हॅरिसबर्ग : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पेनसिल्व्हेनिया राज्याची राजधानी आणि डॉफन परगण्याचे मुख्यालय. ते फिलाडेल्फियाच्या पश्चिमेस १४५ किमी.वर सस्क्वेहॅना नदीच्या पूर्वकाठावर वसलेले असून परिसरातील निर्मितिउद्योगांचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. लोकसंख्या ४९,६९३ (२०१२). १७१८ मध्ये ब्रिटिश व्यापारी जॉन हॅरिस याने येथे व्यापारासाठी वसाहत स्थापन केली व सोळाव्या लुईसच्या सन्मानार्थ लुईसबर्ग हे नाव दिले. पुढे १७८५ पासून याचे हॅरिसबर्ग असे नामांतर करण्यात आले. १८१२ मध्ये या शहरास पेनसिल्व्हेनियाच्या राजधानीचा दर्जा मिळाला. अमेरिकन यादवी युद्धकाळात आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात हॅरिसबर्ग हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले. याच काळात येेथे लोह-पोलाद उद्योग, शेतमालावर प्रक्रिया व दुग्धव्यवसाय भरभराटीस आले. १९३० मध्ये उभारण्यात आलेल्या न्यूयॉर्क ते शिकागो यांदरम्यानच्या अतिवेगवान, उच्च तंत्रज्ञानाच्या लोहमार्गावरील हॅरिसबर्ग हे एक स्थानक बनल्यामुळे या शहराचा अधिक वेगाने विकास झाला आहे. दुसऱ्या महायुद्धकाळात या शहरात संरक्षक छावणी उभारण्यात आली होती. आजमितीस या शहरात सेवा आधारित व्यवसायांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामध्ये आरोग्यविषयक सेवा, जैव तंत्रज्ञान उद्योग, अन्नपदार्थ व संगणकाचे सुटे भाग यांचे निर्मितिउद्योग यांचा प्रामुख्याने समावेश होतो. येथे पेनसिल्व्हेनिया राज्यातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन भरविले जाते. शहरात शिक्षणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध असून हॅरिसबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी, डिक्सन विद्यापीठाचेउपकेंद्र या शैक्षणिक संस्था येथे कार्यरत आहेत. द पेनसिल्व्हेनिया स्टेटकॅपिटॉलचा घुमट (घुमट-उंची ८४ मी.), नॅशनल सिव्हिल वॉर म्यूझीयम ह्या येथील ऐतिहासिक वास्तू असून शिवाय शहरात अनेक उद्याने दिसून येतात.
बिराजदार, गोविंद
“