इल्मेनाइट : खनिज. स्फटिक त्रि-समांतर षट्फलकीय, जाड वडीसारखे, चकतीसारखे किंवा लघुकोणी समांतर षट्फलकीय. यमलन सामान्यत : (0001) पृष्ठावर [→ स्फटिकविज्ञान]. वाळूच्या किंवा एकजीव संपुंजित स्वरूपात आढळते. भंजन शंखाभ [→ खनिजविज्ञान]. कठिनता ५-६ वि. गु. ४·५-५. चमक काहीशी धातूसारखी. रंग लोखंडासारखा काळा. कस काळसर ते लालसर उदी. अपारदर्शक. किंचित चुंबकीय. रा. सं. FeO.TiO2.विशेषत:अल्प व अत्यल्पसिकत (सिलिका अतिशय कमी असणाऱ्या) अग्निज खडकांत व काही रूपांतरित व गाळाच्या खडकांत गौण घटक म्हणून आढळते. नॉर्वेतील क्रागेर येथील डायोराइटात इल्मेनाइटाच्या शिरा आहेत. त्यांच्यात सात किलोग्रॅमपर्यंत वजन असलेले स्फटिक आढळले आहेत. भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवरील वाळूत इल्मेनाइटाचे मोठे साठे आहेत. बिहारातील हजारीबाग पठारावरही इल्मेनाइट आढळते. इल्मेनाइटाच्या जागतिक उत्पादनाच्या सु. २३% उत्पादन भारतात होते. टिटॅनियमाचा धातुपाषाण म्हणून व रंगद्रव्ये तयार करण्यासाठी इल्मेनाइटाचा उपयोग होतो. नाव रशियातील इल्मेन पर्वतावरून.
ठाकूर, अ. ना.