सांतायाना, जॉर्ज : (१६ डिसेंबर १८६३–२६ सप्टेंबर १९५२). स्पॅनिश तत्त्वचिंतक व साहित्यिक. त्यांचे पूर्ण नाव होर्हे ऑगस्तीन नीकोलस रूईथ दे सांतायाना. लेखन इंग्रजीत. जन्म माद्रिद (स्पेन) शहरी. बालपणीच त्यांच्या आईवडिलांची फारकत झाल्यामुळे ॲव्हिला येथे त्यांच्या वडिलांनी त्यांचे संगोपन केले तथापि नंतर लवकरच ते अमेरिकेत बॉस्टन येथे आपल्या आईजवळ राहण्यासाठी गेले (१८७२). ‘बॉस्टन लॅटिन स्कूल’ येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. हार्व्हर्ड महाविद्यालयातून त्यांनी बी. ए.ची पदवी संपादन केली (१८८६). पुढे त्यांनी जर्मनीतील बर्लिन विद्यापीठामध्ये दोन वर्षे तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतले आणि पीएच्. डी. करण्यासाठी ते हार्व्हर्डला परतले. ⇨ रूडॉल्फ हेर्मान लोत्से या जर्मन तत्त्वज्ञावर त्यांनी आपला पीएच्. डी.चा प्रबंध लिहिला आणि हार्व्हर्ड विद्यापीठामध्येच १९१२ पर्यंत तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. पुढे इंग्लंडमध्ये आणि नंतर पॅरिस येथे ते राहिले. १९२५ मध्ये ते रोममध्ये स्थायिक झाले. दुसऱ्या महायुद्घाच्या काळात रोम मधील एका धार्मिक संस्थेत ते आश्रयाला आले आणि अखेरपर्यंत तेथेच राहिले.
सांतायाना हे रोमन कॅथलिक पण त्यांचे राहणे, अध्यापन हे मात्र मुख्यतः प्रॉटेस्टंट समाजात होते. ह्या वस्तुस्थितीचा त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या विकासावर निर्णायक परिणाम झाला. ते स्वतः सश्रद्घ नव्हते. तसेच स्पेन वा स्पॅनिश संस्कृती यांच्याशी त्यांचे फार जिव्हाळ्याचे नाते नव्हते. तत्त्वज्ञानदृष्ट्या त्यांची जवळीक ग्रीकांशी, हिंदूंशी तसेच आधुनिकांपैकी स्पिनोझाशी असल्याचे ते समजत असत. प्रत्यक्षात आधुनिक यूरोपीय व अमेरिकन तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावरील प्रभाव लक्षणीय होता. त्यांची लेखनशैली स्वतंत्र आणि साहित्यिक ढंगाची होती. एक तात्त्विक समीक्षक आणि कलासमीक्षक म्हणूनही त्यांचे कार्य मोठे होते.
दि सेन्स ऑफ ब्यूटी (१८९६) हा सांतायानांचा तत्त्वज्ञानातील पहिला महत्त्वाचा ग्रंथ होय. यात त्यांनी एक समग्र सौंदर्यशास्त्रीय उपपत्ती देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर याच उपपत्तीचा विकास त्यांनी रिझन इन आर्ट ह्या ग्रंथात केला. हा ग्रंथ सांतायानांच्या दि लाइफ ऑफ रीझन किंवा दि फेझ ऑफ ह्यूमन प्रोग्रेस (५ खंड, १९०५ – ०६) ह्या ग्रंथाचा चौथा खंड.
सांतायानांची सौंदर्यमीमांसा : सौंदर्यविषयक उपपत्ती ही एक मानसिक चिकित्सा वा शोध होय. सौंदर्यविषयक निर्णय (ईस्थेटिक जजमेंट) ही त्याची आधारसामग्री होय. सौंदर्यविषयक निर्णय म्हणजे मानसघटना असून त्या मानसिक उत्क्रांतीतून निष्पन्न होतात. सौंदर्यविषयक उपपत्ती म्हणजे प्रत्यक्ष सौंदर्यविषयक निर्णय घेणे नव्हे किंवा विविध कलाप्रकारांच्या उत्क्रांतीच्या इतिहासाचा शोध घेणेही नव्हे. सौंदर्यविषयक उपपत्ती ही तत्त्वमीमांसात्मक (मेटॅफिजिकल) प्रश्नांपासून तसेच नैतिक जाणिवेतून निर्माण होणाऱ्या मूल्यांपासून अलग करावी लागेल. नीतिमूल्ये आणि सौंदर्यमूल्ये हे मूल्यप्रकार वेगळे करावे लागतात. आपला कोणताही कल मूलभूत आस्थेचा अलौकिक आविष्कार असतो. ही मूल्येसकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन प्रकारची असतात. ⇨ नीतिशास्त्र हे नकारात्मक मूल्यांशी म्हणजे दुःख टाळण्याशी संबंधित असते, तर ⇨ सौंदर्यशास्त्र हे होकारात्मक मूल्यांशी म्हणजे मौज किंवा सुख मिळण्याशी संबंधित असते. दोघांतील भेद कार्य (वर्क) आणि खेळ यांच्यातील फरकासारखा असतो. सौंदर्यशास्त्राचा विषय असलेले सुख हे पुन्हा आंतरिक आणि विषयीकृत (ऑब्जेक्टिफाइड) असे दोन प्रकारचे असते. ऐंद्रिय किंवा मानसिक पातळीवर जाणवणारे सुख आंतरिक असते, तर ज्याला आपण ‘सौंदर्य’ म्हणतो ते म्हणजे विषयावर प्रक्षेपित केलेले किंवा विषयीकृत सुख असते. मात्र सौंदर्यानंद हा तटस्थ आणि सार्वजनिक करण्याजोगा असला पाहिजे हे ⇨ इमॅन्युएल कांट चे मत सांतायानांना मान्य नव्हते. [⟶ सौंदर्यशास्त्र].
रीझन इन आर्ट या ग्रंथात सांतायानांनी कलेच्या कार्याची चर्चा केली आहे. येथे सांतायाना व्यावहारिक कला व ललित कला यांत फरक करतात व असे दाखवितात, की व्यावहारिक कलांना मुळात केवळ साधनमूल्य असते. त्यांच्या स्वतोमूल्याचा(आंतरिक मूल्याचा-इन्ट्रिन्सिक व्हॅल्यूचा) जसजसा अधिकाधिक आस्वाद घेतला जाऊ लागतो तसतसे व्यावहारिक कलांचे रुपांतर ललित कलांमध्ये होऊ लागते. अर्थात कलाकृतीच्या समीक्षेची काही सार्वत्रिक किंवा अनुभवनिरपेक्ष तत्त्वे असू शकतात हेही सांतायानांना मान्य नव्हते. त्यांच्या मते कलेचे अंतिम समर्थन हेच असते की ती एकूण मानवी आनंदात भर घालते.
दि लाइफ ऑफ रीझन या ग्रंथात सांतायानांनी मानवी प्रगतीच्या टप्प्यांची सैद्घांतिक चर्चा केली आहे. ⇨ हेगेल च्या फिनॉमिनॉलॉजी ऑफ माइंड या ग्रंथाने अंशतः प्रभावित असल्याचे सांतायाना मान्य करतात. हेगेलच्या या चिद्वादी विचाराच्या ग्रंथानुसार मानवी मन आपल्या परिसराशी असलेले आपले नाते वेगवेगळ्या दृष्टिकोनांच्या– वैज्ञानिक, नैतिक, धार्मिक व सौंदर्यशास्त्रीय–साहाय्याने क्रमाक्रमाने निश्चित करत जाते आणि ही कल्पना सांतायानांना भावली पण चिद्वादी विचारधारेतील एक त्रुटी ही होती, की मानवी मनाची उत्क्रांती ही भौतिक निसर्गावर अवलंबून असते तसेच आपल्यातील पशुत्वातून निर्माण होणाऱ्या ताणतणावांना ही उत्क्रांती प्रतिसाद देत असते ही गोष्ट चिद्वादी विसरतात. ही त्रुटी भरून काढण्यासाठी सांतायाना रीझन इन कॉमनसेन्स (सामान्य समजुतीतील बौद्घिकता) या खंडाने ग्रंथाची सुरुवात करतात व त्यानंतरच्या खंडांना अनुक्रमे ‘समाजातील बौद्घिकता’, ‘धर्मातील बौद्घिकता’, ‘कलेतील बौद्घिकता’ व ‘विज्ञानातील बौद्घिकता’ (सर्व म. शी.) अशी नावे देतात. प्रथम खंडात सांतायाना सांगतात की, मानवी बुद्घीची पहिली अनुल्लंघ्य कामगिरी म्हणजे तिने लावलेला नैसर्गिक वस्तूंचा शोध. येथे मानवी बुद्घीच्या संदर्भात कल्पनाशक्तीचे कार्यही ते स्पष्ट करतात. कल्पनाशक्तीला वस्तुस्थितीचे स्वरूप निश्चित करण्याच्या बाबतीत मुक्त वाव देता कामा नये, पण त्याचबरोबर आदर्श निर्मिती व प्रतीकात्मक नवनिर्मिती यांच्या साहाय्याने मानवी आनंदात भर घालण्याचे कल्पनाशक्तीचे कार्य मान्य केले पाहिजे असा सांतायानांचा दुहेरी दृष्टिकोण होता. कल्पनाशक्ती जेव्हा वस्तुस्थितीचे स्वरूप निश्चित करू पाहते व अक्षरशः यथार्थतेचा दावा करते तेव्हा ती धर्माचे स्वरूप धारण करते. अशा रीतीने सांतायानांच्या मते धर्म हे एक मिथक ठरते.
सांतायानांचे सामाजिक चिंतन उदारमतवाद किंवा लोकशाही मूल्यांना अनुकूल नव्हते. ‘समाजातील बौद्घिकता’ या खंडात तसेच डॉमिनेशन्स अँड पॉवर्स (१९५१) या नंतरच्या ग्रंथात त्यांचा हा दृष्टिकोण व्यक्त झालेला दिसतो. सांतायानांच्या मते मानवी समाज हा अनिवार्यपणे अभिजनवादी व उच्चनीचश्रेणीयुक्त असतो. समतावादी लोकशाही ही विषमतामूलक अन्यायाच्या निराकरणाबरोबरच माणसांतील नैसर्गिक विविधता नाकारण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न करते असे त्यांना वाटे.
उत्तरायुष्यात सांतायानांनी लिहिलेले दोन महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे स्केप्टिसिझम अँड ॲनिमल फेथ (१९२३) आणि दि रेल्म्स ऑफ बीइंग (४ खंड, १९२७–४०). यांपैकी पहिला ग्रंथ हा दुसऱ्या ग्रंथाची प्रस्तावना म्हणता येईल. या पहिल्या ग्रंथात चिद्वादाने प्रभावित संशयवादाची चिकित्सा करून त्यांनी पशुसुलभ श्रद्घांचे (ॲनिमल फेथ) महत्त्व प्रतिपादिले आहे. उदा., बाह्य जगाच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या संशयवादी युक्तिवादाबाबत सांतायानांचे म्हणणे आहे, की अशा युक्तिवादांनी केवळ बाह्य जगाच्या अस्तित्वाविषयीच्या आपल्या विश्वासांवर मर्यादा पडते असे नाही, तर आपले मन, इतरांचे मन तसेच भूतकाळ, भविष्यकाळ यांच्या अस्तित्वावरील विश्वासावरही मर्यादा पडते. म्हणजेच त्यामुळे केवळ जडवाद प्रश्नांकित होतो असे नाही, तर चिद्वादही प्रश्नांकित होतो. या संशयवादातून फक्त सारतत्त्वांचे (इसेन्सेस) अस्तित्व प्राथमिक व अनिवार्य म्हणून शिल्लक राहते पण सारतत्त्वे ही वस्तू व घटनांशिवाय पृथक्पणे विचारात घेता येत नाहीत आणि येथे पशुसुलभ श्रद्घा महत्त्वाची ठरते. या श्रद्घेचे प्रामाण्य सिद्घ करता येत नाही पण मानवी शहाणपणाचा प्रारंभबिंदू म्हणून तिचे महत्त्व स्वीकारावे लागते. या कल्पनेचाच पुढील विस्तार दि रेल्म्स ऑफ बीइंग या ग्रंथात सांतायाना करतात व चार अस्तित्वरीतींचे (मोड्स ऑफ बीइंग) प्रतिपादन करतात. सारतत्त्व, जडतत्त्व, सत्यता आणि आत्मतत्त्व (स्पिरिट) या त्या चार अस्तित्वरीती होत.
सांतायानांच्या तत्त्वज्ञानपर लेखनाचे पूर्वीचे (१८९६–१९०६ या काळातील) व नंतरचे (१९२३–४९ या काळातील) असे दोन टप्पे कल्पिता येत असले, तरी त्यांच्या तात्त्विक दृष्टिकोनात दुसऱ्या टप्प्यावर मूलभूत परिवर्तन झाले असे म्हणता येत नाही. पूर्वी जे तत्त्वज्ञान त्यांनी जास्तकरून मानसशास्त्रीय परिभाषेत मांडले, त्याला काटेकोर तात्त्विक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न त्यांनी उत्तर आयुष्यात केला असे म्हणता येईल.
सांतायानांच्या अन्य ग्रंथांत इंटरप्रिटेशन्स ऑफ पोएट्री अँड रिलिजन (१९००), थ्री फिलॉसॉफिकल पोएट्स: लूक्रिशिअस, दान्ते अँड गटे (१९१०), एगोटिझम इन जर्मन फिलॉसफी (१९१५),प्लेटॉनिझम अँड दि स्पिरिच्यूअल लाइफ (१९२७), सम टर्न्स ऑफ थॉट इन मॉडर्न फिलॉसफी (१९३३) अशा काही ग्रंथांचा समावेश होतो.
सांतायानांच्या कविता सॉनेट्स अँड अदर व्हर्सेस (१८९४)मध्ये संगृहीत आहेत. द लास्ट प्यूरिटन (१९३५) ही त्यांची कादंबरी असून पर्सन्स अँड प्लेसिस (१९४४), द मिड्ल स्पॅन (१९४५) आणि माय होस्ट द वर्ल्ड (१९५३) ह्या तीन भागांत त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे.
रोम येथे त्यांचे वृद्घापकाळाने निधन झाले.
संदर्भ : 1. Howgate, George W. George Santayana, Philadelphia, 1971.
2. Munitz, Milton Karl, The Moral Philosophy of Santayana, New York, 1972.
3. Schilpp, Paul Arthur, Ed. The Philosophy of George Santayana, Chicago, 1940.
गोखले, प्रदीप
“