आस : प्रत्येक गाडीतील बैठकीची चौकट व चाके यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा असतो. गाडीची चाके आसावर आधारलेली असतात. हा आस उत्तम प्रतीच्या टणक पोलादापासून बनवितात. गाडीचे वजन प्रथम आसावर येते व नंतर चाकामधून जमिनीवर जाते. आसाची लांबी गाडीच्या 

आ. १ (अ). उपवाहनाचा आस

रुंदीप्रमाणे ठेवावी लागते व त्याच्या छेदाची मापे त्यावर पडणाऱ्या भाराप्रमाणे गणिताने ठरवावी लागतात. साध्या दांड्यासारखा आस दोन पद्धतींनी वापरता येतो. एका पद्धतीत (.१ अ) हा आस गाडीच्या बैठकीला पक्का जोडलेला असतो व तो चाकाबरोबर फिरत नाही. उदा., बैलगाडीचा आस (कणा). त्याच्या दोन्ही बाजूंच्या टोकांवर गाडीची चाके बसवितात. अशा आसावर नमन (वाकविणारा) व कर्तन (कापून तुकडा पाडू शकणारा) असे दोन्ही प्रकारचे भार येतात. या आसाचा मधला मुख्य भाग बहुधा चौकोनी छेदाचा असतो व चाके बसविण्यापुरता टोकाकडील भाग लेथवर कातून अचूक गोल छेदाचा केलेला असतो.

आ. १ (आ). रूळगाडीचा आस

 

दुसऱ्या पद्धतीत (. १ आ) आसाच्या दोन्ही टोकांवर पोलादी चाके घट्ट बसवलेली असतात (उदा., रूळगाडीच्या डब्याचा आस व चाके) त्यामुळे चाके व आस नेहमी एकाच वेगाने फिरतात. गाडीच्या बैठकीखाली दोन्ही बाजूंना आसाला आधार देणारे धारवे लावलेले असतात. अशा आसावर नमन, कर्तन व परिपीडन (आसाला पीळ देणारा) असे तिन्ही प्रकारचे भार येतात. या आसाचा छेद वर्तुळाकार असतो. अशा प्रकारचा आस बहुतेक सर्व रूळमार्गी गाड्यांकरिता वापरतात.

मोटारगाडीत वापरीत असलेले आस संयुक्त (वरील प्रकारांचे मिश्रण) जातीचे असतात. पुढच्या चाकाकरिता साधारणत: तीन निरनिराळे भाग असलेला आस वापरतात. यातील मधला (आ. २)तुळईसारखा भाग गाडीच्या चौकटीला जोडलेला असतो व म्हणून तो फिरू शकत नाही. त्याच्या दोन्ही टोकांवर प्रत्येक चाकासाठी एक खुंटीसारखा स्वतंत्र आस बिजागरी पद्धतीने जोडलेला 

आ. २. मोटारगाडीचा पुढचा आस

असतो. या खुंटीच्या आसावरच गाडीची पुढची चाके बसविलेली असतात. गाडी वळविणे सोपे व्हावे म्हणून अशी रचना वापरावी लागते. मागच्या चाकांकरिता निराळ्या पद्धतीचा संयुक्त आस वापरतात. यातील मधला भाग पोकळ असून तो बैठकीच्या खालील चौकटीला स्प्रिंगांच्या मध्यस्थीने जोडलेला असतो. या स्थिर आसाच्या आत प्रत्येक चाकाकरिता एक असे दोन स्वतंत्र फिरणारे आस असतात. याच दोन आसांच्या मधोमध विभेदी (आसांना निरनिराळ्या वेगाने फिरण्यास मोकळीक देणारी) चक्रमाला असते. या फिरणाऱ्या आसांच्या बाहेरच्या टोकांवर गाडीची मागची चाके घट्ट बसविलेली असतात. बाहेरच्या स्थिर आसांवर नमन परिबल (प्रेरणा x भुजा) व आतील आसांवर परिपीडक परिबल येते [→ मोटारगाडी ].

साध्या बैलगाडीमध्ये स्प्रिंगा न वापरता गाडीची बैठक सरळ आसावरच टेकविलेली असते त्यामुळे चाकावर येणारे धक्के बैठकीलाही बसतात. टांग्यातील बैठक व आस यांच्या मध्ये मजबूत पोलादी पट्टयांच्या स्प्रिंगा ठेवलेल्या असतात त्यामुळे चाकावर येणारे धक्के स्प्रिंगांमध्ये बरेचसे जिरतात. टांग्यापेक्षाही धक्के खूपच कमी व्हावे म्हणून मोटारगाडीमध्ये उत्तम प्रतीच्या स्प्रिंगा वापरतात.

महाजन, अमा.