हाइड, डग्लस :(१७ जानेवारी १८६०–१२ जुलै १९४९). नामवंत गेलिक विद्वान आणि लेखक. आयर्लंडमधील फ्रेंचपार्क, काउंटी रॉसकॉमन येथे जन्मला. १८८४ मध्ये ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन येथूनतो पदवीधर झाला. प्राचीन गेलिक भाषेचा अभ्यास त्याने येथेच केला. डब्लिन येथील ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’ मध्ये आधुनिक आयरिश भाषेचा प्राध्यापक म्हणून १९०९ पासून तो अध्यापन करू लागला.१९३२ मध्ये तो निवृत्त झाला. द लव्ह साँग्ज ऑफ कॉनॉट (१८९३) आणि ए लिटररी हिस्टरी ऑफ आयर्लंड (१८९९) हे त्याचे अभ्यास-पूर्ण ग्रंथ उल्लेखनीय आहेत. त्याच्या इतर ग्रंथांत द बर्स्टिंग ऑफ द बबल अँड अदर आयरिश प्लेज (१९०५) आणि लेजंड्स ऑफ सेंट्स अँड सिनर्स (१९१५) यांचा समावेश होतो.

 

आयर्लंडवर इंग्रजांची सत्ता असतानाच्या काळात गेलिक भाषेची आपल्या जन्मभूमीतच गळचेपी झाली. आयर्लंडमध्येच ती बोलणारे अल्पसंख्य झाल्यावर तिच्या पुनरुज्जीवनाचा विचार सुरू झाला. त्यावेळी डग्लसने ‘गेलिक लीग ङ्खची स्थापना केली (१८९३). गेलिक लीगच्या स्थापनेमुळे अनेक आयरिश लेखकांनी गेलिक भाषेत लेखन करून आधुनिक गेलिक साहित्याच्या निर्मितीचा प्रयत्न केला. १९२२ मध्ये ‘आयरिश फ्री स्टेट ङ्खची स्थापना झाली. ‘आयरिश फ्री स्टेट ङ्खच्या सिनेटचा तो काही काळ सदस्य होता. १९३७ च्या संविधानानुसार ‘आयरिश फ्री स्टेट’ चे रूपांतर आयरमध्ये (आयर्लंडचे प्रजासत्ताक) झाले, तेव्हा त्याची आयर्लंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

 

डब्लिन येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.