इझुमी शिकिबू : (९४७ ?–१०३३ ?). एक प्रसिद्ध जपानी कवयित्री. तिच्या जन्ममृत्यूच्या तारखांसंबंधी अनिश्चितता आहे. ताचिबाना मिचिसादा या तिच्या वडिलांच्या आश्रिताशी तिचा विवाह झाला होता. तथापि जपानी राजघराण्यातील तामेताका या राजपुत्राशी आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ आतसुमिची याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. आतसुमिचीच्या निधनानंतर ती राजकन्या शोशीच्या सेवेत होती. पुढे तिने फुजिवारा यासुमासा याच्याशी लग्न केले परंतु हा संबंधही अल्पकाळच टिकला.
मराठी ओवीप्रमाणे असलेल्या ‘वाका’ या जपानी छंदात (पंचाक्षरी व सप्ताक्षरी चरणांची एकामागून एक अशी ओवीसदृश रचना) लिहिलेल्या तिच्या कवितांचे दोन संग्रह उपलब्ध आहेत. त्यांची नावे इझुमी शिकिबू सेइशू व इझुमी शिकिबू झोकुशू अशी असून त्यांपैकी पहिल्या संग्रहात ८३९ व दुसऱ्यात ६४७ वाका आहेत. दोन्ही संग्रहांतील सत्तर वाका एकसारख्याच आहेत प्रेमभावनेची उत्कटता व सखोलता तिच्या काव्यात आढळते. चित्तशुद्धीसाठी आसुसलेली भावना तिच्या धार्मिक स्वरूपाच्या कवितेत व्यक्त झाली आहे. आपल्या मुलीच्या निधनावर तिने शोकपर कविताही रचलेल्या आहेत. शाही आज्ञेनुसार संपादित केलेल्या गोशु-इशुसारख्या ‘चोकुसेन-शू’ मध्ये म्हणजे कवितासंग्रहात, तिच्या वाका समाविष्ट आहेत.
तिने लिहिलेल्या दैनंदिनीतही पुष्कळ कविता आढळतात. आतसुमिचीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांचे वर्णन ह्या दैनंदिनीत आढळते. ही दैनंदिनी तिने लिहिली नसावी असे काहींचे मत असले, तरी त्यास सबळ पुरावा मिळत नाही. इझुमी शिकिबू हिच्या प्रणयचंचल वृत्तीवर टीका करण्यास येते. तथापि खरे प्रेम आणि प्रेमिक ह्यांचा शोध घेणारा तिचा भटकता आत्मा एकाकीपणा सहन करण्यास असमर्थ होता, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
हिसामात्सु, सेन्-इचि (इं.) जाधव, रा. ग. (म.)