उपयोजित कला : (ॲप्लाइड आर्ट). ‘उपयोजित कला’ ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते. ह्या संज्ञेचा ‘अलंकरण’ अशा अर्थी वापर केला जातो, तेव्हा मूळ आकारावर आलंकारिक साज चढविणे वा आकारालाच अलंकृत रूप देणे, अशा प्रक्रियांचा तीत समावेश होतो. उपयुक्त वस्तुनिर्मिती आणि कारागिराची कौशल्यपूर्ण निर्मिती यांना उद्देशूनही ही संज्ञा पुष्कळदा वापरली जाते आणि शुद्ध कलानिर्मिती व कलावंताची कलाकृती यांहून त्यांचा वेगळेपणा सुचविला जातो. ह्या अर्थाने उपयोजित कला व उपयोजित विज्ञान यांत साम्य दिसते. कारण दोहोंतही सैद्धांतिक स्वरूपापेक्षा व्यावहारिक घटकांवरच अधिक भर असतो. एकोणिसाव्या शतकातील शिक्षणासंस्थांतून सर्व प्रकारच्या हस्तकलांचे व व्यवसायांचे शिक्षण ‘उपयोजित कला’ ह्या नावाने दिले जात असे. यांत्रिकी कलेशी संबंधित असणारे कलाप्रकारही ह्या संज्ञेने दर्शविले जात. पुष्कळदा मुद्रणाधारित व वाणिज्य प्रसिद्धी कला ह्यांपुरताच नियमित अर्थाने ‘उपयोजित’ हा शब्द वापरला जातो.
प्राचीन व मध्ययुगीन काळात ललित कला, उपयोजित कला वा कारागिरी असे भेद स्पष्ट नव्हते. पुढे ‘ललित’ (फाइन) ह्या संज्ञेने ‘आकादमिक’ वा हर्बर्ट रीडच्या परिभाषेत ‘ह्यूमॅनिस्टिक’ (मानवतावादी) कला ध्वनित होऊ लागली तर ‘उपयोजित’ ह्या संज्ञेने उपयुक्त कलाप्रकार ध्वनित होऊ लागले. पाश्चात्त्य प्रबोधनकाळापासून हा फरक जाणवू लागला आणि औद्योगिक क्रांतीनंतर तो ठळकपणे स्पष्ट झाला. कलावीथी, कलाप्रदर्शनालये, शासनाच्या सहकार्याने उभारलेली कलाविद्यालये, आलंकारिक कलांच्या संग्रहालयांची स्थापना अशांसारखे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाले. प्राचीन काळातील उत्तमोत्तम कलाकृतींचा व्यासंग व तंत्रकौशल्यांचा अभ्यास विद्यालयांतून होऊ लागला. उत्पाद्य वस्तूंचा विशेष उठाव व्हावा, म्हणून त्यांना आकर्षक कलात्मक रूप देण्याची व त्यायोगे वाढत्या औद्योगिक स्पर्धेत स्थान टिकविण्याची प्रेरणाही औद्योगिक क्रांतीतूनच निर्माण झाली. यांत्रिक तांत्रिक प्रक्रियांतून निर्माण होणारे उत्पादन आणि सर्जनशील कलानिर्मिती यांतील मौलिक फरक ह्यांतून अधिक प्रकर्षाने स्पष्ट झाले. यंत्रनिर्मित वस्तूस कलात्मकतेची, अलंकरणाची जोड देऊन त्यायोगे ग्राहकास आकर्षित करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली व त्यातून उपयोजित कलेस प्राधान्य मिळत गेले [→ औद्योगिक आकृतिबंध].
विशुद्ध कला व निखळ कारागिरी ह्यांच्यामधली एक अवस्था उपयोजित कलेने सूचित होते. उपयोजित कलाविष्कारात सर्जनशीलतेस खूपच वाव आहे तथापि ही सर्जनशीलता साधनांची उपलब्धता व त्यांचे मूल्य, उत्पादनप्रक्रिया तसेच उत्पादित वस्तूची उपयुक्तता, औचित्य व इष्टता ह्यांविषयीच्या सामाजिक व बव्हंशी सांकेतिक कल्पना इ. घटकांनी नियंत्रित केली जाते. उपयोजित कला मानवाच्या दैनंदिन व्यवहारांशी व गरजांशी निगडित असल्याने त्या दृष्टीनेही तिला काही मर्यादा पडतात. उपयुक्ततेला सौंदर्याची जोड देणे, हे उपयोजित कलांचे उद्दिष्ट. ह्या उद्दिष्टाचे महत्त्व व प्रतिष्ठा मोठी असली, तरी ते विशुद्ध कलानिर्मितीपेक्षा दुय्यमच ठरते. मात्र ललित व उपयोजित कलांच्या निर्मितीच्या दर्जात फरक असतोच, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे कित्येकदा ललित व उपयोजित ह्यांच्यात नेमकी सीमारेषा दर्शविणे मोठे अवघड होऊन बसते. मध्ययुगीन चित्रकला ही बव्हंशी उपयोजितच होती कारण ती ज्या पृष्ठभागांचे (उदा., भिंती, खिडक्या, फर्निचर, ग्रंथपृष्ठे इ.) अलंकरण करीत असे, त्यांचे व्यावहारिक उद्देश स्पष्ट आहेत. बऱ्याचशा प्राचीन व मध्ययुगीन शिल्पांबाबतही असेच म्हणता येईल. ग्रीक भांडी तंत्रदृष्ट्या मृत्पात्रीत मोडत असली, तरी त्यांवरील अलंकरणाची कलात्मकता मोठी आहे. वास्तुकलेच्या बाबतीत तर हा भेद फारच संदिग्ध होतो. कारण प्रत्येक वास्तूचा आकृतिबंध हा नियोजित स्थळ, आर्थिक बाबी, साधने, तंत्रे, वास्तूचे अभिप्रेत व्यावहारिक उद्दिष्ट ह्यांनी घडविलेला असतो. विशुद्ध स्वरूपाची वास्तुकला हे केवळ एक कल्पनारंजन आहे आणि तरीही वास्तुकला हा एक प्रमुख कलाप्रकार गणला जातो. चित्रकला ही ललित कला, तर तिच्याशी घनिष्ठ नाते असलेले कुट्टिमचित्रण, भित्तिचित्रण हे प्रकार उपयोजित ठरतात. मूर्तिकला व मृत्स्नाशिल्पन, वास्तुरचना व गृहशोभन ह्या प्रकारांतूनही हेच परस्परसंबंध जाणवतात.
उपयोजित कलांची व्याप्ती फार मोठी आहे. कारागिरीचे आज रूढ असलेले सर्व प्रमुख प्रकार त्यांत अंतर्भूत होतात. मृत्स्नाशिल्प, काष्ठशिल्प, काचेचे कलाकाम, धातुकाम, वस्त्रकला, गालिचे, विणकाम व भरतकाम, चर्मकलाकाम, सुशोभनप्रकार, मीनाकारी, जडावकाम, जडजवाहिर इ. प्रकार उदाहरणादाखल सांगता येतील. मुद्रणाच्या शोधानंतर तसेच आधुनिक यांत्रिक-तांत्रिक प्रगतीनंतर आरेख्यक कला तसेच प्रसिद्धी कला, वाणिज्य कला व औद्योगिक कला ह्यादेखील उपयोजित कला मानल्या जाऊ लागल्या आहेत.
आज औद्योगिक क्षेत्रात उपयोजित कलेस फार मोठे स्थान आहे कारण त्यावर बऱ्याच प्रमाणात व्यावसायिक यशापयश अवलंबून असते.
पहा आलंकारिक कला कला (कनिष्ठ कला).
संदर्भ : 1. Klingender, F.D.Art and the Industrial Revolution, London, 1947.
2. Read H.E. Art and Industry, New York, 1961.
इनामदार, श्री. दे.