हॅडन, ॲल्फ्रेड कोर्ट :(२४ मे १८५५–२० एप्रिल १९४०). प्रसिद्ध ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ-मानवजातिविज्ञ व आधुनिक मानवशास्त्राचा एक प्रणेता. केंब्रिज विद्यापीठात त्याने सु. तीस वर्षेअध्यापन करून मानवशास्त्राला निरीक्षणात्मक शास्त्रांत एक विशिष्टस्थान प्राप्त करून दिले. त्याचा जन्म लंडनमध्ये एका सुशिक्षित कुटुंबात झाला. सुरुवातीचे शिक्षण घेऊन त्याने ख्राइस्ट महाविद्यालयातून( केंब्रिज) तौलनिक शारीरशास्त्र व प्राणिशास्त्र हे विषय घेऊन पदवीसंपादन केली. त्याची प्राणिशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रॉयल कॉलेज ऑफसायन्स (डब्लिन) येथे नियुक्ती झाली (१८८०). त्याने इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ एम्ब्रिओलॉजी (१८८७) हा ग्रंथ लिहिला. त्यानंतरत्याने सागरी जीवविज्ञानावर काही शोधनिबंध लिहिले. हॅडनने सागरी जीवविज्ञानाचा अभ्यास करण्याकरिता टॉरस सामुद्रधुनीत प्रवेश केला (१८८८) पण तेथील मूळ लोकांनी त्याचे लक्ष वेधून घेतले आणिउर्वरित जीवनात त्याचा अभ्यासविषय शारीरिक मानवशास्त्र झाला. तोकेंब्रिज विद्यापीठात गेला (१८९३) आणि त्याने शारीरिक मानवशास्त्रावर व्याख्याने दिली, अध्यापन केले. त्यानंतर १८९८ मध्ये त्याने टॉरस सामुद्रधुनी, न्यू गिनी आणि सारावाक या भूप्रदेशांत केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांची मानवशास्त्रीय अभ्यास मोहीम काढली. आधुनिक मानव-शास्त्रातील क्षेत्राभ्यासास उपयुक्त ठरतील अशा आधारभूत तंत्रांच्यामूलभूत तत्त्वांचा, विशेषतः वंशावळींच्या अभ्यासाबाबतचा, आराखडा त्याने तयार केला. तेथून परत आल्यानंतर केंब्रिज विद्यापीठाने त्याच्या क्षेत्राभ्याससेवेची दखल घेऊन त्याला मानवजातिविज्ञान विषयात अधि-व्याख्याता नेमले आणि त्याच्या महाविद्यालयाने त्यास अधिछात्रवृत्ती दिली (१९०१). केंब्रिज विद्यापीठात मानवशास्त्रविषयक अभ्यास मंडळाची १९०४ मध्ये स्थापना झाली. त्याने विद्यापीठात प्रपाठक म्हणून १९०९–२६ या काळात अध्यापन केले. निवृत्तीनंतर त्याने उर्वरित जीवन लेखन–वाचनात व्यतीत केले.

 

हॅडनने विपुल स्फुटलेखन (सु. ६०० शोधनिबंध) व ग्रंथलेखनकेले. त्याच्या ग्रंथांपैकी इव्हलूशन इन आर्ट (१८९५), द स्टडी ऑफमॅन (१८९८), हेड-हंटर्स : ब्लॅक, व्हाइट अँड ब्राउन (१९०१),मॅजिक अँड फेटिसिझम (१९०५), द रेसिस ऑफ मॅन अँड देअर डिस्ट्रिब्यूशन (१९०७), हिस्टरी ऑफ अँथ्रपलॉजी (१९१०), वाँडरिंग्ज ऑफ पीपल्स (१९११), वी यूरोपिअन्स (१९३६ सहलेखक, सर जे. एस्. हक्सली) इ. प्रसिद्ध व मान्यवर होत.

 

केंब्रिजशर येथे त्याचे वृद्धापकाळाने निधन झाले.

कुलकर्णी, वि. श्री.