हरमेनगिल्ड सांतापावसांतापाव, हरमेन गिल्ड : (५ डिसेंबर १९०३–१३ जानेवारी १९७०). भारतीय वनस्पतिवर्गीकरणतज्ञ. त्यांचे भारतीय वनस्पतिसृष्टीतील (फ्लोरा) संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांनी एथेलबर्ट ब्लॅटर यांचे याच शाखेतील मौलिक संशोधन पुढे चालू ठेवले व त्यामध्ये फारच मोठी भर घातली.

 

सांतापाव यांचा जन्म स्पेनमधील ला गॅलेरा येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इटलीत झाले. १९२८ मध्ये त्यांनी रोमच्या ग्रेगोरियन विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयातील पीएच्. डी. पदवी घेतली. त्यानंतर ते लगेच भारतात आले व मुंबईच्या सेंट झेव्हिअर हायस्कूलमध्ये शिक्षकाचे काम करू लागले. त्यावेळी तेथील ब्लॅटर व त्यांचे सहकारी यांच्या प्रोत्साहनामुळे सांतापाव यांना वनस्पतिविषयक संशोधनांची गोडी लागली.

 

त्यांनी १९३६–४० या काळात अभ्यास व संशोधन करून लंडन विद्यापीठाच्या बी.एस्‌सी.व पीएच्.डी. या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर त्यांनी सेंट झेव्हिअर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. (१९४०–६१). पदव्युत्तर संशोधनात मार्गदर्शक म्हणून अध्यापन करीत असताना त्यांनी सेंट झेव्हिअर महाविद्यालयातील भारतीय वनस्पतीसंग्रहालयाची पुनर्रचना केली व ते अद्ययावत केले (१९५१–६१). १९४९ मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. ते कोलकाता येथील ⇨ भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे संचालक होते (१९६१–६८). त्यांनी त्या संस्थेची पुनर्रचना करून एक उत्कृष्ट संशोधक म्हणून कीर्ती मिळविली.

 

भारताच्या बहुतेक भागांतील वनश्रींचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी व्याख्यानांतून, संभाषणांतून व लेखांतून भारतीय वनस्पतींसंबंधी व प्रादेशिक पादपजातींसंबंधी उपयुक्त व नवीन माहितीचा भरपूर प्रसार केला. त्यांचे तीनशे शास्त्रीय शोधनिबंध व आठ पुस्तके प्रसिद्घ झाली असून त्यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या वनस्पतींची संख्या सु. सत्तर हजारांपर्यंत जाते. ‘लिपियन सोसायटी ऑफ लंडन’, ‘बोटॅनिकल सोसायटी ऑफ इंडिया’ व ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया’ यांसारख्या अनेक देशी व विदेशी संस्थांचे ते सदस्य होते. त्यांनी वनस्पतिविज्ञान या विषयात केलेल्या कार्याबद्दल त्यांना ‘बोटॅनिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेने ‘बिरबल सहानी पदक’ व वृक्षमित्र संघटनेने ‘के.एम्.मुन्शी पदक’ (१९६०) बहाल केले. १९६७ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ किताब देऊन गौरविले. १९६५ मध्ये ते भारतीय विज्ञान परिषदेच्या (इंडियन सायन्स काँग्रेस) वनस्पतिविभागाचे अध्यक्ष होते. त्यांना टेन्थ आल्फान्सोचा क्रॉसही मिळाला होता. बौद्घ भिक्षूंनी चहा प्रथम भारतातून चीनमध्ये नेला. सुरुवातीपासूनच चहाची लागवड आसामात होत असे, हे त्यांनी सिद्घ केले. अनेक नवीन वनस्पतींच्या शास्त्रीय नावांत त्यांचे नाव गोवून भारतीयांनी त्यांना अमर केले आहे. त्यांची काही विशेष प्रकाशने: (१)कॉमन ट्रीज (२)फ्लोरा ऑफ खंडाला (३)फ्लोरा ऑफ पुरंदर (४)आयुर्वेदिक ड्रग्ज ऑफ त्रावणकोर, कोचीन (५) फ्लोरा ऑफ सौराष्ट्र (६) इंडियन मेडिसिनल प्लँट्स (७) पॉइझनस प्लँट्स ऑफ इंडिया (८)दि ब्युटिफुल क्लाइम्बर्स ऑफ इंडिया (९) ऑर्किड्स ऑफ बॉम्बे (१०) बिब्लिओग्रॉफी ऑफ इंडियन बॉटनी (११) डिक्शनरी ऑफ द फ्लॉवरिंग प्लँट्स इन इंडिया. यांशिवाय त्यांनी लोणावळा, महाबळेश्वर, कारवार, कोकण, डांग इ. प्रदेशांतील पादपजाती तसेच पेरिप्लोकेसी, रुई कुल [⟶ ॲस्क्लेपीएडेसी], वासक कुल[⟶ ॲकँथेसी] इत्यादींसंबंधीचे शोधनिबंध लिहिले होते.

 

सांतापाव यांचे मुंबई येथे निधन झाले.

 

कुलकर्णी, सतीश वि.