हरिहर – २ : कर्नाटक राज्याच्या दावणगेरे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर व याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,४५,००० (२०११). दावणगेरे व बंगलोरच्या वायव्येस अनुक्रमे १४ किमी. व सु. २७५ किमी.वर तुंगभद्रा नदीच्या उजव्या काठावर वसलेले हे शहर ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. हे रस्त्याने व रेल्वेने इतर मोठ्या शहरांशी जोडलेले असून पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हा याच्या अगदी जवळून जातो. येथे १८७१ मध्ये नगरपालिकेची स्थापना करण्यात आली असून अनेक वेळा ते हरिहर-दावणगेरे अशा जुळ्या नावाने ओळखले जाते.
या शहराचे प्राचीन नाव ‘गुहारण्य’ किंवा ‘गुहारण्य क्षेत्र’ असे होते. याच्या ‘हरिहर’ या नावाविषयी एक पौराणिक कथा प्रचलित आहे. तीनुसार गुह अथवा गुहासूरनामक राक्षस या वनाचा अधिपती होता. त्यामुळे हे गुहारण्य या नावाने ओळखले जात होते. त्याने मानव, राक्षस अथवा देव यांच्यापासून अवध्य होण्याचा वर ब्रह्मदेवाकडून मिळविला होता. त्यामुळे तो उन्मत्त झाला होता. त्याच्या अत्याचारांना कंटाळून सर्व देवांनी व ऋषिमुनींनी विष्णू (हरी) व शंकर (हर) यांना विनंती केल्यावरून त्या दोघांनी एकरूप होऊन तुंगभद्रा व हरिद्रा या नद्यांच्या संगमावरील कुडलूर येथे हरिहराचा अवतार घेतला व गुह राक्षसाचा वध केला. त्यामुळे या ठिकाणाला हरिहर हे नाव पडले. येथील हरिहरेश्वर मंदिरातील मूर्तीसंयुक्त रूपातील असून तिचा डावा भाग विष्णुरूपात (अभय मुद्रा व चक्रधारी), तर उजवा भाग शिवरूपात (रुद्राक्षांचा मुकुट असलेला त्रिशूलधारी) आहे. ही मूर्ती शंकरनारायण या नावानेही ओळखली जाते.
हरिहरेश्वर मंदिर रेल्वे स्थानकापासून जवळच असून त्याच्या परिसरात अनेक शिलालेख सापडले आहेत. त्यांतील उल्लेखांवरून हे मंदिर होयसळ- वंशीय बल्लाळराजाने जक्कण आणि डंकण या पितापुत्र स्थापत्यविशारदां-करवी १२२३ मध्ये बांधून घेतले. हे मंदिर एका विशाल कमळाच्या आकाराचे असून त्याचे छत एकूण ६४ खांबांवर आधारलेले आहे. गाभाऱ्यातील हरिहराची संयुक्त मूर्ती सु. १.२२ मी. (४ फूट) उंचीची आहे. मंदिराच्या छतावर ‘दावणगेरे ३९’ हा कोरीव लेख असून इतक्या उंची-वरील हा लेख दुर्मिळ मानला जातो. मंदिराच्या ईशान्य भागात एकविशाल शिवलिंग आहे. मंदिराजवळच एक छोटे, मूर्ती नसलेले मंदिरअसून ते देवीचे असल्याचे मानतात. मुख्य मंदिराच्या मागील बाजूसतुंगभद्रा नदीपात्रात ब्रह्म, भार्गव, नृसिंह, ऋणमोचन, चक्र इ. ११ तीर्थे दाखविली जातात. ‘आद्य शंकराचाऱ्यांचा अद्वैत सिद्धान्त हाच वेदाचे खरे रहस्य आहे’, अशा अर्थाचा उच्चार मुख्य मंदिरातील हरिहर मूर्तीनेकेल्याचे सांगितले जाते. हे गाव चालुक्यांनी ब्राह्मणांना अग्रहार म्हणून दिल्याचे उल्लेख येथील शिलालेखात आढळतात. तसेच होयसळ, यादव, विजयानगरचे राजे यांनी मंदिराला देणग्या दिल्याचेही उल्लेख आहेत. विजयानगरच्या पतनानंतर हे ठिकाण तारिकेरे प्रमुखांकडे गेले व त्यांनीयेथे किल्ला बांधल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर हे सावनूरच्या नबाबाने घेतले व सरदार शेरखानला जहागीर म्हणून दिले. सतराव्या शतकात बिदनूरच्या प्रमुखांकडे, पुढे १७६३ मध्ये हैदरकडे व नंतर मराठ्यांकडे याची सत्ता होती. १८६५ पर्यंत हरिहराच्या जवळच सु. ३ किमी.वर इंडियन रेजिमेंटची छावणी होती. १८६८ मध्ये येथे तुंगभद्रा नदीवर दगडी पूल बांधण्यात आला व त्याद्वारे हे बंगलोर, धारवाड या शहरांशी हमरस्त्याने जोडले गेले.
मुख्य मंदिराशिवाय येथे पार्वती मंदिर, ओंकार मठ, राम मंदिर, राघवेंद्रस्वामी मंदिर, मदर मेरी चर्च, शाहवली दर्गा इ. अन्य धार्मिक स्थळे आहेत. शहरात म्हैसूर किर्लोस्कर एज्युकेशन ट्रस्ट ही जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असून तिच्या अन्य शिक्षणसंस्थांमार्फत अभियांत्रिकी वगळता सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत.
हरिहर येथे किर्लोस्कर कंपनीने १९४१ मध्ये यांत्रिक हत्यारे बनविण्याचा कारखाना काढल्यापासून शहरपरिसरात उद्योगधंद्यांचा मोठ्या प्रमाणात विकास सुरू झाला आहे. येथील औद्योगिक क्षेत्रात आदित्य बिर्ला उद्योग समूहातर्फे विविध कारखाने सुरू करण्यात आले आहेत परंतु उद्योगधंद्यांच्या विकासाबरोबरच येथील तुंगभद्रा नदीच्या प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे.
चौंडे, मा. ल.