हार्डी, गॉडफ्री हॅरल्ड :  (७ फेब्रुवारी १८७७ –१ डिसेंबर १९४७). इंग्रज गणितज्ञ. संख्या सिद्धांत आणि गणितीय विश्लेषण यांमध्ये विशेष कार्य केल्याबद्दल प्रसिद्ध. त्यांनी अविभाज्य संख्या सिद्धांतावरील अनेक प्रमेये सोडविली.

 

हार्डी यांचा जन्म क्रेन्ले (सरी, इंग्लंड) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण क्रेन्ले येथेच झाले. त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून तेराव्या वर्षीच विंचेस्टर महाविद्यालयात प्रवेश घेतला. १८९६ मध्ये ते केंब्रिजमधील ट्रिनिटी महाविद्यालयात पुढील शिक्षणाकरिता गेले. रॉबर्ट ॲल्फ्रेड हेर्मान यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करून हार्डी १८९८ मध्ये गणितातील ट्रायपॉस परीक्षा उत्तीर्ण झाले (रँग्लर झाले ). १९०० मध्ये ते ट्रिनिटी महाविद्यालयात फेलो झाले. त्यांनी १९०६–१९ या कालावधीत गणित विषयावर अनेक व्याख्याने दिली. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात भूमितीचे सॅव्हिलियन प्राध्यापक (१९१९) प्रिन्स्टन विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक (१९२८-२९) आणि केंब्रिज विद्यापीठात गणिताचे सॅड्लेरियन प्राध्यापक (१९३१–४२) होते.

 

हार्डी व जर्मन वैद्य व्हिल्हेल्म वाइनबर्ग यांनी १९०८ मध्ये स्वतंत्रपणे समष्टी आनुवंशिकी यासंबंधीचे सूत्र सांगितले. त्याला हार्डी-वाइनबर्ग नियम म्हणून संबोधितात. त्यांच्या या नियमामुळे प्रभावी जनुक व अप्रभावी जनुक यांचे गुणोत्तर मोठ्या प्रमाणावरील संमिश्र समष्टीकरिता देखील उपयुक्त ठरले. त्यांचे नियम भविष्यात अनेक जनुकीय समस्यांसंबंधीच्या निराकरणाकरिता महत्त्वाचे ठरले. उदा., र्‍हीसस रक्तगट वर्गीकरण, रक्तविलयित रोग.

 

हार्डी यांनी १९०८ मध्ये ए कोर्स ऑफ प्युअर मॅथेमॅटिक्स हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यांना १९१२ पासून जॉन ई. लिट्लवुड यांचे सहकार्य लाभले. त्यांनी एकत्रितपणे पुष्कळ संशोधन प्रसिद्ध केले. त्यांनी प्रकाशित केलेले प्रबंध डायोफँटसचा वैश्लेषिक सिद्धांत, अपसारी श्रेणीचे संकलन, फूर्ये श्रेढी, रीमान झीटा फलने आणि अविभाज्य संख्यांचे वर्गीकरण यांसारख्या मूलभूत गणिती विषयांना उपयुक्त ठरले.

 

भारतीय गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांना प्रकाशात आणण्याचे महत्त्वाचे काम हार्डी यांनीच केले. या दोघांनी संख्या विभाजनामध्ये मौलिक संशोधन केले (१९१४–१९).

 

हार्डी यांचे लेखन सात खंडांत प्रसिद्ध झाले आहे. केंब्रिज विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथमालेमध्ये त्यांचे चार ग्रंथ आहेत ते पुढीलप्रमाणे : (१) द इंटिग्रेशन ऑफ फंक्शन ऑफ ए सिंगल व्हेरिएबल (१९०५), (२) ऑर्डर्स ऑफ इन्फिनिटी (१९१०), (३) द जनरल थिअरी ऑफ डीरिक्लेज सीरीझ आणि (४) फूर्ये सीरीझ. त्यांची इतर प्रकाशने पुढीलप्रमाणे : इनइक्वॅलिटीज (१९०८) ॲन इन्ट्रॉडक्शन ऑफ द थिअरी ऑफ नंबर्स (१९३८) ए मॅथेमॅटिशियन्स ॲपॉलॉजी (१९४०) बर्ट्रंड रसेल अँड ट्रिनिटी, डायव्हर्जंट सीरीझ (१९४९).

 

हार्डी हे रॉयल सोसायटीचे फेलो होते. त्यांना रॉयल पदक (१९२०), दि मॉर्गन पदक (१९२९), शौव्हेनेट पारितोषिक (१९३२), कॉप्ली पदक (१९४७) इ. मानसन्मान मिळाले. पॅरिस ॲकॅडेमीने १९४७ मध्ये त्यांना Associēētranger (असोशिएट एलीयन) हा बहुमान अर्पण केला.

 

हार्डी यांचे केंब्रिज (इंग्लंड) येथे निधन झाले.  

 

                          ओक, स. ज. गायकवाड, पल्लवी