आपटे, वासूदेव गोविंद : (१२ एप्रिल १८७१ – २ फेब्रुवारी १९३०). मराठीतील एक संपादक, बालवाङ्मयकार आणि कोशकार. जन्म जळगाव जिल्हातील धरणगाव येथे. शिक्षण धुळे, इंदूर आणि नागपूर येथे. कलकत्ता विद्यापीठातून ते बी. ए. झाले (१८९३). बंगाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. अध्यापन आणि वृत्तपत्रव्यवसाय ह्या क्षेत्रांत त्यांनी आयुष्याचा बराचसा काळ व्यतीत केला. त्याशिवाय मुंबईच्या जुन्या सचिवालयात ‘रिपोर्टर ऑफ द नेटिव्ह प्रेस’ म्हणूनही काम केले. ज्ञानप्रकाश (पुणे), मल्हारी मार्तंड (इंदूर) यांसारख्या पत्रांचे ते संपादक होते. त्यांनीच साप्ताहिक ज्ञानप्रकाशाचे दैनिकात रूपांतर केले. उत्तम बालसाहित्यास प्रोत्साहन देण्यासाठीआनंद हे लोकप्रिय मासिक काढले (१९०६). लहान मुलांसाठी त्यांनी अनेक छोटी छोटी पुस्तके लिहिली. बालभारत (२ री आवृ. १९०६), मनी आणि मोत्या (१९१३), मुलांचा विविधज्ञानसंग्रह (१९१७) आणि बालविनोद माला (१९३०) ही त्यांतील काही होत. बंकिमचंद्र चतर्जी यांच्या कादंबर्यांचे त्यांनी केलेले अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचे बंगाली-मराठी कोश (१९२५) आणि मराठी-बंगाली शिक्षक (१९२५) बंगालीच्या अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त आहेत. सौंदर्य आणि ललितकला (१९१९) ह्या त्यांच्या ग्रंथात त्यांनी प्राच्य आणि पश्चिमी विचारवंतांनी या विषयासंबंधी केलेला विचार आणि त्यांचे अनुभव संगृहीत केले आहेत. मराठीतील अशा प्रकारचा हा पहिलाच ग्रंथ होय. ह्याशिवाय जैन धर्म (१९०४), मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी (१९१०), हिंदुस्थानचा सचित्र मनोरंजक इतिहास (१९१२), बौद्ध धर्म अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास(१९१४) यांसारखी विविध विषयांवरील अनेक पुस्तके लिहिली. कलकत्त्याच्या मॉडर्न रिव्हयूंमध्ये ते नवीन मराठी पुस्तकांची परीक्षणे बरीच वर्षे लिहीत असत. त्यांची लेखनशैली सुबोध आणि रेखीव आहे. १८७८ साली स्थापन झालेल्या ‘मराठी ग्रंथकार परिषदे’ ला ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ चे व्यापक स्वरूप देण्यात त्यांच्या परिश्रमांचा वाटा मोठा आहे. ‘वंग साहित्य परिषदे’ च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ च्या घटनेचा पहिला मसुदा त्यांनीच तयार केला होता. पुणे येथे त्यांचे निधन झाले.
कुलकर्णी, अ. र.