शैक्षणिक तत्त्वज्ञान : शैक्षणिक तत्त्वज्ञान या संकल्पनेची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि आवश्यकता समजण्यासाठी ⇨ शिक्षण आणि ⇨ तत्त्वज्ञान म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक असते.

शिकणे ही एक मानसशास्त्रीय क्रिया आहे, तर शिक्षण या संकल्पनेची व्याप्ती मोठी आहे. शिक्षण हे शाळेबरोबर संपत नाही, तर ते जन्मभर चालू असते. तसेच शिक्षण हे शाळेबाहेरही चालू असते. यातूनच औपचारिक व अनौपचारिक शिक्षण या संकल्पना पुढे आल्या.

मानवाला ज्ञात असलेली बरीच शास्त्रे वर्णनात्मक असतात मात्र तत्त्वज्ञान हे मूल्यमापनात्मक शास्त्र आहे. ते कोणत्याही गोष्टीचे मूल्य, हेतू आणि उपयोग काय आहे, हे पाहणारे शास्त्र आहे, एखादया लहान घटनेपासून ते थेट विश्वयोजनेपर्यंत सर्व गोष्टींचा व अनुभवांचा गूढार्थ शोधून काढणे व शास्त्रशुद्घ संगती लावणे, हा तत्त्वज्ञानाचा विषय आहे. तत्त्वज्ञान काहीसे अव्यक्त असते व या शास्त्रात तर्कशास्त्राच्या साहाय्याने विचार करावयाचा असतो. तत्त्वज्ञानात मोठमोठया गहन प्रश्नांचा विचार केला जातो. थोडक्यात मानवाच्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान होय. विश्वाच्या व जीवनाच्या वैविध्यपूर्ण तपशीलाचे सर्वसमावेशक असे संकलन करण्याचा प्रयत्न म्हणजे तत्त्वज्ञान होय. मानवाला येणाऱ्या विविध अनुभवांची संगती लावणे, त्यात एकसूत्रीपणा आणणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य होय.

एका अर्थाने तत्त्वज्ञान व शिक्षण यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती ही एकच आहेत असे म्हणता येईल. शिक्षणाने मनुष्य ज्ञानसंपन्न व सद्‌गुणी व्हावा, त्याला उत्कृष्ट जीवनाचा लाभ व्हावा आणि कृतार्थतेचे समाधान लाभावे, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. का शिकवावे, कसे शिकवावे या प्रश्नांची उत्तरे या अपेक्षांनी दिली जातात. पण त्यातील उत्कृष्ट जीवन म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र यांकडे वळावे लागते. आदर्श, सुखी वा सफल, परिपूर्ण जीवन या विषयींच्या कल्पना तत्त्वज्ञानातून मिळतात. त्या साकार करण्याचा प्रयत्न शिक्षण करीत असते. याचा अर्थ असा की शिक्षण ही तत्त्वज्ञानाची क्रियात्मक, गतिमान, आचारात्मक बाजू आहे. तत्त्वज्ञान व त्याचा आचार यांत जर फारकत करावयाची नसेल, तर तत्त्वज्ञानाला शिक्षणाची जोड हवी. जिज्ञासा आणि चौकशी हीच दोहोंची पद्धती आहे. गतिमान तत्त्वज्ञान म्हणजे शिक्षण होय. तत्त्वज्ञानाप्रमाणे शिक्षणशास्त्रही जीवनाचा शोध घ्यावयाला व त्याचे स्वरूप समजून घ्यावयाला शिकवीत असते. जिज्ञासा आणि अन्वेषण हीच दोहोंची पद्घत असते.

शैक्षणिक तत्त्वज्ञानाच्या आवश्यकतेबद्दल ⇨  ॲरिस्टॉटल सारख्या तत्त्वज्ञानेही लिहून ठेवले आहे. सद्‌गुणांची जोपासना व समृद्घ जीवन यांपैकी शिक्षणाचे उद्दिष्ट कोणते असावे, आपण कशाची शिकवण घ्यावी असे प्रश्न समाजापुढे आहेत. शिक्षणाचा संबंध बौद्धिक सद्‌गुणांशी आहे, की नैतिक गुणांशी यांबाबत तज्ज्ञांत मतभेद आहेत. शिक्षणाचे ध्येय नेमके कोणते असावे, सद्‌गुणांच्या जोपासनेवर भर किती दयावा, जीवनोपयोगी गोष्टींना महत्त्व द्यावे की, अत्युच्च ज्ञानाची प्राप्ती करावी यांविषयी मतभेद आहेत. सद्‌गुणांबद्दल विविध लोकांच्या नाना कल्पना असल्याने त्याचेही प्रतिबिंब शिक्षणामध्ये पडते. शैक्षणिक तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.

तात्त्विक सिद्धांताचा शैक्षणिक आचाराशी घनिष्ट संबंध असतो. तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांमध्ये जो फरक असतो, तो सिद्धांताच्या प्रायोगिक कसोटीचा नसून सिद्धांताच्या व्याप्तीबाबत आहे. प्रयोगात विज्ञान परिवर्तकावर कसोशीने नियंत्रण ठेवते, तत्त्वज्ञान अशी कसलीच मर्यादा स्वीकारत नाही. विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोघांचेही आपापल्या परीने फायदे आहेत तशा मर्यादाही आहेत. विज्ञान वस्तुनिष्ठता आणि विश्वासार्हता मोलाचे मानते, परंतु व्यापकपणावर पाणी सोडते. तत्त्वज्ञान मात्र व्यापकपणाचा लाभ मिळविते. शिक्षणशास्त्राला विज्ञान व तत्त्वज्ञान या दोहोंची आवश्यकता असते त्यामुळे निष्कर्ष एकाचवेळी वस्तुनिष्ठ, विश्वासार्ह आणि व्यापकही असू शकतात. काही लोक विज्ञानाच्या मानाने तत्त्वज्ञानाला दुय्यम लेखतात. ते प्रयोगांना व त्यातून निघणाऱ्या निष्कर्षांना अत्युच्च स्थान देतात. त्यांना असे वाटते की, शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रश्नांची उत्तरे प्रयोगाच्या साहाय्याने मिळू शकतील. त्यांना असेही वाटते की, वैज्ञानिक उत्तरे जसजशी संचित होत जातील तसतशी तत्त्वज्ञानाची गरज कमी होईल. मात्र काहींचे म्हणणे असेही आहे की, शैक्षणिक प्रकियेचे स्पष्टीकरण देण्याच्या कामी तत्त्वज्ञान विज्ञानापेक्षा सरस आहे. तत्त्वज्ञान विज्ञानापेक्षा अधिक परिपूर्ण व समाधानकारक स्पष्टीकरण देते. त्यामुळे अनेकांना तत्त्वज्ञान आणि शैक्षणिक तत्त्वज्ञान हे एकरूप झाल्यासारखेच वाटते.

गेल्या काही शतकांत झाले नाहीत, एवढे बदल विसाव्या शतकात झाले. दोन महायुद्घे झाली, अनेक शास्त्रीय शोध लागले, संहारक अस्त्रे निर्माण झाली, दूरध्वनीच्या वापरात आमूलाग्र सुधारणा झाल्या, जग अधिकजवळआले, राजेशाही नष्ट होऊन लोकशाही स्थापन झाली, ७० वर्षांची रशियातील कम्युनिस्ट राजवट उन्मळून पडली, तरीही चीन, क्यूबा इ. राष्ट्रांत हुकूमशाही राजवटी राज्य करीतच आहेत. कृषि-वाणिज्य व्यवस्थेवर आधारलेले अर्थशास्त्र मागे पडले असून औदयोगिक उत्पादनांचे व भारतासारख्या देशात सेवाक्षेत्रातून राष्ट्रीय संपत्ती निर्माण करण्याची अर्थव्यवस्था प्रस्थापित होत आहे. विज्ञानातील विलक्षण प्रगतीमुळे लाभलेल्या सामर्थ्याने बौद्धिक जगात कल्पनांची भरती-ओहोटी सुरू आहे, ती अभूतपूर्व आहे. त्यामुळे इ. स. पू. चौथ्या शतकात ॲरिस्टॉटलला जसे प्रश्न पडले होते, तसे आजही पडत आहेत. ते असे : ज्या गतिमान अर्थ आणि समाजव्यवस्थेत आपण जगत आहोत त्या व्यवस्थेत यशस्वीपणे जगण्यासाठी तरूण पिढीला कोणते व कसे शिक्षण द्यावे ? परिस्थितीतच अनिश्चितता असल्याने प्रश्नांची उत्तरेही संदिग्ध व चाचरतच द्यावयास हवीत. काहींना असे वाटते की, या परिस्थितीत प्रगतशील स्वरूपाचे शिक्षण द्यावे. अशा शिक्षणात अनुभवांची सतत पुनर्रचना होत असते. मात्र काहींचे असे मत आहे की, परंपरावादी शिक्षणच व्यक्तीला योग्य मार्ग दाखवू शकेल कारण परंपरागत अभ्यासक्रमात चिरंतन व शाश्वत मूल्ये असतात व ती व्यक्तीला संस्कारक्षम बनवितात. अर्थातच तात्कालिक उपयुक्तता आणि श्रेष्ठतर मूल्ये यांमधील वाद केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित नसतो तो शिक्षणाच्या पद्धती आणि साधने यांनाही लागू होतो. शाश्वत मूल्ये डोळ्यासमोर ठेवून शिक्षणसंस्कार करणारी व्यक्ती अधिकारानुवर्ती असण्याचा संभव अधिक असतो. याउलट वर्तमानकालीन गरजांशी अनुसंधान राखणारा शिक्षक आपल्या अध्यापनपद्धतीत जिवंतपणा ठेवणारा व लोकशाहीवादी असण्याचा संभव असतो. असेही म्हटले जाते की, प्रत्येक शिक्षकाला स्वतःचेच शिक्षणविषयक तत्त्वज्ञान असते, शिक्षणाकडे पाहण्याचा त्याचा एक दृष्टिकोन असतो. मात्र व्यावहारिक बुद्धीला विशाल रूप देण्याची व तिला परिष्कृत करण्याची तत्त्वज्ञानाची पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळी असते. विज्ञान मर्यादित घटकांचा अभ्यास करते. तत्त्वज्ञान त्यापेक्षा कितीतरी अधिक घटकांचा परामर्श घेते. शैक्षणिक तत्त्वमीमांसाजेव्हा विचारात्मक वा तर्कनिष्ठ स्वरूप धारण करते, तेव्हा सर्व शास्त्रांचे ती संक्षेपाने समालोचन करते. काही शैक्षणिक तत्त्वमीमांसा अनुभवनिष्ठ आहेत. तर काही प्रत्यक्षानुभवावर न विसंबणाऱ्या आहेत. त्यांच्या मतातील अंतरामुळे शिक्षणात गंभीर समस्या निर्माण होतात. शिक्षणात अनेक तत्त्व-मीमांसा निर्माण होतात. जेव्हा विचारवंत आपलेच तत्त्वज्ञान खरे असे ठामपणे म्हणू लागतात, तेव्हा अडचणी निर्माण होतात. एखादे संयुक्त शालेय कार्य परस्परांच्या सहकार्याने पार पाडणे अवघड होऊन बसते. मात्र अनेकांना असे वाटते की, तत्त्वज्ञानाचे काम शैक्षणिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ध्येये, आदर्श वा मानदंड निर्माण करणे व शैक्षणिक आचार-प्रकियांचे नेतृत्त्व करण्याचे आहे. शैक्षणिक तत्त्वज्ञानाने आचारात रूढ व परिचित असणाऱ्या गोष्टींना सुसंबद्घ, तर्कशुद्घ आकार द्यावयाचा असतो. विविध आचारांच्या मुळाशी कोणता समान सिद्धांत आहे, हे त्याने शक्य तितके सुसंगत रीतीने सांगावयाचे असते. शैक्षणिक तत्त्वज्ञान विचारात्मक कार्य पार पाडताना अन्य सांस्कृतिक क्षेत्रांप्रमाणे साहित्य, नीतिविषयक सिद्धांत, इतिहास आणि अन्य वर्तनविषयक शास्त्रे यांच्यातून सामग्री घेते. मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, मूल्ये हा केवळ तत्त्वज्ञानाचा प्रांत असतो तर घटना हा विज्ञानाचा.मात्र हे पूर्णतःखरे नाही,कारण अनेक वेळा मूल्ये ही घटनांच्या स्वरूपात पुढे येत असतात. एखादया समाजाची ध्येये काय आहेत, हे शोधण्यासाठी शास्त्राचे साहाय्य होऊ शकते, मात्र ती ध्येये वा मूल्ये इष्ट आहेत की नाहीत हे तत्त्वज्ञानालाच ठरवावे लागते. शिक्षण प्रकियेची उद्दिष्टे व ध्येये काय असावीत हे ठरविण्याचे काम त्यामुळेच शैक्षणिक तत्त्वज्ञानालाच करावे लागते. त्यावरूनच अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व मूल्यमापन तंत्रे या गोष्टीही शैक्षणिक तत्त्वज्ञानाला ठरवाव्या लागतात. मात्र शिक्षणाचा विचार करताना त्यातील तत्त्वज्ञानाचे क्षेत्र कोणते व विज्ञानाचे कोणते हे रेखाटणे कठिण जाते. मात्र तत्त्वज्ञान आपल्याला हव्या असलेल्या निश्चित घटना इतिहास आणि विज्ञान यांच्याकडून घेते. या वास्तव घटनांचे चिकित्सापूर्वक विश्लेषण, त्यांचा आदर्शात्मक आशय आणि त्यांना आधारभूत असलेले सिद्धांत यांच्या संबंधांत तत्त्वज्ञान आपले वैशिष्ट्यपूर्ण कार्य करीत असते. त्यामुळे पुष्कळांना असे वाटते की तत्त्वज्ञान आणि शैक्षणिक तत्त्वज्ञान एकरूप आहेत. या मतानुसार तत्त्वज्ञान म्हणजे अत्यंत व्यापक स्वरूपातील शिक्षणाची मीमांसा होय. शिक्षणाची ध्येये, ज्ञानार्जनामागील प्रेरणा किंवा ज्ञानप्राप्तीचे मूल्यमापन ठरविणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे.


तत्त्वज्ञानाच्या कक्षेत अनेक प्रश्न येतात. जगात वास्तवता काय आहे? जगाचा कर्ता कोण आहे ? मानवाचा व त्याचा काय संबंध आहे ? हे ते प्रश्न होत. या प्रश्नांची उत्तरे तत्त्वज्ञांनी दिलेली आहेत. ती सर्व एकाच अर्थाची नाहीत. ज्यांनी ही उत्तरे दिली आहेत, त्यांचे चार प्रमुख पंथ पडले आहेत. ते म्हणजे अध्यात्मवाद, निसर्गवाद, कार्यवाद आणि वास्तवतावाद. प्राचीन भारतातील हिंदूंचे तत्त्वज्ञान अध्यात्मवादावर आधारलेले आहे. जीवनातील मूल्ये साध्य करून घेण्याचे शिक्षण हे साधन होय. अध्यात्मवादयांनी शिक्षणाबद्दल पुष्कळ वाङ्‌मय लिहून ठेवले आहे. त्यांच्या मते शिक्षणामध्ये विदयार्थ्याला श्रेष्ठ स्थान आहे. विदयार्थी शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. विदयार्थ्याच्या अंगी काही उपजत शक्ती आहेत. विदयार्थ्याला भावना आहेत, विचारशक्ती, इच्छाशक्ती व क्रियाशक्ती आहेत, हे शिक्षकाने समजून घेतले पाहिजे. विदयार्थी हा सचेतन, विकासशील आहे, त्याच्या अंगी काही सद्‌गुणांची व दुर्गुणांची बीजे आहेत. शिक्षणात विदयार्थ्याचा सर्व बाजूंनी विकास साधावयाचा आहे. विकास पावणे हा विदयार्थ्याचा जन्मसिद्घ गुण व हक्क आहे. विदयार्थी हा संस्कारक्षम, अनुकरणप्रिय व कार्यक्षम आहे. विदयार्थ्याला त्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणे, हे शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. शिक्षणाने त्याच्या सुप्तशक्ती जागृत झाल्या पाहिजेत व त्याला जगाचे खरे ज्ञान झाले पाहिजे. अध्यात्मवादयांच्या मते शिक्षक हा शिक्षणाचा कर्ता असतो. तो सर्व गुणांनी संपन्न असला पाहिजे. त्याचे व्यक्तिमत्त्व श्रेष्ठ स्वरूपाचे असले पाहिजे व त्याची छाप मुलांवर पडली पाहिजे. त्याला विषयाचे व अध्यापनपद्धतींचे ज्ञान असावयास हवे. त्याने शिस्त राखण्याची कला आत्मसात केली पाहिजे. मात्र मुलांचे स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते, हे त्याने विसरता कामा नये. अध्यात्म हा केंद्रबिंदू ठेवून त्याच्या भोवती अभ्यासक्रम आखावयास हवा. तसेच मुलांच्या मनात अभिरूची उत्पन्न होईल, अशी अभ्यासक्रमाची मांडणी हवी. अध्यात्मवाद हा तत्त्वज्ञानाचा फार प्राचीन पंथ आहे. मात्र तो समजायला बराच कठिण आहे. अध्यात्मवादाने माणसे आळशी व निष्किय बनतात असा एक आक्षेप आहे. सोळाव्या-सतराव्या शतकांत इंग्लिश विचारवंत ⇨ फ्रान्सिस बेकनने निसर्गवादाची मांडणी केली. मानवाने निसर्गाचे शास्त्रीय ज्ञान कसे मिळवावे, हे त्याने सांगितले. साहित्य जमविणे, प्रयोग करणे, अनुमान काढणे, ही उद्‌गामी पद्धती त्याने सांगितली. हे सर्व विश्व निसर्गाने निर्माण केले आहे व निसर्गाच्या जोरावर ते चालते आहे, हे यांचे तत्त्वज्ञान. निसर्गवादी देव मानत नाहीत, धर्मही मानत नाहीत. निसर्गाच्या पलीकडे काही चैतन्य आहे असे ते मानत नाहीत. त्यांच्या मते तत्त्वज्ञानाचे सर्व प्रश्न निसर्गाच्या विचाराने सोडविता येतात. तसेच शिक्षणात विदयार्थ्याला सर्वांत अधिक महत्त्व आहे. विदयार्थ्याला शरीर व मन आहे. त्याच्या विकासाचे काही नियम असतात, ते शिक्षकांना माहीत असले पाहिजेत. निसर्गवादयांनी विदयार्थ्याच्या वयाचे शैशव, बालपण, कौमार्य आणि तारूण्य असे कालखंड मानले आहेत. प्रत्येक कालखंडाची स्वतंत्र वैशिष्टये असतात व त्यांना अनुसरूनच बालकाला शिक्षण दिले पाहिजे. निसर्गाच्या दृष्टीने मुलाचा जसा विकास व्हावयास हवा, तसा होण्यास मदत करणे, हे शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. तसेच संपूर्ण जीवन जगण्याची मुलाची तयारी करून घेणे, हे शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. शिक्षक हा विचारी व कर्तबगार असला पाहिजे. मुले स्वप्रयत्नाने शिकतील असे वातावरण शिक्षकाने निर्माण केले पाहिजे. शिक्षणाच्या साधनांमध्ये पुस्तके, पदार्थ, प्रात्यक्षिकाला उपयुक्त साहित्य इत्यादींचा समावेश होतो. निसर्गवादयांच्या मताप्रमाणे सर्व प्रकारचे शिक्षण म्हणजे स्वशिक्षण होय, म्हणजे स्वप्रयत्नाने घेतलेले शिक्षण होय. निसर्गवादी स्वयं-शिस्तीवर भर देतात. मूल चुकले तर निसर्गामधून त्याला आपोआपच शिस्त मिळते. निसर्गवादी शिक्षणात शारीरिक आरोग्याचे महत्त्व आहे. निसर्गवादयांनी मुलाला अगस्थान मिळवून दिले.

अध्यात्मवादात परमात्म्याचे, तर निसर्गवादात निसर्गाचे महत्त्व सांगितले आहे. मात्र मनुष्याला फारसा मोठेपणा दिलेला नाही. तरीही सर्वत्र मनुष्याची कर्तबगारी दिसते. तो सृष्टीचे स्वरूपही बदलताना दिसतो, त्याला महत्त्व द्यावयास हवे. कार्यवादयांच्या मते मनुष्य हा सर्व गोष्टींचे केंद्र किंवा मोजमाप आहे. सुख, सत्ता व संपत्ती या गोष्टी मिळविण्याचा मनुष्य प्रयत्न करीत असतो.  ⇨जॉन ड्यूई हा कार्यवादाचा प्रमुख समर्थक आहे. तो लोकशाहीचा पुरस्कर्ता होता. त्याच्या मताप्रमाणे हे जग म्हणजे एक वाहणारा प्रवाह आहे. त्याचे वाहणे सतत चालू आहे आणि त्यामध्ये एकसारखे बदल होत आहेत. जगात आणि निसर्गात सतत बदल होत असतात. विश्वाची हीसंस्थाकाहीअंशीअपूर्णवअस्थिरआहे.मात्रजगाचाआधारम्हणून चैतन्य, परमात्मा किंवा आध्यात्मिक सत्य मानण्याची जरूरी नाही. त्यावरून असे दिसते की कार्यवादी नास्तिक, निरीश्वरवादी आहेत. कार्यवादी तत्त्वज्ञ मनुष्याच्या कर्तृत्त्वाला महत्त्व देतात. त्याची ज्ञानसाधना त्याला बाह्य जगाचा जो अनुभव येतो, त्या अनुभवांनी होते. कार्यवादी लोक नुसत्या ज्ञानाला, विचाराला महत्त्व देत नाहीत तर प्रत्यक्ष कार्याला, जीवनाला महत्त्व देतात. कार्यवादामध्ये प्रयोगपद्धतीला फार महत्त्व आहे. त्यामुळे कार्यवाद म्हणजे प्रयोगाचे तत्त्वज्ञान असे मानले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, कार्यवादयांच्या मते भूतकाळाच्या ज्ञानाची मनुष्याला जरूरी नाही आणि भविष्याचा विचार करण्याचीही जरूरी नाही. त्याने फक्त वर्तमानकाळाचा अनुभव मिळवावा आणि त्याप्रमाणे आचरण करीत रहावे. कार्यवादात समाजाला अगस्थान दिलेले आहे. मानवी समाज म्हणजे एखादी आगंतुक संस्था नव्हे ती सचेतन आणि प्रगमनशील संस्था आहे. मनुष्य हा तिचा एक घटक होय. व्यक्ती व समाज यांचा अनुभव प्रवाहरूपाने सतत वाहत असतो, तसेच मनुष्य हा अनेक बाबतींत समाजावर अवलंबून असतो. अध्यात्मवादाप्रमाणे कार्यवादात नैतिक मूल्ये ठरलेली नाहीत. कार्यवादयांच्या मते मानवाला कायमच्या नैतिक मूल्यांची गरज भासणार नाही जी वागणूक अनुभवाच्या प्रवाहामध्ये चांगली ठरते ती चांगली आणि जी वाईट ठरते ती वाईट. कार्यवादी असे मानतात की, मनुष्याच्या अंगी शिक्षणाने कर्तृत्वप्राप्त होते. त्यामुळे मुलांना शिक्षण देणे, हे एक सामाजिक कार्य आहे. कारण मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. कार्यवादयांच्या मते विदयार्थ्याने अनुभवाच्या प्रवाहातून प्रत्येक प्रसंगी काही अर्थ समजून घ्यावा आणि काही मूल्य शोधून काढावे. एका प्रसंगातील मूल्याचा उपयोग त्याला दुसऱ्या प्रसंगी होईल, अशी ही अनुभवपरंपरा आणि मूल्यपरंपरा चालू ठेवण्याची मुलाची तयारी शिक्षणाने करून दिली पाहिजे. कार्यवादात शिक्षकाने मुलांना शिकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावयाची असते. त्यासाठी शिक्षकाला शिक्षणशास्त्र व अध्यापन कला यांची जाण असावी लागते. कार्यवादात अभ्यासक्रम गरजेप्रमाणे बदलत असतो आणि प्रयोगपद्धती ही प्रमुख पद्धती असते. प्रयोगाशी मिळत्या जुळत्या अशा प्रकल्प-पद्धतीचाही पुरस्कार कार्यवादी करतात. आपण नवीन मूल्ये शोधून काढू व आपले जीवन सुधारू, हा आशावाद मनुष्याला सतत उदयोगात ठेवू शकतो. कार्यवादयांच्या मते शिक्षणातून निघालेले सामान्य नियम एकत्र केले म्हणजे शिक्षणाचे तत्त्वज्ञान बनेल.


वास्तववाद हा तत्त्वज्ञानाचा पंथ विसाव्या शतकात निघाला. बाह्य जग जे आहे, जे मनुष्याला दिसत आहे, ते खरे आहे, असे वास्तववादी मानतात. मनुष्याला ज्ञान मिळविण्याचे सामर्थ्य आहे त्यामुळे मनुष्याच्या ज्ञानेंद्रियांना प्रतीत होणारे जग खरे आहे असेही ते मानतात. जग म्हणजे एक व्यवस्थित संस्था असून काही ठराविक नियमांच्या अनुरोधाने त्याचा कारभार चालला आहे. वास्तववादी ज्ञानसाधनेला फार महत्त्व देतात. संगाहकता आणि संकलनशीलता या मताच्या दोन शक्तींच्या जोरावर मनुष्य ज्ञानप्राप्ती करतो व मोठमोठी कार्ये पार पाडतो. वास्तववादयांपैकी काही देव मानतात. ते धार्मिक मूल्यांना महत्त्व देतात. तसेच काही भौतिक जगाला प्राधान्य देतात. मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाला ते विशेष महत्त्व देतात. मात्र पुष्कळांचे पुष्कळ कल्याण हे ज्यायोगे साधते ते नीतिनियम मनुष्याने पाळले पाहिजेत असे त्यांना वाटते. त्यांना सौंदर्यभावनेचे मूल्यही महत्त्वाचे वाटते. वास्तववादयांच्या मताप्रमाणे भोवतालच्या जगाच्या स्वरूपाला अनुसरून मुलांना शिक्षण देणे जरूरीचे आहे. त्यांच्या मते शिक्षणात वास्तवतेला महत्त्व आहे. मुलांना भोवतालच्या भौतिक आणि सामाजिक जगाची यथार्थ ओळख झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती वापरली पाहिजे. मुलांच्या शरीराचा व मनाचा सर्व बाजूंनी विकास, हे शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. त्यासाठी शरीर निरोगी व बळकट आणि मन कियाशील व संस्कारक्षम झाले पाहिजे. वास्तववादी समाजाच्या हिताची काळजी घेत असले, तरी ते व्यक्तीचे नुकसान करू इच्छित नाहीत. वास्वववादात शिक्षकाने मुलांबरोबर असले पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे, कार्य करावयास लावले पाहिजे, त्यांच्या चुका सुधारावयास लावल्या पाहिजेत आणि स्वतःच्या ज्ञानाचा फायदा त्यांना दिला पाहिजे. शिक्षकांना त्यासाठी शास्त्रीय विषय, सामान्य शिक्षण व धंदेशिक्षण यांची माहिती असली पाहिजे. वास्तववादयांच्या मताप्रमाणे शिक्षणात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अभ्यासक्रमात शास्त्रीय व सामाजिक शास्त्रांचा अंतर्भाव हवा. वास्तववादी शिक्षक मुलांना प्रयोग करण्याची सवय लावतो आणि अनुमाने काढण्यास शिकवितो. शिक्षण म्हणजे केवळ मौज किंवा गंमतनव्हे, शिक्षणात शिस्त हवी असे वास्तववादी मानतात. निसर्गवादयांप्रमाणे व कार्यवादयांपमाणे शिस्तीत ढिलेपणा वास्तववादयांना मान्य नाही. मुलांमध्ये आज्ञाधारकपणा, वक्तशीरपणा, नियमितपणा, स्वावलंबन, स्वप्रयत्न, मित्रभाव, चिकाटी, उदयोग, अभ्यास, विनय, सौजन्य, गोड भाषा, स्वच्छता, स्वाभिमान,शालाभिमान, शिक्षकांबद्दल आदर इ. गुण यावयास हवेत. रशियाच्या साम्यवादी सरकारने वास्तववादाचा पुरस्कार केला. त्यामुळे रशियातील शिक्षणाचा दर्जा वाढला आणि व्यक्तीची कार्यक्षमता वाढली. बाह्य भौतिक जग खरे असते, हा वास्तववादाचा प्रमुख गुण होय. वास्तववादात सामाजिक जीवनाला गौण स्थान देण्यात येते.

वरील अध्यात्मवाद, निसर्गवाद, कार्यवाद आणि वास्तववाद यांच्या विवरणात शैक्षणिक समस्यांकडे बघण्याच्या तात्त्विक दृष्टिकोनात आढळणाऱ्या मतभिन्नतेचाच बहुतांशी निर्देश करण्यात आला आहे. मात्र त्या तत्त्वमीमांसेत बरेच खरेखुरे मतैक्याचेही मुद्दे आहेत, या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. आतापर्यंतच्या तत्त्वमीमांसेचे उद्दिष्ट असे होते की, शैक्षणिक तत्त्ववेत्त्यांत अधिक मतैक्याचे मुद्दे का सापडू शकत नाहीत हे समजावून घ्यावे. सामान्यतः असे आढळते की शाळांमधील किमान आवश्यक सुविधा, अभ्यासक्रम, अध्यापनाच्या पद्धती, मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त असण्याची आवश्यकता यांसारख्या बाबींमध्ये स्थूलमानाने तत्त्ववेत्त्यांमध्ये मतैक्यच आहे. दुसरे असे की कोणत्याही देशात एकच एक तत्त्वमीमांसेवर आधारित शिक्षणपद्धती आढळत नाही. चारही प्रमुख विचारप्रवाहांतील त्या देशास उपयुक्त अशी तत्त्वे एकत्र करून प्रत्येक देशाचे स्वतःचे शिक्षणाचे तत्त्वज्ञान तयार होते. लोकशाहीचे दृष्टीने ते योग्य होय.

संदर्भ : 1. Broudy, Harry, Building a Philosophy of Education, Preutice-Hall, 1954.

2. Brubacher, John S. Modern Philosophies of Education, New York, 1950.

3. Buler, J. Donald, Four Philosophies and Their Application to Education and Religion, New York, 1957.

४. अकोलकर, ग. वि. शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा, पुणे, १९७३.

५. बोकील, वि. पां. शिक्षणाचे तत्त्वज्ञान, पुणे, १९६०.

गोगटे, श्री. ब.