आरिऑस्तो, लोदोव्हीको: (८ सप्टेंबर १४७४ – ६ जुलै १५३३). एक इटालियन महाकवी. जन्म इटलीतील फ्लॉरेन्सजवळील रेजो येथे. १५०० मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर मोठ्या कुटुंबाची जबाबदारी आरिऑस्तोवर येऊन पडली. ही जबाबदारी पार पाडता यावी व साहित्यसेवाही करता यावी म्हणून त्याला सुरुवातीस कार्डिनल इप्पोलीतो आणि नंतर फेराराचा ड्यूक आल्फॉन्सो यांच्या आश्रयास राहणे भाग पडले.

सुरुवातीस १४९४ पासून दहा वर्षे त्याने लॅटिन भाषेत केवळ भावगीते लिहिली. नंतर मात्र त्याने इटालियन भाषेत गीतिका (माद्रिगल्स), सुनीते, उपरोधिका व अनेक सुखात्मिका लिहिल्या. त्याची बहुतांश गीते ही पीत्रार्कच्या (१३०४ – १३७४) धर्तीवर असली, तरी त्यांना पीत्रार्कच्या गीतांची सर नाही. Orlando furioso ह्या त्याच्या महाकाव्यामुळे त्याची सर्वत्र कीर्ती झाली. सु. ५०,००० ओळींचे हे महाकाव्य ४६ सर्गांत विभागले आहे. संस्कारित व अंतिम स्वरूपात ते १५३२ मध्ये प्रसिद्ध झाले. प्रबोधनकालीन वाङ्‌मयीन वातावरणाचे व प्रवृत्तींचे स्वरूप त्यातून प्रत्ययास येते. ह्या महाकाव्याच्या सोळाव्या शतकातच अनेक आवृत्त्या निघाल्या आणि त्याचा प्रभाव तास्सो (१५४४ – १५९५) इ. इटालियन साहित्यिकांवरच नव्हे, तर त्याच्या भाषांतरांद्वारे सर्‌व्हँटीझ, स्पेन्सर, मिल्टन, बायरन, शेली यांसारख्या प्रसिद्ध साहित्यिकांवरही पडला. ह्या महाकाव्याची इंग्रजीत अनेक भाषांतरे झाली आहेत.

आरिऑस्तोच्या I Suppositi (१५०९, इं. शी. द प्रिटेंडर्स) ह्या नाटकाचा जॉर्ज गॅस्कॉइन ह्या इंग्रज लेखकाने द सपोजिस (१५६६) ह्या नावाने अनुवाद केला आहे. शेक्सपिअरने आपल्या द टेमिंग ऑफ द श्रूमधील उपकथानकही आरिऑस्तोच्या या नाटकावरूनच घेतले असावे. फेरारा येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : Gardner. E. G. The King of Court Poets, New York, 1906.

आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.) शिरोडकर, द. स. (म.)