आहॉ, युहानी : (११ सप्टेंबर १८६१–८ ऑगस्ट १९२१). एक फिनिश लेखक. खरे नाव युहानी ब्रूफेल्ट. जन्म लेपीनलाहती येथे. हेलसिंकी विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्याने काही काळ पत्रव्यवसायात घालविला. फिनलंडमधील ‘यंग फिनलंड’ या उदारमतवादी पंथाचा तो सक्रिय सभासद होता. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून तो लिहू लागला. फ्रेंच भाषासाहित्याच्या साक्षेपी अभ्यासातून त्याने आपली लेखनशैली घडविली होती. दोदे आणि मोपासां हे त्याचे मुख्य वाङ्‌मयीन आदर्श होते.त्याने निसर्गवादी लेखनतंत्र त्यांच्यापासूनच आत्मसात केले. Lastuja (१८९१–१९२१, इं.शी. चिप्स) हा त्याचा अष्टखंडात्मक लघुकथासंग्रह विशेष उल्लेखनीय आहे. त्यातील काही कथांचे स्वीडिश आणि फ्रेंच अनुवाद झाले आहेत. Rautatie (१८८४, इं.शी. द रेल्वे), Papin tytar (१८८५, इं.शी. द पार्सन्स डॉटर), Kevat ja takatalvi (१९०६, इं.शी. स्प्रिंग अँड लेट विंटर) आणि Juha (१९११) ह्या त्याच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या. Muistatko (१९२०, इं.शी. डू यू रिमेंबर?) ह्यात त्याच्या आठवणी आहेत. शेतकऱ्यांचे जीवन, मासेमारी, फिनलंडमधील वन्य जीवन हे त्याच्या साहित्यकृतींचे मुख्य विषय होत. फिनिश गद्याच्या विकासाला त्याने फार मोठा हातभार लावला. हेलसिंकी येथे तो मरण पावला.

कुलकर्णी, .