इजीअन समुद्र: भूमध्य समुद्राचा फाटा. लांबी सु. ६५० किमी., रुंदी ३२५ किमी. व क्षेत्रफळ १,७९,००० चौ. किमी. याच्या पश्चिमेस व उत्तरेस ग्रीस, पूर्वेस तुर्कस्तान व दक्षिणेस क्रीट बेट आहे. दार्दानेल्सच्या सामुद्रधुनीने हा मार्मारा समुद्रास जोडलेला आहे. प्राचीन विच्छिन्न भूभाग बहुतांशी खचल्यामुळे शेकडो बेटांनी भरलेला, कोठे खोल तर कोठे उथळ असा हा समुद्र तयार झाला असावा. इमरोझ व बोझजाआदा ही तुर्की बेटे सोडून बाकी सर्व बेटे ग्रीसची आहेत. १९१२ पासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत डोडेकानीझ बेटे इटलीकडे होती. काही बेटे प्राचीन ज्वालामुखी व लाव्हारसाची असून काही शुद्ध पांढऱ्या संगमरवराची आहेत. मोठ्या बेटांवर सुपीक, सुजल दऱ्या व मैदाने असून तेथे गहू, मद्य, तेल, अंजीर, मुनका, मध, मेण, कापूस, रेशीम इत्यादींचे उत्पादन होते. समुद्रात ब्रीम व मुलेट मासे तसेच स्पंज व पोवळी मिळतात. हिवाळ्यात वादळांमुळे नौकानयन अशक्यप्राय होते, परंतु उन्हाळ्यात उत्तरेकडील सौम्य, नियमित वाऱ्यांमुळे समुद्रसंचार सुखकारक होतो. पूर्वीची बंदरे गाळाने निरुपयोगी झाल्यामुळे इझमिर व पायरीअस यांसारख्या बंदरांत आता व्यापार केंद्रित झाला आहे.
कुमठेकर, ज. ब.