हळकट्टी, फकिराप्पा गुरुबसाप्पा : (? १८८०–? १९६४). कन्नड लेखक. कर्नाटकमध्ये ‘वचनपितामह’ म्हणून विशेष लोकप्रिय. धारवाड येथील वीरशैव पंथीय हळकट्टी कुटुंबात ते जन्मले. ते तीन वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. धारवाड येथील बासेल मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतले (१८९०–९६). तेथील प्राचार्य एफ्. किट्टेल (कन्नड-इंग्लिश कोशा चे जनक) यांच्या प्रेरणेने ते पुढे कन्नड साहित्याकडे आकृष्ट झाले. सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये (मुंबई) शिक्षण घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. आणि एल्एल्.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. पुढे त्यांनी विजापूर येथे वकिली सुरू केली. त्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांतही त्यांनी कार्य केले. त्यांनी विजापूरमध्ये विद्यालयाची स्थापना केली. शेतकरी, विणकर, कुंभार इत्यादींसाठी त्यांनी सहकारी सोसायटी स्थापन केली (१९१२). मुंबईच्या विधिमंडळाचे सदस्य असताना (१९२०) त्यांनी विजापूरमधील राजकीय चळवळीला चालना दिली.
⇨ बसवेश्वर व त्यांच्या काळातील अन्य वीरशैव संतांनी आपल्या आध्यात्मिक चर्चेतून जे वचनसाहित्य निर्माण केले होते, ते कालौघात नष्ट होण्याच्या मार्गावर होते. हळकट्टी यांनी गावोगाव भ्रमंती करून अशी हस्तलिखिते गोळा केली आणि संकलित करून ती प्रकाशित केली. १९२० पर्यंत त्यांनी अशा सु. एक हजार हस्तलिखितांचे संकलनकेले. त्यांनी लिंगायत परिषदेमध्ये (१९२१) संकलित हस्तलिखितांचे भव्य प्रदर्शन भरविले व तत्संबंधी व्याख्यानही दिले. बसवेश्वरांच्या वचनांचा इंग्रजीमध्ये अनुवाद करून ती प्रकाशित करणारे हळकट्टी हे पहिले कन्नड साहित्यिक होत. त्यांनी स्वतःची ‘हितचिंतक प्रेस’ सुरू केली (१९२५), तसेच शिवानुभव नावाचे त्रैमासिकही काढले (१९२६). त्यातून बसवेश्वर, ⇨ अल्लमप्रभु, ⇨ अक्कमहादेवी व अन्य वीरशैव संतांचे (शिवशरणांचे) साहित्य प्रसिद्ध होत असे. ⇨ हरिहर या प्रख्यात वीरशैव कवीचे रगळे प्रथम शिवानुभव मधून प्रकाशित झाले. शिवानुभवमधून जवळजवळ ८० ग्रंथ प्रकाशित झाले. हळकट्टी हे नवकर्नाटक या साप्ताहिकाचेही संपादक होते.
हळकट्टी यांनी संकलित व संपादन केलेल्या काही उल्लेखनीय साहित्यकृती पुढीलप्रमाणे : बसवेश्वर वचनगळु (१९२६), वीरशैव रगळे (१९२६ वीरशैवीयांमध्ये आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी रगळे छंदात रचलेले), वीर महेश्वराचार्य पुष्पदंताज महिम्नास्तोत्र (१९२६), तोंटदार्य रगळे (१९२६), महादेवीयक्कणा वचनगळु (१९२७), चन्नबसप्पा बसलिंगाप्पा (जीवनचरित्र १९३०), गुळरसिद्धवीरणाचार्याचे ⇨ शून्यसंपादने (१९३०), आदय्यणा वचनगळु (१९३०), वचन-शास्त्र-सार( भाग १–३ १९३१, १९३३ व १९३९), हरिहरण रगळोगळु (७ भाग, १९३३, १९३५ व १९४०), देवर दासिमय्यणा वचनगळु (१९३९), ⇨ राघवांकसंपादित अदिसेत्ती पुराण, शिवानुभव शब्दकोश (१९४३), शिवशरनार चरित्रेगळु (भाग १–३ १९४४, १९४८ व १९५१), शिवशरण्येर चरित्रेगळु (१९५९) इत्यादी. पाश्चात्त्य जगताला त्यांनी मध्ययुगीन दुर्मिळ कन्नड साहित्याचा परिचय करून दिला. त्यामुळे त्यांना ‘कन्नड माक्स म्यूलर’ म्हटले जात असे.
बेल्लारी येथील अखिल भारतीय कन्नड साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते (१९२६). वचनसाहित्यातील त्यांच्या या अपूर्व कार्यासाठी ब्रिटिश अमदानीतील भारत सरकारतर्फे त्यांना ‘रावसाहेब’ व ‘रावबहादूर’ या पदव्या बहाल करण्यात आल्या. कर्नाटक विद्यापीठाने डी.लिट् ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला (१९५६).
पोळ, मनीषा
“