हुमायून : (६ मार्च १५०८–२६ जानेवारी १५५६). मोगल साम्राज्याचा दुसरा बादशाह. त्याचे पूर्ण नाव नासिरउद्दीन मुहम्मद हुमायून. त्याचा जन्म काबूल येथे माहम्बेगम व मोगल बादशाह बाबर या दांपत्यापोटी झाला. त्याच्या जीवनाचे पुढील चार कालखंड पडतात : एक, गादीच्या संरक्षणासाठी संघर्ष (१५३०–४०) दोन, हद्दपारीतील वर्षे (१५४०–४५) तीन, कंदाहारमधून गेलेले प्रदेश हस्तगत करण्याचे अथक प्रयत्न (१५४५–५४) व चार, दिल्लीच्या तख्तावर पुन्हा विराजमान (१५५५-५६). बाबराने हुमायूनच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती. हुमायूनला तुर्की, अरबी व फार्सी या भाषा चांगल्या अवगत होत्या. बाबराने त्याला युद्धाचा अनुभव मिळावा म्हणून पहिल्या पानिपतच्या लढाईच्या वेळी स्वतंत्र तुकडीचे नेतृत्व दिले होते. नंतर हिस्सार आणि संभळ या जिल्ह्यांची जहागीरदारी त्याला देण्यातआली. शिवाय एका प्रांताचे राज्यपालपदही दिले होते. बाबराच्या मृत्यूनंतर २९ डिसेंबर १५३० रोजी तो आग्रा येथे तख्तावर आला. बाबराने मरतेसमयी तीन भावांना चांगले वागव, असे हुमायूनला सांगितले. त्यामुळे त्याने राज्याची विभागणी करून मिर्झा कामरानला कंदाहार व काबूल आणि इतर दोन भाऊ अस्करी आणि हिंदाल यांनाही काही प्रदेश दिला. राज्यारोहणानंतर १५३१ हुमायूनने कालिंजरवर स्वारी केली; तथापि ती मधेच सोडून बिहारकडे त्याला मुहम्मद लोदीविरुद्ध लढावे लागले. त्याचा पराभव केल्यावर लोदीचा पाठलाग मात्र त्याने केला नाही. उलट शेरशाहाने काबीज केलेल्या चुनार किल्ल्याकडे मोर्चा वळविला; पण तह करून तो आग्य्राला परतला (१५३२). या सुमारास गुजरातमध्ये बहादूरशाहाने बंड केले (१५३३-३४). ते शमवून तो मुहम्मद झामन मिर्झा या बिहारच्या राज्यपालाचे बंड मोडण्यासाठी तिकडे ससैन्य गेला (१५३४). या युद्धात मुहम्मद झामन मिर्झाला कैद झाली; पण तो पळून जाऊन गुजरातेत बहादूरशाहाला मिळाला. बहादूरशाहाने माळवा, रैसेन इ. प्रदेश जिंकून घेतले होते. हुमायूनला बहादूरशाहावर स्वारी करणे भाग पडले. शेरशाह या वेळी चितोडला वेढा देऊन बसला होता. तेथील राणी कर्णावती हिने हुमायूनला राखी पाठवून मदतीचे आवाहन केले; परंतु हुमायूनने राजपुतांशी मैत्री करण्याची ही संधी गमावली आणि चितोड पडल्यानंतरच तो आला व त्याने बहादूरशाहाला पराजित करून तेथील कारभार अक्सरी याच्याकडे सोपवून तो आग्य्रास परतला. कमकुवत अक्सरीचा पराभव करून बहादूरशाहाने गुजरात व माळवा पादाक्रांत केले (१५३६). 

हुमायून

हुमायून माळवा व गुजरातच्या राजकारणात व्यग्र असल्यामुळे शेरशाहाने बिहारात वर्चस्व प्रस्थापित केले. तेव्हा लोहानी सरदारांत मत्सर निर्माण झाला. त्यांनी बंगालच्या महमूदशाहाच्या मदतीने बिहारवर स्वारी केली. तीत त्यांचा पराभव झाला. शेरशाहाने १५३६ मध्ये बंगालच्या सुलतानाचा पराभव केला आणि सुरजगडपर्यंत बंगालचा प्रदेश काबीज केला. मोंगीर जिंकून तो महमूदशाहावर चालून गेला. तेव्हा हुमायूनने प्रचंड सैन्यानिशी चुनारला वेढा दिला (१५३७). पुढे हुमायूनने बंगालवर स्वामित्व प्रस्थापिले, तेव्हा उत्तरेकडे त्याचे दुर्लक्ष झाले. त्याचा फायदा घेऊन शेरशाहाने हुमायूनची दिल्ली-आग्य्राची रसद तोडून टाकली. हुमायून बंगालमध्ये कोंडला गेला. शेरशाहाने कोसी आणि गंगा नद्यांच्या पात्रांमधील सर्व ठाणी जिंकून घेतली. तेव्हा हुमायून बंगालमधून बाहेर पडला. परतीच्या प्रवासात चौसा येथे शेरशाह व हुमायूनयांत युद्ध झाले (२५ जून १५३९). शेरशाहाचा प्रचंड विजय झाला.एका पखालजीच्या मदतीने हुमायूनने आपले प्राण वाचविले व कसाबसा तो आग्य्राला जाऊन पोहोचला. हुमायूनचा सर्व जनानखाना शेरशाहाच्या तावडीत सापडला; पण शेरशाहाने त्याची सन्मानपूर्वक रवानगी केली. तत्पूर्वी शेरशाहाने बंगाल-बिहारचा सर्व प्रदेश जिंकून गौड येथे स्वतःचा राज्याभिषेक केला होता (३० मे १५३८). शेरशाह मोठे सैन्य घेऊन आग्य्राकडे निघाला. लखनौ-कनौज त्याने जिंकले आणि अखेर हुमायूनचाही बिलग्रामच्या लढाईत पराभव केला. रणातून हुमायूनला पळ काढावा लागला. दिल्ली-आग्रा अफगाणांच्या ताब्यात गेले (१५४०). पुढे हुमायून लाहोर, सिंध इथे भटकत असता त्याच्या भावांनी त्याला मदत केली नाही. तो हिंदाळच्या छावणीत असता त्याचा गुरू मीर अली अकबर आमी याच्या कन्येच्या प्रेमात पडला. तिच्याशी तो विवाहबद्ध झाला. तिच्यापासून त्यास अकबर झाला. अखेर हुमायून इराणला गेला व शियापंथ स्वीकारून वा आदराची भावना व्यक्त करून शाह तहमास्पचा आश्रय घेतला. त्या वेळी दिल्लीच्या तख्तावर शेरशाह होता (१५४२). शेरशाहाच्या मृत्यूनंतर (१५४५) त्याने तहमास्पच्या मदतीने काबूल व कंदाहार जिंकून घेतले. नंतर कामरानने ते जिंकून घेतले. तेव्हा हुमायूनने त्याचा पराभव करून काबूल जिंकले (१५५०). 

दिल्लीतील अफगाण साम्राज्य अंतःस्थ दुहीमुळे पोखरून निघाले होते. अशा परिस्थितीत हुमायून २५ डिसेंबर १५५४ रोजी आपल्या सैन्यानिशी पेशावरला आला. त्याचा विश्वासू अमीर बैरामखान त्याला येऊन मिळाला. त्यांनी लाहोर जिंकले. मच्छिवारा या ठिकाणी मोगल व अफगाण यांत निकराची लढाई झाली. त्यात हुमायून विजयी झाला. पंजाब हुमायूनच्या ताब्यात आला. नंतर दिल्लीचा अफगाण सुलतान सिंकदरशाह सूर याने हुमायूनवर हल्ला केला; परंतु यात हुमायूनचा विजय झाला. त्यानंतर हुमायूनने २३ जुलै १५५५ रोजी दिल्लीत पुन्हा प्रवेश केला आणि तो सिंहासनावर आरूढ झाला. यानंतरचे त्याचे काही महिने बंडाळ्यांचा बीमोड करण्यात गेले. त्याने दिल्लीच्या परिसरात दिनपनाह (दिनपन्हा) नावाच्या नगराची स्थापना केली होती (१५३३). तेथील भव्य इमारतीच्या पायऱ्यांवरून पाय घसरून पडून तो गंभीर जखमी झाला. दोन दिवसांनी दिल्लीतच त्याचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने अकबराला आपला वारस नेमले. 

मोगल सम्राटांत हुमायून हा कमनशिबी समजला जातो. तो चांगला सैनिक होता; पण सेनापती नव्हता. त्याला ऐषारामी जीवनाची लालसा होती. अफूच्या व्यसनात तो अनेकदा गर्क असे; मात्र धार्मिक क्षेत्रात त्याने आपली मते हिंदूंवर लादली नाहीत. 

पहा : मोगलकाळ; शेरशाह. 

संदर्भ : Majumdar, R. C. Ed. The Moghul Empire, Mumbai, 1998. 

खोडवे, अच्युत