सँडबी, पॉल : (१७२५–७ नोव्हेंबर १८०९). इंग्लिश चित्रकार व उत्कीर्णनकार. जन्म नॉटिंगहॅम येथे. तो आणि त्याचा भाऊ टॉमस सँडबी (१७२१–९८) हे १७४२ मध्ये लंडनला आले. टॉवर ऑफ लंडन येथे सैनिकी रेखन कार्यालयात (मिलिटरी ड्रॉइंग ऑफिस) त्यांना नोकरी मिळाली. प्रदेशवर्णनात्मक रेखाटन करणारे आरेखक म्हणून त्यांची नेमणूक तत्कालीन राज्यकर्त्यांनी केली होती. पॉलला या कामी स्कॉटलंडमध्ये उच्चभूमीच्या (हायलँड) भूसर्वेक्षणासाठी व रेखने करण्यासाठी पाठविण्यात आले. तो काही वर्षे स्कॉटलंडमध्ये राहिला. या काळात त्याने तेथील भूप्रदेशाचे अचूक व भावपूर्ण चित्रण तर केलेच शिवाय तेथील वातावरणही संवेदनाक्षम नजरेने टिपले. त्याने मानवाकृती चित्रणाचाही कसून अभ्यास केला. त्याने अम्लरेखन (इचिंग) तंत्राचा वापर करून व्यक्तिचित्रे रेखाटली आणि इंग्लंडमध्ये ताम्र-उत्कीर्णन (तांबे धातूवरील खोदकाम) तंत्राची प्रकिया प्रथमतः सुरु करून रूढ केली. स्कॉटिश निसर्गदृश्ये व व्यक्तिरेखा यांची त्याने काढलेली रेखाचित्रे व उत्कीर्णने प्रसिद्घ आहेत. सुमारे १७५२ पासून त्याचे वास्तव्य लंडन येथे होते. तो वारंवार विंझरला जात असे. त्याची बव्हंशी चित्रनिर्मिती विंझर परिसरातील आहे. त्याचा भाऊ टॉमस हा तेथील जंगलपरिसरात (विंझरफॉरेस्ट) वनाधिकारी होता. पॉल याने १७७० पासून वेल्सला वारंवार भेटी दिल्या आणि तेथील निसर्गदृश्यांची चित्रे रंगविली. जलरंग माध्यमात निसर्गचित्रे रंगविणाऱ्या सर्वांत आद्य इंग्लिश चित्रकारांपैकी तो एक होता. ⇨जलरंगचित्रण कलेचा तो आद्य जनक मानला जातो पण हे मत वस्तुस्थितीला धरून नाही. त्याने शाईचा उपयोग न करता केवळ जलरंगाचाच वापर करून जलरंगचित्रणाचे स्वायत्त (ऑटोनॉमस) तंत्र विकसित केले. मुख्यत्वे पारदर्शी जलरंगचित्रणतंत्राचा वापर करून तो चित्रे रंगवत असे. स्थूल वा जाड जलरंगपद्घतीचे (गूआश) तंत्र वापरून त्याने विंझर येथील निसर्गदृश्यांची, भव्य आकारांची चित्रमालिका रंगविली. त्याचे हे जलरंगचित्रण तुलनात्मक दृष्ट्या तैलरंग माध्यमाच्याच तोडीचे आहे. पूर्वीच्या इंग्लिश निसर्गचित्रांत प्राबल्याने आढळणारे करडे व मातकट तपकिरी रंग कमी करून त्याने अधिक शुद्घ आणि तजेलदार रंगांचा वापर केला व त्यायोगे निसर्गचित्रणात अधिक जिवंतपणा आणला. ‘इंग्लंडमधील प्रदेशांची हुबेहूब अस्सल व वास्तव निसर्गचित्रे रंगविणारा एकमेव प्रतिभावंत’ असा त्याचा सार्थ गौरव त्याचा समकालीन इंग्लिश चित्रकार गेन्सबरो (१७२७– ८८) याने केला आहे. लंडन येथे पॉलचे निधन झाले. त्याचा भाऊ टॉमस हाही चित्रकार व रॉयलअकॅडेमीचा संस्थापक-सदस्य होता, तसेच या संस्थेत वास्तुकला विषयाचा पहिला प्राध्यापक होता. त्याने अनेक जलरंगचित्रे रंगविली. त्या चित्रांचे पॉलच्या चित्रांशी विलक्षण साधर्म्य आढळते मात्र त्याने वास्तुकलाविषयक जी आरेखने केली, त्यांत त्याची स्वतंत्र गुणवत्ता दिसून येते.

इनामदार, श्री. दे.