्यातील घटक कायम ठेवून शेवटच्या टप्प्याला दर वेळी नवे घटक निवडतात. अमेरिका व इंग्लंड या देशांत असे प्रतिदर्श वापरण्यात आले आहेत. भारतातील राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षणाच्या निरनिराळ्या सत्रांतही पुष्कळदा स्तर तेच ठेवून त्याखालील घटक मात्र दर वेळी नवे निवडतात. बरीच वर्षे लोटल्यावर देशकाल परिस्थितीत पडलेल्या बदलामुळे प्रमाण प्रतिदर्शही बदलावे लागतात.

माहिती जमविणे-प्रश्नावली : सर्वेक्षणातील पुढील टप्पा म्हणजे माहिती जमविण्यासाठी प्रश्नावली तयार करण्याचा होय. शहरातील वाहतूक अथवा वृत्तपत्रांची लोकप्रियता इत्यादींसाठी प्रत्यक्ष अवलोकनाने होणारी सर्वेक्षणे किंवा जन्म-मृत्यू अथवा कंपन्यांचे ताळेबंद इ. विषयांसंबंधी उपलब्ध दप्तरातील नोंदींवरून केलेली सर्वेक्षणे सोडली, तर बहुतेक आधुनिक सर्वेक्षणांत प्रश्नावली हेच माहिती मिळविण्याचे प्रमुख साधन असते. प्रश्नावली बहुधा छापील असते व तिचा उपयोग दोन प्रकारे करता येतो : (१) उत्तर देणाऱ्याला प्रश्नावली टपालाने पाठवून अथवा समक्ष देऊन भरुन देण्याची विनंती करणे आणि (२) निरीक्षकाने स्वतः प्रश्न विचारून प्रश्नावलीवर उत्तरांची नोंद करणे. पहिला प्रकार वापरावयाचा तर उत्तर देणाऱ्याला चांगल्यापैकी लिहिता-वाचता आले पाहिजे आणि प्रश्नही सहज व निःसंदिग्धपणे समजतील असे पाहिजेत. हा प्रकार सोयीचा व बरेच वेळा कमी खर्चाचा असतो, परंतु त्याला काही मर्यादा आहेत. उदा., ज्या प्रश्नांचे उत्तर उत्स्फूर्तपणे (विचार करण्यास अवधी न घेता) मिळावे अशी अपेक्षा असेल ते प्रश्न या प्रकारात विचारता येणार नाहीत. तसेच प्रश्नाचा खुलासा न झाल्यामुळे अथवा अन्य कारणाने प्रश्न अनुत्तरित राहण्याचा, तसेच प्रश्नावलीच (परतीचे टपालहशील जोडलेले असूनही) परत न येण्याचा धोका असतो. पाश्चात्त्य देशांत पहिला प्रकार बराच रुढ झाला आहे. भारतीय सर्वेक्षणात निरीक्षक संबंधित व्यक्तीची मुलाखत घेऊन तोंडी प्रश्न विचारुन माहिती प्रश्नावलीवर लिहून घेतो. या पद्घतीत प्रश्नाचा अधिक खुलासा करता येतो न समजल्यामुळे प्रश्न अनुत्तरित राहत नाही.


प्रश्नावली काळजीपूर्वक तयार करावी लागते. प्रश्नावलीचे वेगवेगळे खंड, प्रश्नांचा क्र म, त्यांची एकमेकांशी संगती, त्यांचे शब्द-स्वरूप, उत्तराकरिता सोडलेली जागा, काही प्रश्नांसाठी कोष्टकाच्या स्वरूपाची मांडणी वगैरेंचा नीट विचार करावा लागतो. प्रश्नावलीची छपाई स्पष्ट व सुबक असावी. काही प्रश्न ‘होय’, ‘नाही’ या स्वरूपाचे, तर काहींची पर्यायी उत्तरे छापलेली असून फक्त अभिप्रेत उत्तरावर खूण करावयाची असते इतरांची उत्तरे लिहून घ्यावयाची असतात. प्रश्नावलीच्या आरंभीच ही सर्व माहिती खाजगी व गुप्त मानली जाईल अशी हमी स्पष्टपणे छापलेली असावी. प्रश्नाचे उत्तर असंदिग्ध येईल इतका तो स्पष्ट असावा. स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्यास ते शक्यतो ठरलेल्या मोजक्या शब्दांत व ठरीव पद्घतीने द्यावे. प्रश्नावली लांब व कंटाळवाणी नसावी, कारण त्यामुळे माहितीची विश्वसनीयता कमी होते. तसेच प्रश्न स्मरणशक्तीला फार ताण देणारे नसावेत. प्रश्नावलीत वापरलेल्या कित्येक शब्दांची स्पष्ट व्याख्या करणे आवश्यक असते. कुटुंब, कुटुंबप्रमुख, कमाई, व्यवसाय इ. दिसायला सोप्या वाटणाऱ्या शब्दांतील आशय निःसंदिग्धपणे मर्यादित करणे वाटते तितके सोपे नाही हे वाचकास थोडा विचार केल्यास सहज कळून येईल. सर्व निरीक्षकांनी माहिती एकाच पद्घतीने घ्यावी. संदिग्धतेमुळे, न समजल्यामुळे, गैर अथवा भिन्न समजुतीमुळे त्यांत फरक होऊ नयेत, वेगवेगळ्या निरीक्षकांनी शब्दांचे वेगवेगळे अर्थ करू  नयेत, म्हणून प्रश्नावलीबरोबरच शब्दांच्या व्याख्या, स्पष्टीकरणे आणि खुलासेवार लेखी सूचना तयार केल्या जाव्यात. मार्गदर्शी सर्वेक्षणातील अनुभव येथेही उपयोगी पडतो.

क्षेत्रांतील काम-निरीक्षक व निरीक्षण : सर्वेक्षणातील यापुढचे काम म्हणजे क्षेत्रकार्याची व्यवस्था करणे. प्रतिदर्शातील घटकांस शोधून संबंधित व्यक्तीकडून इष्ट माहिती मिळविणे याला क्षेत्रकार्य म्हणतात आणि हे काम करणाऱ्यास क्षेत्र निरीक्षक म्हणतात. मुलाखत घेऊन माहिती नोंदविताना निरीक्षकाला अनेक पथ्ये पाळावी लागतात. दिलेली सर्व माहिती गुप्त व खाजगी समजली जाईल, ती इतर कोणालाही समजणार नाही याबद्दल उत्तर देणाऱ्या व्यक्तीला प्रथमच हमी द्यावी आणि सर्वेक्षणाचे उद्दिष्ट समजावून देऊन तिला विश्वासात घ्यावे. उत्तर देणाऱ्याच्या सोयीने व कलाने घ्यावे. आपल्या वागणुकीमुळे तो नाराज होऊन माहिती नाकारण्याचा धोका टाळावा. त्याचबरोबर माहिती विश्वसनीय मिळेल अशी दक्षता घ्यावी. प्रश्नाचे स्पष्टीकरण देताना आपण अनवधानाने विवक्षित उत्तर सुचवीत नाही, स्वतःच्या मताचे दडपण अथवा प्रतिबिंब त्यात पडत नाही याबद्दल निरीक्षकाने खबरदारी घेतली पाहिजे.

सर्वेक्षण करावयाचे ठरविले की क्षेत्रकार्यासाठी पात्र व अनुरूप असे निरीक्षक मिळविले पाहिजेत. त्यांना पूर्वीचा अनुभव नसल्यास सर्वेक्षण पद्घतीविषयी सामान्य आणि प्रस्तुत सर्वेक्षण व तिची प्रश्नावली यांविषयी विशेष प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांचेकडून चाचणीदाखल काही प्रश्नावली भरू न घ्याव्यात आणि यानंतर जे योग्य वाटतील त्यांनाच निरीक्षक नेमावे. जेथे सर्वेक्षणे नेहमी चालूच असतात त्या संस्थांत (उदा., भारतातील राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षणे ) काही पर्यवेक्षक व निरीक्षक कायमचे नोकरीवर असतात.

सर्वेक्षण मोठे असल्यास निरीक्षकांच्या कामावर देखरेख करण्यासाठी पर्यवेक्षक नेमावेत. कामाची दैनंदिन वाटणी करणे, निरीक्षकांच्या शंका व अडचणी दूर करणे, अपुऱ्या प्रश्नावली पूर्ण करून घेणे, काही प्रश्नावली पुन्हा स्वतः भरून काम समाधानकारक आहे याची खात्री करून घेणे इ. कामे पर्यवेक्षकांकडे असतात. पर्यवेक्षकांनी पूर्ण झालेल्या प्रश्नावली कार्यालयात ताबडतोब पाठवाव्यात. त्यामुळे पुढील कामाचा खोळंबा होत नाही. प्रत्येक निरीक्षकाने व पर्यवेक्षकाने आपापल्या कामाची दैनंदिनी ठेवावी.

संपादन, संस्करण वगैरे : प्रश्नावली कार्यालयात आल्या की त्या व्यवस्थित व पूर्ण भरल्याची तपासणी होते, अपुऱ्या प्रश्नावली क्षेत्रांत परत पाठवून पूर्ण करविल्या जातात आणि पूर्ण प्रश्नावलींचे पुढील संस्करणाच्या दृष्टीने संपादन सुरू होते. बहुतेक सर्व मोठ्या सर्वेक्षणातील माहितीचे संकलन, संक्षिप्तीकरण, कोष्टकीकरण आणि विश्लेषणासाठी आवश्यक असलेली इतर गणितकृत्ये ही सर्व संगणकाच्या साहाय्याने होतात. यासाठी काही वेळा प्रथम प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची नोंद संकेतलिपी स्वरूपात करावी लागते. नंतर या माहितीवरुन योग्य ते सॉफ्टवेअर वापरून इष्ट ती कोष्टके तयार केली जातात. सर्वेक्षणाच्या योजकाने इष्ट कोष्टकांच्या आधीच मनाशी विचार करून त्या दृष्टीने प्रश्नावलीतील प्रश्नांची योजना व मांडणी केली, तर संस्करणाचे काम तितकेच सोपे व जलद होते.

विश्लेषण व अहवाल : सर्वेक्षणात गोळा झालेली माहिती इष्ट त्या पद्घतीने संक्षिप्त झाली, की पुढील पायरी विश्लेषणाची असते. नियोजित उद्दिष्टाच्या दृष्टीने विविध कोष्टकांतील माहितीची सर्व बाजूं नी छाननी करणे, त्यावरू न सर्वेक्षण केलेल्या लोकसमाजाविषयी तार्किक, गुणात्मक व संख्यात्मक निष्कर्ष काढणे, त्याविषयी अंदाजे आकडे अथवा आगणने काढणे, संबंधित गृहीतकांची परीक्षा पाहणे इ. गोष्टींचा यांत समावेश होतो. संख्यात्मक निष्कर्ष काढण्यासाठी सांख्यिकीतील अद्ययावत पद्घती वापरल्या जातात.

सर्वेक्षणातील शेवटचे काम म्हणजे अहवाल किंवा वृत्तांत लिहिणे. अहवालात सर्वेक्षणाचे उद्दिष्ट, पूर्वपीठिका व इतिहास, कोणासाठी व कोणामार्फत सर्वेक्षण झाले त्याचा तपशील, त्यासाठी उभी केलेली संघटना आणि लागलेला वेळ, प्रश्नावली, क्षेत्रकार्याचे संक्षिप्त वर्णन इ. प्रथम द्यावीत. त्यानंतर उद्दिष्टाच्या दृष्टीने गोळा झालेल्या माहितीच्या साहाय्याने त्या लोकसमाजाच्या विविध अंगांचे निरनिराळ्या भागांत वर्णन व विवेचन करावे आणि त्यापासून निघालेले निष्कर्ष व अनुमाने द्यावी. वर्णनाला व विवेचनाला आधारभूत असलेली सर्वेक्षणातून निघालेली आकडेवारी कोष्टकाच्या व आलेखांच्या रूपाने अहवालात नमूद करावीत. विवेचनाच्या सुलभतेच्या दृष्टीने मजकुरातही लहान लहान कोष्टके देणे इष्ट असते. शेवटी निष्कर्षांचा गोषवारा देऊन आणि ( अपेक्षित असल्यास ) उपाययोजनेविषयी शिफारशी देऊन अहवाल समाप्त करावा.

सामाजिक सर्वेक्षण पद्घती आता सर्वत्र सर्वमान्यता पावल्यामुळे तिचा दुरुपयोग होण्याचा धोकाही वाढला आहे. अतिउत्साही पण अनभिज्ञ व्यक्तींनी सर्वेक्षण पद्घतीचा असंबद्घपणे वापर केल्याची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे विवेकहीन व्यक्तींनी आपल्या विवाद्य मताच्या पुष्ट्यर्थ सर्वेक्षण पद्घतीचा अतिरेकी अथवा गैरवापर केल्याची उदाहरणेही आहेत. नवे सर्वेक्षण योजताना योजकाने हा धोका लक्षात ठेवणे जरू र असते. तसेच झालेल्या सर्वेक्षणाचे अहवाल वाचताना अभ्यासकांनीही चोखंदळ आणि विवेकी दृष्टी ठेवणे आवश्यक असते. सामाजिक विज्ञानांच्या होतकरू  अभ्यासकाने हेही ध्यानात घ्यावे की, समाजशास्त्रांच्या विकासाला तत्त्वमीमांसेचीही मूलभूत आवश्यकता आहे. चिंतन आणि निरीक्षण दोन्ही आवश्यक असतात. चिंतनाची उणीव निरीक्षणाने भरू न निघत नाही.

इतिहास : राज्यातील साधनसंपत्तीची मोजदाद ठेवण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून जगात सर्वत्र आढळते. यामधून जनगणनेस आरंभ झाला. पाश्चात्त्य देशांत सामाजिक सर्वेक्षणाला एकोणिसाव्या शतकात सुरुवात झाली. औद्योगिक क्रां तीनंतर निर्माण झालेल्या शहरांतील श्रमिक जनतेचे कष्टमय, गलिच्छ व बकाली जीवन हा सुरुवातीच्या सामाजिक सर्वेक्षणांचा मुख्य विषय असे. उद्देश अर्थातच समाजसुधारणेचा होता. प्रारंभीच्या प्रयत्नांत ल प्ले (Le Play) या फ्रेंच समाजसुधारकाने (१८५५ सालच्या सुमारास) केलेल्या हजारांवर फ्रेंच कामगार कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. हा अभ्यास व्यक्ती-अध्ययन (केस स्टडी ) स्वरूपाचा होता. सुरुवातीच्या सर्वेक्षणांच्या या विशिष्ट विषयामुळे पाश्चात्त्य देशांत सामाजिक सर्वेक्षण शब्दाला दारिद्याचे सर्वेक्षण असा रुढार्थ प्राप्त झाला होता.


इंग्लंडमधील सामाजिक सर्वेक्षणाचा इतिहास थोडक्यात पुढे दिला आहे. या देशात १८०१ मध्ये पहिली जनगणना झाली आणि तेव्हापासून दर दहा वर्षांनी होते. चार्ल्स बूथ यांनी लंडनमधील श्रमिक जीवनाची व दारिद्याची १८८६ मध्ये पाहणी सुरू केली तेव्हापासून इंग्लंडमध्ये सामाजिक सर्वेक्षणाचा आरंभ झाला असे मानतात. या सर्वेक्षणाचा वृत्तांत द लाइफ अँड लेबर ऑफ द पिपल ऑफ लंडन या नावाने (१८९२–९७) सतरा खंडांत प्रसिद्घ झाला. त्यानंतर १८९९ पासून रौनट्री यांनी यॉर्क शहराचे तशाच तऱ्हेचे सर्वेक्षण केले. बूथ व रौनट्री हे त्या काळचे सधन उद्योगपती होते. १९१२ मध्ये आर्थर बौले या प्राध्यापकाने इंग्लंडमधील आणखी पाच शहरांतील गरिबांच्या जीवनाचा अभ्यास केला. त्यांनी प्रतिदर्श सर्वेक्षण पद्घती वापरली. यात त्यांच्या सर्वेक्षणाचे नवीन वैशिष्ट्य दिसून येते. पुढील काही वर्षांत सांख्यिकीतील प्रतिदर्श सिद्घांताचा विकास होऊन प्रतिदर्श सर्वेक्षण पद्घती ही एकवेगळी शास्त्रशाखा बनली. ब्रिटिश सरकारने १९४१ मध्ये सामाजिक सर्वेक्षण नावाचा एक स्वतंत्र शासनविभाग निर्माण केला. गेली कित्येक वर्षे त्या देशातील विश्वविद्यालये, संशोधनसंस्था, उद्योगपती व सरकार ही सर्व सामाजिक सर्वेक्षणाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करीत असून लोकजीवनाच्या बहुविध स्वरूपाचा अभ्यास करण्याचे ते सर्वमान्य साधन समजले जाते. इतर पाश्चात्त्य देशांतील सामाजिक सर्वेक्षणाचा इतिहास सामान्यपणे अशाच प्रकारचा आहे. अमेरिका, फ्रान्स इ. देशांत ग्रामीण जीवनाला इंग्लंडपेक्षा अधिक महत्त्व असल्यामुळे त्या देशांत ग्रामीण जीवनाचे सर्वेक्षणही सुरू झाले. उदा., शेतीव्यवसायाच्या पद्घतशीर सर्वेक्षणाला प्रथम अमेरिकेत १९१४ पासून सुरुवात झाली.

इतर देशांप्रमाणे भारतातही राज्यातील अथवा नगरातील साधनसंपत्तीची मोजणी केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. इंग्रजी सत्ता सुरू झाल्यानंतर अखिल भारतीय जनगणनेचा एक प्रयत्न १८७२ मध्ये झाला. पहिली पद्घतशीर भारतीय जनगणना १८८१ मध्ये झाली व तेव्हापासून दर दहा वर्षांनी होते. त्यापूर्वीच्या काळात काही प्रादेशिक विभागात जनगणना झाल्या होत्या. तसेच या काळात पुणे शहराचे सर्वेक्षण (१८१८–२२), कोल्हापूर संस्थानचा सांख्यिकीय अहवाल (१८४८) यांसारखे लोकसमाजाविषयी तपशीलवार माहिती मिळविण्याचे प्रयत्नही सरकारी प्रेरणेने झाले होते. यानंतरच्या काळात प्रसिद्घ झालेल्या दख्खनमधील पाटबंधाऱ्याचे परिणाम (१८५०–६०), दुष्काळ चौकशी समितीचे अहवाल (१८७६ नंतर ) वगैरे सरकारी अहवालांत भारतीय ग्रामीण लोकजीवन प्रतिबिंबित झालेले दिसते. सार्वजनिक सभेने ( पुणे ) महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबद्दल केलेली निवेदने (१८७६–७८) ग्रामीण विभागाच्या सर्वेक्षणावर आधारलेली होती. ग्रामीण जीवनाचा सखोल अभ्यास करण्याचा पहिला पद्घतशीर प्रयत्न पुण्याच्या शेतकी कॉलेजचे एच्. बी. मान यांनी केला. त्यांनी १९१६-१७ मध्ये महाराष्ट्रातील दोन खेडेगावांचे तपशीलवार सर्वेक्षण केले. त्यानंतर तशा तऱ्हेची अनेक सर्वेक्षणे इतरत्र झाली. शेतीव्यवसायाचे पहिले पद्घतशीर सर्वेक्षण पुण्याच्या शेतकी कॉलेजचे प्रा. पाटील यांनी १९२५-२६ मध्ये केले. ⇨गोखले अर्थशास्त्र संस्थेचे प्रा. गाडगीळ यांनी याच विषयावर अधिक मोठ्या प्रमाणावर व अधिक पद्घतशीरपणे वाई तालुक्याचे सर्वेक्षण १९३६–३८ मध्ये केले. त्यापूर्वी ⇨नारायण गोविंद चापेकर  यांनी बदलापूर गावाचे विस्तृत सामाजिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल बदलापूर ( आमचा गाव) या नावाने मराठीत प्रसिद्घ केला होता (१९३३).

मुंबई सरकारमार्फत १९२१–२३ मध्ये झालेल्या गिरणी कामगारांच्या कुटुंबखर्चाच्या सर्वेक्षणापासून नागरी लोकजीवनाच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली असे दिसते. तत्पूर्वी लाहोर शहरातील गरीब वस्तीच्या सर्वेक्षणासारखे (१९२०) तुरळक प्रयत्न झाले असावेत. त्यानंतर सरकारमार्फत अशी सर्वेक्षणे इतर शहरांतही झाली. प्रा. गाडगीळ यांनी पुणे शहराचे १९३८ मध्ये प्रतिदर्श सर्वेक्षण केले तेव्हापासून शहरातील समग्र लोकजीवनाच्या पद्घतशीर अभ्यासास आरंभ झाला असे म्हणता येईल. यानंतर ग्रामीण व शहरी जीवनाविषयी अनेक सर्वेक्षणे झाली. कोलकात्याचे सांख्यिकीविज्ञ ⇨प्रशांतचंद्र महालनोबीस यांनी त्या प्रांतात काही सर्वेक्षणे केली. हळूहळू केंद्रीय व प्रांतीय शासनाला सामाजिक सर्वेक्षणांचे महत्त्व व आवश्यकता पटू लागली. तसेच महालनोबीस व ⇨पांडुरंग वासुदेव सुखात्मे या भारतीय सांख्यिकीविज्ञांनी प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्घांतात मौलिक भर घालून प्रतिदर्श सर्वेक्षणाचे तंत्र झपाट्याने पुढे नेले.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताने योजनाबद्घ आर्थिक विकासाची पद्घती स्वीकारली, त्यामुळे साहजिकच सामाजिक सर्वेक्षणाचे विषय वाढले, क्षेत्र विस्तारले आणि व्याप वाढला. केंद्रीय सरकारने राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण व केंद्रीय सांख्यिकीय विभाग हे स्वतंत्र विभाग स्थापून या कार्याला अधिक चालना दिली. त्याशिवाय कृषि सांख्यिकीय विभाग, केंद्र आणि राज्य सरकारांचे अन्य शासकीय विभाग, गोखले अर्थशास्त्र संस्था, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यू यांसारख्या बिनसरकारी संस्था, विश्वविद्यालये इ. अनेक संस्थांमार्फत अनेक सर्वेक्षणे झाली आहेत व होत आहेत. अखिल भारतीय स्वरूपाची जी सर्वेक्षणे झाली, त्यांपैकी महत्त्वाची तीन सर्वेक्षणे पुढीलप्रमाणे : (१) भारतीय शेतमजूर सर्वेक्षण (१९५०-५१) केंद्रीय सरकारमार्फत झाले. (२) रिझर्व्ह बँकेने १९५२ मध्ये ग्रामीण (पत) उधार सर्वेक्षण केले. (३) भारतीय लोकजीवनाची अनेकविध माहिती मिळविण्याच्या हेतूने १९५०-५१ पासून राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षणास प्रारंभ झाला व त्याची एकामागून एक सत्रे सतत चालू आहेत. २००४-०५ मध्ये एकसष्टावे सत्र झाले.

पहा : जनगणना जनांकिकी प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्घांत.

संदर्भ : 1. Abrams, M. Social Surveys and Social Action, London, 1951.

    2. Goode, W. J. Hatt, P. K. Methods in Social Research, New York, 1952.

   3. Hansen, M. H. Hurwitz, W. N. Madow, W. C. Sample Survey Methods and Theory, 2 Vols., New York, 1953.

   4. Hyman, H. H. Survey Design and Analysis, Illinois, 1955.

  5. Mahalonobis, P. C. Recent Experiments in Statistical Sampling in the Indian Statistical Institute, 1946.

  6. Moser, C. A. Survey Methods in Social Investigation, London, 1958.

  7. Payne, S. L. The Art of Asking Questions, Princeton, 1951.

  8. Sukhatme, P. V. Sampling Theory of Surveys with Applications, Iowa, 1954.

  9. Yates, F. Sampling Methods for Censuses and Surveys, London, 1953.

१०. चापेकर, ना. गो. बदलापूर (आमचा गाव),पुणे, १९३३.

कामत, अ. रा.