हरितक्रांति : कृषी क्षेत्रात १९४०–७० या काळात जागतिक पातळीवर संशोधन व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून धान्योत्पादनात उल्लेखनीय वाढ केली गेली. ती चळवळ म्हणजे हरितक्रांती. अमेरिकन कृषिशास्त्रज्ञ व हरितक्रांतीचे जनक ⇨ नॉर्मन बोर्लॉग यांनी मेक्सिकोयेथे कृषी क्षेत्रात व्यापक असे संशोधन करून जादा व भरपूर उत्पन्न देणाऱ्या, रोगांचा प्रतिकार करणाऱ्या विविध पिकांच्या जाति-प्रजातीविकसित केल्या. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या चळवळीमुळे शेती उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊन लक्षावधी लोकांची उपासमार होण्याचे टळले. कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनाबद्दल तसेच भारत, मेक्सिको व मध्यपूर्व देशांतील दुष्काळाच्या प्रसंगी लाखो लोकांचे प्राण वाचविल्या-बद्दल नॉर्मन यांना शांततेचे नोबेल पारितोषिक (१९७०) व गोल्डमेडल ऑफ सायन्स (२००७) ह्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डिव्हेलपमेंटचे संचालक विल्यम गौड यांनी पहिल्यांदा शेती संदर्भातील चळवळीला उद्देशून ‘ हरितक्रांती’ ही संज्ञा वापरली (१९६०). हरितक्रांतीचा जागतिक पातळीवरील इतिहास अभ्यासल्यास या चळवळीचा प्रारंभ १९४० मध्ये नॉर्मन यांच्या या क्षेत्रातील संशोधनाने झाल्याचे दिसते. त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांतून रोगप्रतिबंधक व भरपूर उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जाती विकसित केल्या. परिणामतः मेक्सिको हा देश आपल्या नागरिकांच्या गरजेपेक्षा जादा गव्हाची पैदास करून १९६० च्या दशकात इतर देशांना गव्हाची निऱ्यात करू लागला. मेक्सिकोतील हरितक्रांतीच्या यशोगाथेनंतर १९५०–६० या काळात ही चळवळ जगभर विस्तारली. अमेरिका हा देश १९४० च्या दशकात स्वतःला आवश्यक असलेल्या गव्हाच्या निम्मा गहू आयात करीत असे परंतु हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यानंतर १९५० च्या दशकात गव्हाच्या बाबतीत तो स्वयंपूर्ण झाला व १९६० च्या दशकात इतर देशांना गव्हाची निऱ्यात करू लागला.
जगभरातील वाढत्या लोकसंख्येला मुबलक अन्नधान्य उपलब्ध व्हावे व हरितक्रांतीचे तंत्रज्ञान पुढेही सातत्याने वापरले जावे, याच्या संशोधना-साठी अमेरिकेतील रॉकफेलर प्रतिष्ठान, फोर्ड प्रतिष्ठान तसेच जागतिक पातळीवरील अनेक संस्थांनी भरीव निधीची व्यवस्था केली. १९६४ मध्ये या आर्थिक पाठबळाच्या आधारे मेक्सिकोने इंटरनॅशनल मेझ अँडव्हीट इंपु्रव्हमेंट सेंटर नावाच्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापनाकेली. नॉर्मन यांच्या अथक प्रयत्नाने सुरू झालेल्या हरितक्रांतीमुळे वतत्सम संशोधनामुळे जगभरातील बहुसंख्य देशांना लाभ झाला. भारतातील जलसिंचनाच्या अपुऱ्या सोयी, शेतीच्या पारंपरिक व जुनाट पद्धती, पतपुरवठ्याचा अभाव, परकीय चलनाची चणचण व सतत वाढणारी लोकसंख्या या कारणांमुळे भारतात हरितक्रांतीची निकड निर्माण झाली. १९६० च्या पूर्वार्धात भारतात दुष्काळ पडला. तेव्हा नॉर्मन यांचे कृषी क्षेत्रातील संशोधन व फोर्ड प्रतिष्ठानचे आर्थिक साहाय्य यांतून’आय्आर्बी’ ही तांदळाची भरपूर उत्पन्न देणारी नवी जाती विकसितकेली गेली. जलसिंचनाच्या सोयी व खतांच्या वापरामुळे या प्रकारच्या तांदळाचे अधिक उत्पन्न घेणे शक्य झाले व संभाव्य उपासमार टळली. सध्या भारत हा तांदळाची पैदास करणाऱ्या आघाडीच्या देशांपैकी एक असून ‘आय्आर्बी’ तांदळाचा वापर आशियाई देशांत आहारातील महत्त्वाचा घटक म्हणून केला जात आहे. तांदळाबरोबरच नॉर्मन यांनी १९६३ मध्ये जादा उत्पन्न देणाऱ्या संकरित गव्हाची जाती विकसितकेली. या गव्हाच्या भरपूर उत्पन्नामुळे भारत हा स्वावलंबी देश झालाव लोकांचा शेती व्यवसायावरील विश्वास द्विगुणित झाला. भारतासारख्या अन्नधान्याची नेहमी टंचाई जाणवणाऱ्या देशाला हरितक्रांतीमुळे अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता आले. भारतातील थोर कृषितज्ज्ञ व भारतीय हरितक्रांतीचे जनक ⇨ मोनकोंबू सांबशिवन् स्वामीनाथन्, ⇨ पंजाबराव देशमुख, ⇨ वसंतराव नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांकडे हरितक्रांतीचे मोठे श्रेय जाते.
जगभर हरितक्रांतीच्या यशस्वितेसाठी संशोधन व तंत्रज्ञानाबरोबरच अधिक उत्पन्न देणाऱ्या संकरित बी-बियाणे यांची पैदास, जलसंधारण (सिंचन), कीटकनाशके व जंतुनाशकांचा वापर, जमिनीचे एकत्रीकरण, शेती-पुनर्रचना, ग्रामीण विद्युतीकरण, दळणवळणाच्या सोयी, पतपुरवठा, रासायनिक खतांचा वापर, पीक पद्धतीत बदल, शेतकी संस्था, शेतकी महाविद्यालये व कृषी विद्यापीठांची स्थापना या बाबींचा हातभार लागला. व्यावसायिक दृष्टिकोण व खतांच्या – विशेषतः रासायनिक खतांच्या–मोठ्या प्रमाणावरील उपलब्धतेमुळे हरितक्रांतीची चळवळ यशस्वी होऊ शकली. जलसिंचनाच्या वाढत्या सोयींमुळे केवळ पावसावर अवलंबून शेती करण्याचे दिवस मागे पडले. जिराइती शेतीही लागवडीखाली येऊन एकूण लागवडक्षेत्र वाढले. अधिक उत्पन्न देणारे बी-बियाणे उपलब्ध झाल्याने उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. बियाण्यांचे प्रमाणीकरण झाल्याने थोड्या परंतु विशिष्ट जातींचे (प्रकारांचे) उत्पन्न घेतले जाऊ लागले. उदा., भारतात हरितक्रांतीच्या पूर्वी जवळपास ३,००० प्रकारच्या तांदळाचे उत्पन्न घेतले जायचे परंतु सध्या भरपूर उत्पन्न देणाऱ्या १०-११ प्रकारच्या जातींद्वारे तांदळाचे पीक घेतले जाते. पिकांची संख्या व प्रकार कमी झाल्याने त्यासाठी आवश्यक ती रोगप्रतिबंधक औषधे (कीटक व जंतुनाशके) निर्माण करणे शक्य व सुलभ झाले. पिकांचे प्रकार कमी झाल्याने रोगांचा प्रादुर्भाव रोखणे व त्यांचे संरक्षण करणे शक्य झाले.
हरितक्रांतीमुळे धान्य उत्पादनात कमालीची भर पडून वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असे पुरेसे धान्य उपलब्ध होऊ शकले. ही जरी जमेची बाजू असली, तरी लोकसंख्येत सातत्याने भर पडत असल्याने व जमिनीचा पोत घटत असल्याने भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. जगातल्या पुढारलेल्या देशांना हरितक्रांतीचा जेवढा लाभ झाला, तेवढा आफ्रिकेमधील मागासलेल्या देशांना झाला नाही. हरितक्रांतीला अभिप्रेत असलेल्या कृषी संशोधन व तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या अविकसित देशांतील पायाभूत सोयी-सुविधांची वानवा, भ्रष्टाचार व एकूणच असुरक्षिततेची भावना या समस्या त्यासाठी कारणीभूत ठरल्या. काही बाबतीत टीका झाली असली, तरी हरितक्रांतीमुळे जगभर शेतीचाविकास होऊन आधुनिक तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याच्या साठ्यात मोठी भर पडली. भारत व चीन यांसारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांना हरितक्रांतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
चौधरी, जयवंत