श्री शिवछत्रपति राज्य क्रीडा पुरस्कार : क्रीडा- क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील गुणवान खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे पुरस्कार. व्यक्तिगत स्वरूपाचे हे पुरस्कार देण्यास १९६९-७० सालापासून प्रारंभ झाला.
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारांतर्गत दादोजी कोंडदेव, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला) आणि एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू) असे आणखी तीन राज्य क्रीडा पुरस्कार पात्र व्यक्तींना देण्यात येतात. या पुरस्कारांची निवडसमिती, क्रीडांचे प्रकार, पुरस्कर्त्यांची निवड, गुणांकन पद्धती, पारितोषिकांची रक्कम इत्यादींसंबंधी ह्या पुरस्कारांच्या स्थापनेपासून आतापर्यंत त्या संदर्भातील नियमांत अनेक बदल/सुधारणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागातर्फे प्रसिद्ध केलेल्या २००६-०७ परिशिष्टात तत्संबंधी अद्ययावत माहिती मिळते.
या पुरस्कार-योजनेचा प्रमुख उद्देश विविध प्रकारच्या खेळांमध्ये सातत्याने चमकणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करणे आणि नवोदित, होतकरू खेळाडूंना उत्तेजन देणे हा आहे. महाराष्ट्रातील सर्वच खेळांचा दर्जा वाढविणे, हाही त्यामागे एक हेतू आहे. ऑलिंपिक क्रीडा-चळवळीच्या ध्येयवाक्यात ‘ अधिक उंच, अधिक जलद आणि अधिक बलशाली ’ हा जो संदेश देण्यात येतो, तोच महाराष्ट्रीय खेळाडूंनी प्रत्यक्षात खरा करून दाखवावा आणि देशात व परदेशांत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, ही प्रेरक भावनाही या पुरस्कार-योजनेमागे आहे.
या पुरस्कारासाठी ३० जून रोजी संपणारे वर्ष धरून त्या पूर्वीच्या पाच वर्षां पैकी तीन वर्षांमध्ये त्या खेळाडूने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर केलेल्या कामगिरीचे व क्रीडानैपुण्याचे मूल्यमापन केले जाते. या निकषांवर पारखलेल्या व सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्याचबरोबर राज्य क्रीडा संघटनांकडून आलेल्या शिफारशींचा आणि खेळाडूंनी वैयक्तिक रीत्या सादर केलेल्या अर्जांचाही विचार केला जातो. शासनाने नियुक्त केलेल्या समितीतर्फे सर्व शिफारशींची व अर्जांची छाननी केली जाते. ही समितीच श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे मानकरी निश्चित करते. दरवर्षी जास्तीत जास्त दोन व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो मात्र पुरस्कार विभागून दिला जात नाही. उदा., एखादया खेळामध्ये दोन खेळाडूंना समान सर्वाधिक गुण प्राप्त झाले असतील, तर त्यांपैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या खेळाडूची निवड पुरस्कारासाठी करण्यात येते. दोन खेळाडूंचे वय सारखे आढळल्यास अपवाद म्हणून दोनही खेळाडूंना पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार प्रदान कार्यात पारदर्शकता रहावी, यासाठी विविध खेळांसाठी वेगवेगळे निकष व नियम आहेत आणि त्या त्या नियमां-निकषांनुसार खेळाडूंची पुरस्कारांसाठी निवड केली जाते. एखादया क्रीडाप्रकारात पुरस्कार दिल्यानंतर खेळाडूने अर्जासोबत खोटी प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली असल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्यास, अशा खेळाडूस देण्यात आलेला पुरस्कार परत घेण्यात यावा आणि त्या खेळाडूविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, अशी तरतूद या नियमां-निकषांतर्गत केली आहे.
पुरस्कार-योजनेच्या पहिल्या वर्षी म्हणजे १९६९-७० साली फक्त सहा क्रीडापटूंनाच हे पुरस्कार देण्यात आले. त्यांत पाच पुरूष व एक स्त्री-खेळाडू होते. त्या वर्षी जलतरण, बॅडमिंटन, कबड्डी, खोखो, कुस्ती व बिल्यर्ड्झ या सहा क्रीडाप्रकारांचाच विचार करण्यात आला होता. त्यानंतर क्रीडाप्रकारांची व पुरस्कारांची संख्या वाढत गेली. पुरस्कारांचे पहिले दशक संपताना पुरस्कार-विजेत्यांची संख्या पस्तीस झाली. १९८५-८६ पर्यंत ती संख्या ६५ झाली. १९९२-९३ मध्ये या पुरस्काराचे ५६ मानकरी होते तर १९९६-९७ मध्ये ५३. अशा रीतीने महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या ठिकाणी व ज्यांनी ज्यांनी विविध क्रीडास्पर्धांत पराकम गाजविला, त्या सर्वांची दखल शासनाच्या क्रीडाखात्याने घेतलेली आढळते. १९९७-९८ अखेरपर्यंत श्रीशिवछत्रपती पुरस्काराच्या मानकऱ्यांची संख्या अशी : पुरूष-खेळाडू ४९५ व स्त्री-खेळाडू ३४५.
याशिवाय १९७०-७१ सालापासून क्रीडा कार्यकर्त्यांनाही पुरस्कार देण्यास सुरूवात झाली. ज्या क्रीडा संघटकांनी क्रीडाक्षेत्रात भरीव कार्य केलेले असेल व दीर्घ कालापर्यंत स्पृहणीय क्रीडासेवा केलेली असेल, त्यांना श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. याशिवाय राज्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी व योगदान असणाऱ्या एका महिला कार्यकर्तीस/संघटकास ‘ जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार ’ देऊन गौरविण्यात येते. एका पुरस्कार-वर्षामध्ये क्रीडा संचालनालयाच्या अधिकारक्षेत्रामधील मुंबई, नासिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या विभागनिहाय जास्तीत जास्त प्रत्येकी एक असे आठ पुरस्कार देण्यात येतात. महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या वय वर्षे ५० किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या पुरूष संघटक/कार्यकर्ता यांचा, तसेच वय वर्षे ४० किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या महिला संघटक/कार्यकर्ती यांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो.
याखेरीज आणखी एक उपकम १९७७-७८ सालापासून अंमलात आणण्यात आला. अपंग (पॅराप्लेजिक) खेळाडूंनाही पुरस्कार देण्याचा प्रघात सुरू झाला. त्यामुळे शरीराने विकलांग असणाऱ्या खेळाडूंना फार मोठा हुरूप आला व आपले क्रीडाकौशल्य दाखविण्यास त्यांनाही वाव मिळाला. ‘ नॅशनल पॅरा ऑलिंपिक कमिटी ऑफ इंडिया ’द्वारा आयोजित वरिष्ठ गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत, तसेच ‘महाराष्ट्र पॅरा ऑलिंपिक संघटने’ द्वारा आयोजित वरिष्ठ गटातील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अत्युत्कृष्ट नैपुण्य दाखविणारे खेळाडू या पुरस्कारासाठी पात्र ठरतात. १९९७-९८ अखेरपर्यंत एकूण ५७ अपंग खेळाडूंना हे पुरस्कार लाभले. २००६ पासून या पुरस्कारांना ‘एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार’ असे संबोधण्यात येऊ लागले.
प्रारंभी सहा खेळांपुरत्या असलेल्या या पुरस्कार-योजनेत आता अश्वारोहण, ॲथलेटिक्स, कॅरम, गोल्फ, जलतरण (डायव्हिंगसह), जिम्नॅस्टिक्स, जूदो, तलवारबाजी, तायक्वांदो (मार्शल आर्टचा एक प्रकार), धनुर्विदया, नेमबाजी, टेनिस, टेबल-टेनिस, ट्रायथलॉन (एका पाठोपाठ एक अशी जलतरण, सायकल चालविणे व धावण्याची तिहेरी स्पर्धा), पॉवर लिफ्टिंग, बेंच प्रेस (बाकावर झोपून विशिष्ट प्रकारे वजन उचलण्याचा एक प्रकार), बुद्धीबळ, मल्लखांब, ‘ वुशू’ [पारंपरिक चिनी मार्शल आर्टचा (युद्धकला) एक प्रकारे], मुष्टियुद्ध, वजन उचलणे, शरीरसौष्ठव, सायकलिंग, स्नुकर, स्केटिंग इ. खेळांचाही समावेश झालेला आहे.
याबरोबरच नवीन नियमाप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन एक ते तीन मानांकन मिळविणाऱ्या खेळाडूंना विशेष पुरस्कार देण्यात येतो. या विशेष पुरस्काराचे काही प्रमुख मानकरी पुढीलप्रमाणे : अजित वाडेकर (क्रिकेट १९७१-७२), एकनाथ सोळकर (क्रिकेट १९८५-८६), अशोक भेरवकर (मोटोकॉस १९८५-८६), सूर्यकांत पाटील (कबड्डी १९८९-९०), धनराज पिल्ले (हॉकी १९८९-९०), चंद्रशेखर शेट्टी (कराटे १९९२-९३) व १९९८ साली एव्हरेस्ट (गौरीशंकर)सरकरणाऱ्या सुरेंद्र चव्हाणला श्रीशिवछत्रपती पुरस्कार जाहीर करून गौरविण्यात आले.
पूर्वी पुरस्कार-विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल व प्रवासखर्च देण्यात येत असे. पुरस्कारापोटी भरीव रक्कम दिली जात नसे. सध्या मात्र स्मृतिमानचिन्ह व प्रमाणपत्राबरोबरच पन्नास हजार रूपयांचे मानधन दिले जाते तथापि शासकीय, निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शारीरिक शिक्षणाशी संबंधित कर्मचारी / अधिकारी या पुरस्कारासाठी पात्र ठरल्यास त्यास फक्त रूपये पंचवीस हजारांचे मानधन आणि एस्. टी. प्रवासासाठी विनामूल्य परवाना दिला जातो. शिवाय प्रत्येकाला ब्लेझर (कोट) दिला जातो.
दादोजी कोंडदेव पुरस्कार : ही पुरस्कार-योजना १९८८-८९ सालापासून सुरू करण्यात आलेली असून ती खास क्रीडाशिक्षकांसाठी व क्रीडामार्गदर्शकांसाठी आहे. केंद्र सरकारच्या द्रोणाचार्य पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही ‘दादोजी कोंडदेव पुरस्कार’ योजना सुरू केलेली आहे.
खेळाडूंच्या व्यक्तिगत यशात त्यांच्या शिक्षकांचाही मोठा वाटा असतो. शिक्षकच खेळाडूला खेळाचे तंत्र व मंत्र शिकवीत असतो. तसेच त्याच्या खेळातील दोष सुधारण्यास मदत करतो. एवढेच नव्हे, तर खेळाडूंत संघ-शक्ती निर्माण करणे, सांघिक भावना व खिलाडूवृत्ती वाढविणे हे महत्त्वाचे कार्यही तो करतो. यासाठी यशस्वी व उत्कृष्ट मार्गदर्शकांना पुरस्कार देऊन त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याचीही प्रथा सुरू झाली. मार्गदर्शकांनी खेळाचे तांत्रिक बारकावे समजून घ्यावेत व उत्कृष्ट, पराक्रमी खेळाडू तयार करावेत, हा त्यामागे प्रधान हेतू आहे.
या पुरस्काराची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून तज्ज्ञ मार्गदर्शक दुर्लक्षित राहीनासा झाला व गुणवान खेळाडू घडविण्याचे कार्य तो हिरिरीने करू लागला.
या योजनेनुसार प्रतिवर्षी किमान तीन पुरस्कार प्रदान केले जातात. तज्ज्ञ शिक्षकाची यासाठी केली जाणारी निवड त्याच्या अनुभवावर व त्याने तयार केलेल्या खेळाडूच्या दर्जावर ठरते. त्यासाठी वेगळी निवडसमिती असते, तीत अर्जुन/द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त व्यक्ती आवश्यक राहील मात्र अशी व्यक्ती महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेमध्ये नसल्यास, शासनास अशी व्यक्ती नेमण्याचे अधिकार राहतील, असा बदल केला आहे. ही समिती अधिकृत संघटनेमार्फत आयोजित कनिष्ठ व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंचा मूळ मार्गदर्शक, तसेच भारतीय शालेय खेळ महासंघद्वारा आयोजित शालेय राष्ट्रीय क्रीडास्पर्धेतील खेळाडूंचा मूळ मार्गदर्शक असावी. शिवाय अपंग, मूकबधीर खेळाडूंकरिता विहित केलेल्या आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय क्रीडास्पर्धांत पदक संपादन केलेल्या खेळाडूंचा मूळ मार्गदर्शक असावी. पुरस्कार-विजेत्याला स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक रूपये ५०,००० व प्रमाणपत्र देण्यात येते. यातील काही प्रमुख मानकरी : चंद्रकांत केळकर (१९८८-८९), जयवंतसिंग गेवाल (१९८८-८९), विठ्ठल पाटील (१९८९-९०), वसंत अमलाडी (१९९०-९१), रमाकांत आचरेकर (१९९१-९२), मोरेश्वर गुर्जर (१९९१-९२), अंकुश वैदय (१९९४-९५) इत्यादी. यांपैकी रमाकांत आचरेकर हे सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांसारख्या नामवंत क्रिकेटपटूंचे प्रशिक्षक होते.
पंडित, बाळ ज.
“