हिलरी, सर एडमंड : (२० जुलै १९१९–११ जानेवारी २००८). न्यूझीलंडचा प्रसिद्ध गिर्यारोहक व अंटार्क्टिका खंडाचा समन्वेषक. त्याचा जन्म न्यूझीलंडमधील ऑक्लंड येथे पर्सिव्हल व गेरट्रदे या दांपत्यापोटी झाला. माध्यमिक शाळेत असतानाच तो न्यूझीलंडमधील सदर्न आल्प्स पर्वतावर गिर्यारोहण करीत असे. त्याने ऑक्लंड विद्यापीठात दोन वर्षे शिक्षण घेतले होते. तद्नंतर त्याने काही काळ वडिलांचा मधु-मक्षिकापालन हा व्यवसाय केला. सदर्न आल्प्समध्ये गिर्यारोहण केल्यानंतर १९४३ मध्ये तो रॉयल न्यूझीलंड एअर फोर्समध्ये एक मार्गनिर्देशक म्हणून दाखल झाला. गिर्यारोहण हा त्याचा छंद बनला होता. दुसऱ्या महायुद्धकाळात सैनिकी सेवा पूर्ण केल्यानंतर त्याने एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला. तो १९५१ मध्ये न्यूझीलंडने आयोजित केलेल्या भारतातल्या मध्य हिमालय (गढवाल) गिर्यारोहण मोहिमेत व १९५२ मध्ये ब्रिटनने आयोजित केलेल्या चो ओयू या मौंट एव्हरेस्टच्या पश्चिमेकडील शिखरांवरील मोहिमेत सहभागी झाला होता. 

 

सर एडमंड हिलरी
 

१९५३ मधील वसंत ऋतूत रॉयल जिऑग्रफिकल सोसायटी आणि अल्पाइन क्लब यांनी सर जॉन हंट या प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहकाच्या नेतृत्वाखाली मौंट एव्हरेस्ट (८,८४८ मी.) हे जगातील सर्वोच्च शिखर चढून जाण्याची एक नियोजनबद्ध मोहीम आखली होती. या मोहिमेत एडमंड हिलरी आणि ⇨ शेरपा तेनसिंग सामील होते. २७ मे १९५३ रोजी एव्हरेस्टच्या माथ्यावर जाण्यात काही जोड्या अयशस्वी ठरल्या. त्यानंतर २९ मे १९५३ रोजी हिलरी व तेनसिंग या दोघांनी सकाळी ११.३०वाजता जगातील सर्वोच्च शिखर मौंट एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवले. येथे हिलरीने क्रुसावरील येशूची मूर्ती आणि तेनसिंगने बुद्धमूर्ती ठेवली होती. हाय ॲड्व्हेंचर (१९५५) या पुस्तकात हिलरीने या मोहिमेसंबंधीचे वर्णन केले आहे. त्याच्या ह्या कामगिरीबद्दल राणी दुसरी एलिझाबेथ हिने हिलरीला ‘सर’ ही पदवी देऊन गौरविले, तेव्हापासून त्यास सर असे म्हणण्यात येऊ लागले. 

 

ब्रिटिश समन्वेषक व्हिव्हियन अर्नेस्ट फुश याच्या नेतृत्वाखाली १९५५–५८ या कालावधीत ब्रिटिश कॉमनवेल्थ ट्रान्स-अंटार्क्टिक समन्वेषण मोहीम योजिली होती. या मोहिमेत न्यूझीलंडच्या तुकडीचे नेतृत्व हिलरीकडे होते. यावेळी ४ जानेवारी १९५८ रोजी हिलरी तेथे स्थापन केलेल्या ठाण्यापासून ट्रॅक्टरच्या साहाय्याने दक्षिण ध्रुवावर पोहोचला होता. १९६० च्या दशकातील सुरुवातीच्या काळात त्याने एव्हरेस्ट परिसरात इतरही मोहिमा काढल्या परंतु एव्हरेस्टच्या माथ्यावर पुन्हा जाण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. न्यूझीलंड, अमेरिका आणि ब्रिटन यांनी १९६०-६१ मध्ये हिलरीच्या नेतृत्वाखाली जास्त उंचीवर मानवावर होणारा परिणाम व हिममानवाच्या अस्तित्वाचा शोध यांसाठी मोहीम योजली होती. येथे हिममानवाच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध होत नाहीत, असे हिलरीने नमूद केले. मे १९६१ मध्ये द वर्ल्ड बुक एन्साइक्लोपीडीया ने हा पुरस्कृत केलेल्या मकालू-१ (८,४८१ मी.) या शिखराची गिर्यारोहण मोहीम ऑक्सिजनशिवाय योजली होती मात्र यावेळी हिलरीस हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यास पुन्हा काठमांडूस नेण्यात आले होते. तसेच १९६७ मध्ये अंटार्क्टिका मोहिमेत हिलरी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तेथील मौंट हर्षलची उंची ३,३३५ मी. प्रथम मोजली होती. हिलरीने १९७७ मध्ये गंगा नदीच्या मुखापासून पहिल्या टप्प्यापर्यंत जेट बोटीच्या साहाय्याने व त्यापुढे चढत जाऊन तिच्या हिमालयातील उगमस्थानापर्यंत समन्वेषण केले होते. 

 

हिलरीला त्याच्या कामगिरीबद्दल वेगवेगळ्या सन्मानांनी गौरविले गेले. १९८५–८८ या कालावधीत तो न्यूझीलंडचा भारत, नेपाळ आणि बांगला देशाच्या उच्चायुक्त पदावर होता. न्यूझीलंडने ऑर्डर ऑफ द गार्टर (१९९५), पोलंडने कमांडर्स क्रॉस आणि भारताने २००८ मध्ये पद्मविभूषण ही पदवी देऊन त्याला गौरविले. 

 

हिलरी अत्यंत नम्र होता. स्वभावने मनमिळावू होता. नेपाळमधील शेरपा लोकांबद्दल त्याच्या मनात स्नेह होता. नेपाळी लोकांनी शिकावे असे त्याला वाटे. त्यांच्या कल्याणासाठी त्याने हिमालयन ट्रस्ट (१९६०) ही संस्था स्थापन करून याद्वारे नेपाळमधील प्रामुख्याने शेरपांसाठी शाळा व रुग्णालये बांधली आणि विमानसेवा निर्माण केले. नेपाळ-वासीयांबद्दल त्याला असणारा स्नेह व त्यांच्यासाठी त्याने केलेल्या कार्याबद्दल नेपाळ सरकारने २००३ मध्ये एव्हरेस्ट मोहिमेच्या पन्नासाव्या वर्धापनदिनी हिलरीस नेपाळचे मानद नागरिकत्व दिले. 

 

हिलरीने केलेल्या समन्वेषण व गिर्यारोहक मोहिमांविषयी अनेकपुस्तके लिहिली आहेत. यांमध्ये ॲक्सेंट ऑफ एव्हरेस्ट (१९५४), द क्रॉसिंग ऑफ अंटार्क्टिका, द कॉमनवेल्थ ट्रान्स-अंटार्क्टिक एक्स-पेडिशन (१९५८), नो लॅटिट्यूड फॉर एरर (१९६१), हाय इन द थिन कोल्ड एअर (डेसमंड द्योगसह) (१९६२), नथिंग व्हेंचर नथिंग विन (१९७५) हे आत्मचरित्र, फ्रॉम द ओशन टू द स्काय (१९७९), यांचा अंतर्भाव आहे. 

 

ऑक्लंड येथे त्याचे निधन झाले. 

गाडे, ना. स.