ऊलुगबेग मिर्झा : (१३९३–१४४९). तार्तर घराण्यातील एक विद्वान पंडित व ज्योतिषशास्त्राचा एक भोक्ता राजा म्हणून यांची प्रसिद्धी आहे. हे इतिहासप्रसिद्ध तैमूरलंग यांचे नातू होत. १४२० मध्ये समरकंदचा राजप्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक झाल्यावर थोड्याच दिवसांत १४२८ मध्ये त्यांनी समरकंद येथे एक मोठी वेधशाळा बांधली. सूर्य, चंद्र व तारे यांचे वेध घेतले. त्यावरून १,०१९ तार्यांच्या स्थानांची निश्चिती करून त्यांनी एक यादी १४३७ मध्ये स्वतंत्रपणे तयार केली. टॉलेमी यांच्यानंतरची ही पहिलीच स्वतंत्र यादी होय. प्राचीन वेधसाधनांनी तयार केलेली म्हणून ही विशेष महत्त्वाची आहे. १६६५ मध्ये हाइड यांनी हिचे इंग्रजी भाषांतर केले. झीज ऊलुगबेग या नावाचा ज्योतिष-गणिताचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांच्या वेधशाळेचा आकार रामयंत्रासारखा आहे. यातून ताऱ्यांची ⇨ क्रांती, ⇨ होराकोण वगैरे गोष्टी काढता येतात. त्यांच्या यादीचा उपयोग जयसिंग (१६६९–१७४३) या रजपूत राजाने दिल्ली, जयपूर वगैरे ठिकाणी वेधशाळांतून रामयंत्र, सर्वयंत्रशिरोमणी वगैरेंसारखी मोठी यंत्रे बांधण्यासाठी केला. ऊलुगबेग यांनी वृत्तचतुर्थांश, त्रिकोणिका व परिवलनिका या खगोलविषयक यंत्रांचा उपयोग केला होता.
ते १४४७ मध्ये तुर्कस्तानचे राजे झाले. फलज्योतिषावर विश्वास ठेवून त्यांनी स्वत:च्या मुलावर संशयित नजर ठेवली, पण १४४९ मध्ये मुलानेच त्यांचा खून करविला.
पंत, मा. भ.