सेग्रे, एमील्यो जीनो : (१ फेब्रुवारी १९०५-२२ एप्रिल १९८९). इटलीत जन्मलेले अमेरिकन भौतिकीविद. त्यांनी प्रतिप्रोटॉन ⇨ मूलकण शोधून काढला. या मूलकणाचे द्रव्यमान प्रोटॉनाच्या द्रव्यमानाएवढे असले, तरी त्याचा विद्युत् भार प्रोटॉनाच्या विद्युत् भाराविरुद्ध म्हणजे ऋण असतो. या शोधाबद्दल त्यांना ⇨ओएन चेंबरलिन या अमेरिकन भौतिकीविदांबरोबर १९५९ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.
सेग्रे यांचा जन्म इटलीतील टिव्होली येथे झाला. त्यांनी सुरुवातीला रोम विद्यापीठात अभियांत्रिकीचे अध्ययन करण्यास सुरुवात केली (१९२२). नंतर त्यांनी ⇨एन्रीको फेर्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करून १९२८ मध्ये भौतिकी विषयातील डॉक्टरेट पदवी संपादन केली. काही काळ त्यांनी हँबर्ग व ॲम्स्टरडॅम येथे संशोधन केले. १९३२ मध्ये त्यांची रोम विद्यापीठात भौतिकीचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९३४ मध्ये ते फेर्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या न्यूट्रॉनांविषयीच्या प्रयोगात सहभागी झाले. या प्रयोगांमध्ये युरेनियमासह अनेक मूलद्रव्यांवर न्यूट्रॉनांचा भडिमार करण्यात आला आणि त्यांतून युरेनियमापेक्षा भारी मूलद्रव्ये निर्माण करण्यात आली. १९३५ मध्ये या दोघांनी मंद न्यूट्रॉनांचा शोध लावला. अणुकेंद्रीय विक्रियक (अणुभट्टी) चालू ठेवण्याच्या दृष्टीने मंद न्यूट्रॉनांचे गुणधर्म मोलाचे असतात. सेग्रे १९३६ मध्ये रोममधून बाहेर पडले आणि सिसिलीमधील भौतिकीच्या पालेर्मो वेधशाळेचे संचालक झाले. १९३७ मध्ये त्यांनी ‘टेक्नेशियम’ या मूलद्रव्याचा शोध लावला. हे पहिले मानवनिर्मित मूलद्रव्य असून ते निसर्गात आढळत नाही. १९३८ मध्ये सेग्रे कॅलिफोर्नियाच्या भेटीवर गेले असताना त्यांना मुसोलिनीच्या फॅसिस्ट सरकारने पालेर्मो विद्यापीठातून काढून टाकले. त्यानंतर ते अमेरिकेतच बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन साहाय्यक म्हणून राहिले. तेथील लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरीत अणुकेंद्रीय रसायनशास्त्रविषयक संशोधन चालू ठेवून त्यांनी सहकाऱ्यांसह १९४० मध्ये ॲस्टटीन हे मूलद्रव्य शोधून काढले. नंतर दुसऱ्या वैज्ञानिक गटांबरोबर त्यांनी प्लुटोनियम (२३९) हा समस्थानिक ( अणुक्रमांक तोच परंतु अणुभार भिन्न असलेला त्याच मूलद्रव्याचा प्रकार) शोधून काढला. प्लुटोनियम (२३९) हा समस्थानिक पुष्कळसा युरेनियम (२३५) या समस्थानिकाप्रमाणे भंजनक्षम असल्याचेही त्यांनी शोधून काढले. पहिला अणुबाँब व नागासाकी शहरावर टाकलेला अणुबाँब यांच्यात प्लुटोनियम (२३९) हा समस्थानिक वापरलेला होता.
न्यू मेक्सिको (अमेरिका) येथील लॉस ॲलॅमॉसमधील अणुबाँबसंबंधीच्या एका संशोधन विभागाचे प्रमुख होते. १९४४ मध्ये ते अमेरिकेचे नागरिक झाले आणि १९४६-७२ दरम्यान ते बर्कली येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक होते. १९५५ मध्ये नवीन बीव्हॅट्रॉन हा ⇨कणवेगवर्धक वापरून सेग्रे व चेंबरलिन या दोघांनी प्रतिप्रोटॉन हे मूलकण तयार केले व ओळखून काढले. अशा रीतीने अनेक जादा प्रतिकणांच्या शोधाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १९७४ मध्ये सेग्रे यांची रोम विद्यापीठात अणुकेंद्रिय भौतिकीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.
सेग्रे यांनी पुढील अनेक पुस्तके लिहिली : एक्स्पेरिमेंटल न्यूक्लिअर फिजिक्स (१९५३), न्यूक्लिआय अँड पार्टिकल्स (१९६४), एन्रीको फेर्मी : फिजिसिस्ट (१९७०) वगैरे. तसेच त्यांनी भौतिकीच्या इतिहासावरील पुढील दोन पुस्तकेही लिहिली : फ्रॉम एक्सरेज् टू क्वार्कस् : मॉडर्न फिजिसिस्ट्स अँड देअर डिस्कव्हरीज् (१९८०) आणि फ्रॉम फॉलिंग बॉडीज टू रेडिओ वेव्हज् (१९८४). १९५२ मध्ये त्यांची अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून निवड झाली होती.
सेग्रे यांचे लाफायेत (कॅलिफोर्निया, अमेरिका) येथे निधन झाले.
भदे, व. ग. ठाकूर, अ. ना.
“