हरिण : (अँटिलोप). स्तनी वर्गापैकी समखुरी (ज्यांच्या पायावरील खुरांची संख्या सम असते अशा प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला) गणाच्या गो-कुलातील (बोव्हिडी) व बोव्हिनी या उपकुलातील प्राणी. त्यांचा आढळ घनदाट अरण्ये, मैदानी प्रदेश, वाळवंटी प्रदेश, दलदलीचा प्रदेश तसेच पर्वतांच्या उतरणींवर असतो. त्यांच्यात खूप विविधता दिसून येते. त्यांचा आफ्रिका येथे मोठ्या प्रमाणात आढळ असून दक्षिण आशियात सर्वत्र प्रसार झाला आहे. नवीन जगात (पश्चिम गोलार्धात) खरी हरिणे नाहीत. हरिणांच्या सु. ३१ प्रजातींमध्ये १०० जाती समाविष्ट आहेत. पऱ्या-वरणानुसार त्यांच्यात अनुकूलन झाल्यामुळे त्यांच्या आकार, आकारमान, हालचाल, आहार इ. गोष्टींमध्ये विविधता आढळून येते.
हरिणे दिसायला देखणी असून ते अत्यंत वेगवान प्राणी आहेत. शिंगांच्या वैशिष्ट्यांवरून त्यांची जाती ओळखता येते. सर्व जातींच्या नरांमध्ये शिंगे असतात. तसेच काही जातींच्या माद्यांनाही शिंगे असतात परंतु, ती पातळ आणि नराच्या शिंगापेक्षा लहान असतात (उदा., चिंकारा). चिंकाऱ्याला इंग्रजीत अँटिलोप ऐवजी गॅझेल म्हणतात. हरिणांची शिंगे एकदा उगवली की, मरेपर्यंत कायम राहतात. ती ⇨ मृगा च्या शिंगांप्रमाणे गळून पडत नाहीत. शिंगांना शाखा नसून ती लांब व सरळ, स्क्रूसारखी पिळदार (कॉर्कसारखी मळसूत्राकार), कोयता किंवा विळ्याच्या आकाराची, सारंगीच्या (एक तंतुवाद्य) आकाराची असून पोकळ असतात. फक्त एकट्या चौशिंगाचा अपवाद वगळता सर्व प्रकारच्या हरिणांमध्ये शिंगांची एकच जोडी डोक्यावर असते परंतु, चौशिंग्यामध्ये शिंगांच्या दोन जोड्या असतात.
हरिणे कळपाने राहतात. नर व मादीचे कळप वेगवेगळे असून मीलन काळात ते एकत्र येतात. कळपामध्ये थोड्या संख्येपासून ते सु. दहा हजारापर्यंत प्राणी असतात. त्यांचे चेहरे गाय व शेळी-मेंढीसारखे दिसतात. त्यांचे कान लंबाकृती असतात. हरिणे शेळी व बैलाच्या कुलातील असून मृगाशी त्यांचे बरेच साम्य आहे. ती शाकाहारी असून झुडपांचे शेंडे, फांद्या आणि गवत खातात. त्यांचे उदर चार कप्प्यांचे असून ते रवंथ करण्यास योग्य असते. त्यांचे पाय लांब असतात. मादीमध्ये स्तनांच्या दोन जोड्या असतात. हरिणांचे रंग निसर्गाशी मिळतेजुळते असतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात रंग अधिक गडद, तर उन्हाळ्यात तो फिका पडतो. हरिणाच्या ग्रंथीतील द्रवाला गंध नसतो.
हरिणामध्ये दातांची संख्या ३२ असते. त्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे : कृंतक ०/३ सुळे ०/३ उपदाढा ३/३, दाढा ३/३ [→दात]. खालील सुळे कृंतकासारखे असतात. काही जातींमध्ये प्रजनन काळ ठराविक असतो, तर काहींमध्ये तो वर्षभर असतो. गर्भावधिकाल १६८–२७७ दिवसांचा असून एका वेळी मादीला एकच पिलू होते. क्वचित दोन पिले (उदा., एण जातीमध्ये) होतात. वयात येण्याचा कालावधी जातीनुसार भिन्न असतो. उदा., ड्वार्फ (खुजा) अँटिलोपमध्ये तो ६ महिन्यांचा, तर ईलँडमध्ये तो ४८ महिन्यांचा असतो.
कातडी व मांसासाठी झालेल्या शिकारीमुळे हरिणांची संख्या खूप घटली आहे. आफ्रिकेत मांसासाठी त्यांची शिकार केली जाते. त्यांचेमांस म्हैस व शेळीच्या मानाने खूप पौष्टिक असते. ते उष्ण प्रदेशातील वनस्पती खात असल्यामुळे त्यांच्या मांसापासून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हरिणांच्या जातीं पैकी ईलँड, एण, चिंकारा, चौशिंगा व नीलगाय या जातींच्या नोंदी मराठी विश्वकोशा त स्वतंत्र दिलेल्या आहेत. हरिणांच्या काही जातींची वैशिष्ट्ये व वर्णने खाली दिली आहेत. तसेच काही जातींची चित्रे सदर खंडातील रंगीत चित्रपत्रामध्ये दिली आहेत.
(१) पिळदार शिंगांची बैलसदृश हरिणे : पोकळ शिंगे असलेल्या या समखुरी प्राण्यांचा समावेश स्ट्रेप्सिसेरोटिनी वर्गात होतो. यांमध्ये हरिण व बैलसदृश हरिण या दोघांचीही लक्षणे आढळतात. यांमध्ये कुडू , सीटाट्यूंगा, रानबोकडसदृश हरिण, चिलखतसदृश हरिण (हार्नेस्ड अँटिलोप), नायला, ईलँड व बोंगो यांचा समावेश होतो.
कुडू : हा पूर्व आफ्रिकेतील ट्रॅजिलॅफस प्रजातीतील हरिणांचा मोठा गट आहे. त्यामध्ये मोठा कुडू व लहान कुडू या दोन जातींचा समावेश होतो.
मोठा कुडू : याचे शास्त्रीय नाव ट्रॅ. स्ट्रेप्सिसेरोस असे आहे. ही आफ्रिकन जाती सर्वांत देखणी असून हरिणांचा राजा म्हणून ओळखली जाते. पूर्ण वाढ झालेल्या प्राण्याची खांद्याजवळ उंची सु. १४४ सेंमी. व वजन १९०–३१५ किग्रॅ. असते. मादी नरापेक्षा लहान असते. नरामध्ये शिंगांचा आकार मोठा असून त्याची लांबी सु. १.५ मी. किंवा त्यापेक्षा जास्त असते. मादीमध्ये शिंगे नसतात. त्याच्या अंगावरील केस लहान व निळसर करड्या रंगाचे असून त्यांवर दोन्ही बाजूंना ४–८ उभे पांढरे पट्टे असतात. गळ्याभोवती (माने-भोवती) झालरीप्रमाणे लांब केस असतात. त्यांचा आढळ पर्वतीय ओसाड प्रदेशांत इथिओपियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत आहे. त्यांच्या समूहामध्ये हरिणांची संख्या ६ असते. समागमानंतर मादीला ७-८ महिन्यांनी एक पिलू होते. त्यांची आयुर्मऱ्यादा १५–२० वर्षांपर्यंत असते.
छोटा कुडू : याचे शास्त्रीय नाव ट्रॅ. इम्बेरबीस असे आहे. ही जाती सर्व-साधारणपणे मोठ्या कुडूसारखीच असून आकाराने लहान असते. तिची खांद्याजवळ उंची सु. १ मी. असून वजन ६०–१०५ किग्रॅ. असते. तिचा रंग खूप तेजस्वी असतो. शरीराच्या दोन्ही बाजूंवर मोठ्या कुडूपेक्षा अधिक जास्त पांढरे पट्टे असतात. तसेच दोन्ही डोळ्यांच्यामध्ये बाणाच्या आकाराची खूण असते. मानेभोवती झालरीप्रमाणे लांब केस नसतात. पूर्व आफ्रिकेतील कोरड्या मैदानी भागांत त्यांचा वावर असतो.
सीटाट्यूंगा : याचे शास्त्रीय नाव लिम्नोट्रॅगस स्पेसी असे आहे. ती आकाराने मोठी व जलचर असून पाण्यात उत्तम पोहणारे पाणबुडे आहेत. शत्रूने जर तिचा पाठलाग केला तर ती खोल पाण्यात बुडून नाकपुड्या पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर ठेवून स्वतःचे संरक्षण करते. तिची खांद्याजवळ उंची सु. १.२ मी. असून वजन सु. १०२ किग्रॅ. असते. पाय सडपातळ विशेषतः खूर खूप लांब व बारीक असतात. शरीरावर मऊ तपकिरी रंगाची फर असून दोन्ही बाजूंना पांढरे ठिपके व पट्टे असतात. फक्त नरामध्ये नागमोडी आकाराची शिंगे असून त्यांची लांबी सु. ७६ सेंमी. असते. त्याच्या कळपामध्ये ३-४ प्राणी असून त्यामध्ये एक नर व इतर माद्या असतात. साधारणतः एप्रिलमध्ये मादीला एक पिलू होते. जन्मल्यावर ते नीळसर काळ्या रंगाचे असून शरीरावर पांढरे ठिपके व पट्टे असतात.
रानबोकडसदृश हरिण : ही ट्रॅजिलॅफस प्रजातीतील लहान हरिणे आहेत. त्यांच्या शरीराच्या वरील बाजूला लांब फर व खालील बाजूला मध्यभागी ताठ कडक केस उभे राहतात. फक्त नरामध्ये लहान, साधी व नागमोडी पिळवटलेली शिंगे असतात. त्यांचा रंग तपकिरी-करडा ते तेजस्वी लाल-पिवळा असतो. काही जातींमध्ये डोके व शरीरावर पांढरे ठिपके किंवा ओळी असतात. प्रजनन काळातील अपवाद वगळता ते एकटे वावरतात. ते दाट, काटेरी व ओसाड प्रदेशांत सामान्यपणे पाण्याच्या जवळपास राहतात. त्याच्या सु. २० उपजाती असून त्या दक्षिण आफ्रिके-तील सहारा वाळवंटात आढळतात.
चिलखतसदृश हरिण : याचे शास्त्रीय नाव ट्रॅ. स्क्रीप्टस असे असून ही रानबोकडामधील अत्यंत देखणी जाती आहे. ती तांबूस काळसर (चेस्टनटाच्या) रंगाची असून शरीराच्या खालील बाजूवर ४-५ उभे पांढरे पट्टे असतात. तसेच त्याच्या पार्श्वबाजूवर दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक पांढरा पट्टा, पार्श्वभागावर बरेचशे पांढरे ठिपके आणि छाती व गळ्यावर पांढरा पट्टा असतो. त्याची खांद्याजवळ उंची सु. १ मी. असून शिंगांची लांबी ४७ सेंमी.पर्यंत असते. प्रजनन काळ वर्षभर असतो. समागमानंतर ६-७ महिन्यांनी मादीला एक पिलू होते.
नायला : याचे शास्त्रीय नाव ट्रॅ. अंगासी असे आहे. ही देखणी दाट केसांची जाती गर्द वनांत व काटेरी ओसाड प्रदेशांत सामान्यतः पाण्याच्या जवळपास आढळते. नराचा रंग करडा, तर मादीचा तांबूस-काळसर असतो. नर व मादी या दोघांच्या शरीरावर अरुंद पांढरा उभा पट्टा आणि लांब पांढऱ्या केसांचा झालरीचा पट्टा खांद्याच्या मध्यापासून ते शेपटीपर्यंत गेलेला असतो.
ईलँड : ही जाती टॉरोट्रॅगस प्रजातीतील असून सर्व जातीच्या हरिणांमध्ये सर्वांत मोठे आहे. त्याच्या विस्तृत आकारमानामुळे ईलँड हे डच नाव त्याला पडले आहे. त्याची खांद्याजवळ उंची १.५–१.८ मी. असून नराचे वजन सु. ५४४ किग्रॅ.पर्यंत असते. नर व मादीमध्ये नागमोडी पिळदार शिंगे सु. ६० सेंमी. लांब असतात. आयुर्मऱ्यादा सु. २३ वर्षे असते. [→ ईलँड].
बोंगो : बूसेर्कस प्रजातीतील खूप मोठा व जड शरीराचा प्राणी. तो जंगली ईलँड म्हणून ओळखला जातो. त्याची खांद्याजवळ उंची सु. १.२ मी. असते. नर व मादीमध्ये शिंगे मोठी, रुंद, मजबूत आणि नागमोडी असून त्यांचा रंग तांबूस-काळसर असतो. नरामध्ये वयानुसार रंग गडद होत जातो. शरीरावर जवळजवळ बारा उभे पांढरे पट्टे असून एक रुंद पट्टी छातीभोवती आडवी व दुसरी तोंडावर आडवी असते. प्रौढ नर एकटे, तर तरुण नर व माद्या समूहात राहतात. ते पाण्याच्या आसपास राहतात.
(२) लहान शिंगांची बैलसदृश हरिणे : बॉसेलॅफिनी हा आशियातील हरिणांचा लहान वर्ग असून त्यामध्ये नीलगाय व चौशिंगा यांचा समावेश होतो.
नीलगाय : हिचे शास्त्रीय नाव बॅसिलॅफस ट्रेगोकॅमेलस असे आहे. तिच्या शरीरावर कमी केस असून खांद्याजवळ उंची सु. १.४ मी. असते. नराचा रंग पोलादी निळा असून गळ्यावर मोठ्या केसांचा झुबका असतो. फक्त नरामध्ये शिंगे असून ती लहान, शंकूच्या (तीक्ष्ण टोकाच्या) आकाराची व सु. २० सेंमी. लांब, तळाला त्रिकोणी आणि टोकाला वक्र असतात. नर-मादीमध्ये लहान आयाळ असते. नीलगायी कळपामध्ये राहतात. कळपात ४–१० सदस्य असतात. त्यामध्ये एक प्रौढ नर, अनेक माद्या, पाडसे व तरुण नर असतात. वयस्क नर शक्यतो एकटे असतात. प्रजनन काळ ठराविक नसतो. समागमानंतर ८-९ महिन्यांनी मादीला एक पिलू होते. त्या पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतात, तसेच त्यांना उन्हाचा त्रास होत नाही. त्या खूप वेगाने पळतात. चपळ घोड्यालाही त्यांची बरोबरी करता येत नाही. हिंदू धर्मामध्ये तिला पवित्र स्थान आहे. त्यामुळे तिला मारत नाहीत तसेच तिचे मांसही खात नाहीत. [→ नीलगाय].
चौशिंगा : सर्व जातींच्या हरिणांमध्ये चार शिंगे असलेला हा एकमेव प्राणी आहे, त्यामुळे त्याला चौशिंगा हे नाव पडले आहे. त्याचे शास्त्रीय नाव टेट्रासेरस क्वाड्रिकार्निस असे आहे. त्याची खांद्याजवळ उंची सु. ६८ सेंमी. असून वजन सु. २७ किग्रॅ. असते. शरीरावरील केस जाडे-भरडे व आखूड असून तांबूस-तपकिरी रंगाचे असतात. फक्त नरामध्ये शिंगांच्या दोन जोड्या असतात. त्यांपैकी एक जोडी लहान, सु. ५ सेंमी. लांब व कपाळावर डोक्याच्या वर असते तर दुसरी सामान्य शिंगाची जोडी सरळ, गोलाकार शंकूच्या आकाराची व सु. १० सेंमी. लांब असून ती दोन्ही कानांच्या मध्ये असते. नर-मादीमध्ये मागील पायाच्या खोट्या खुरांमध्ये गंध ग्रंथी असतात, हे त्याचे महत्त्वाचे असामान्य लक्षण आहे. चौशिंगे कळपात राहत नाहीत, तर ते एकएकटे किंवा जोडीने असतात. प्रजनन काळात ३-४ माद्यांच्या बरोबर एक नर असतो. समागमानंतर ५-६ महिन्यांनी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये एक पिलू जन्माला येते. [→चौशिंगा].
(३) पोहणारी हरिणे : या लहान व लाजाळू हरिणांचा समावेश सेफॅलोफिनी वर्गात होतो. यामध्ये सिल्व्हिकॅप्रा ग्रिमिआ (ग्रे ड्यूकर) आणि सेफॅलोफस (फॉरेस्ट ड्यूकर) प्रजातीमधील सु. १३ जातींचा समावेश होतो. सि. ग्रिमिआ या जातीमध्ये फक्त नराला तर इतर जातींमध्ये नर व मादीला शिंगे असतात. त्यांची शिंगे शंकूच्या आकाराची, तीक्ष्ण व टोकदार असून डोक्याच्या वरील भागावर मोठ्या केसांचा झुबका असतो. सि. ग्रिमिआ जातीमध्ये खांद्याजवळ उंची ३८–७३ सेंमी.पर्यंत असते. पूर्ण वाढ झालेल्या प्राण्याचे वजन सु. १३.६ किग्रॅ. असते. रंग करडा-तपकिरी ते तेजस्वी पिवळा असतो. मादी नरापेक्षा मोठी असते. समागमानंतर ७ महिन्यांनी साधारणपणे मे महिन्यात मादीला एक किंवा क्वचित दोन पिले होतात. आयुर्मऱ्यादा सु. १४ वर्षे असते.
(४) पाणथळ / दलदलीच्या ठिकाणी आढळणारी हरिणे : मध्यम ते मोठ्या या हरिणांचा समावेश रिड्यून्सिनी वर्गात होतो. त्यांचा अधिवास पाण्याच्या जवळपास असतो. शिंगे पाठीमागे वक्र असतात. यांत वॉटरबक, कोब, लिचवे, रीडबक आणि रेबॉक यांचा समावेश होतो.
वॉटरबक : हे आकाराने मोठे असून कोबस प्रजातीतील आहे. नराची खांद्याजवळ उंची सु. १.३ मी. असून वजन १८१–२२७ किग्रॅ. असते. फक्त नरामध्ये शिंगे असून ती सु. १ मी. लांब असतात. हे उत्तम पोहणारे असून शत्रूने पाठलाग केला असता ते पाण्याचा आश्रय घेतात. ते खूप संख्येने एकत्र येत नाहीत. समागमानंतर ८ महिन्यांनी मादीला बहुधा दोन पिले होतात.
(५) घोडासदृश हरिण : या देखण्या प्राण्यांचा समावेश हिप्पोट्रॅगिनी वर्गात होतो. यामध्ये सेबल हरिणाचा समावेश होतो. त्याचे शास्त्रीय नाव हिप्पोट्रॅगस नायगर असे आहे. त्याची खांद्याजवळ उंचीसु. १.५ मी. असून वजन सु. २०४ किग्रॅ. असते. नर आणि मादीला शिंगे असून ती विळ्याच्या आकाराची व सु. ६४ सेंमी. लांब असतात. कान लांब (सरासरी १६–१९ सेंमी.) असून मानेभोवती कमकुवत केसांची आयाळ असते. मादी व पिले तांबूस-तपकिरी रंगाची, तर नर त्यापेक्षा गडद किंवा काळ्या रंगाचे असतात.
(६) सरळ शिंगांचे हरिण : घोड्यासारखी ठेवण असलेला व बैलासारखे शेपूट असलेला प्राणी. यामध्ये आफ्रिकन काळविटाचा समावेश होतो. त्याचे शास्त्रीय नाव ऑरिक्स गॅझेला असे आहे. नरामध्ये खांद्या-जवळ उंची १.१–१.३ मी. असून वजन १८१–२०४ किग्रॅ. असते. तो त्यांच्या लांब व तलवारीसारख्या शिंगांसाठी प्रसिद्ध आहे. शिंगांची लांबी साधारण १.१ मी.पर्यंत असते. नर व मादी दोघांनाही शिंगे असून मादीची शिंगे नराच्या शिंगांपेक्षा लांब असतात. पिलांना जन्मतः लहान शिंगे असतात. त्याचा रंग उदी करडा असून चेहरा व पार्श्वभाग काळा असतो. चारही पायांच्या पुढील (दर्शनी) भागावर काळ्या रंगाच्या खुणा असतात. पायाचा खालील भाग, मुस्कट व उदर पांढऱ्या रंगाचे असून मान व इतर शरीर करड्या रंगाचे असते शरीराची ठेवण (मान) व शरीराचा मागील भाग घोड्यासारखा असून धावणेसुद्धा घोड्यासारखे भरधाव वेगात असते. त्याची आयुर्मऱ्यादा सु. २० वर्षे असते.
व्हाइट ऑरिक्स : (पांढरे हरिण). यास अरेबियन ऑरिक्स असेही म्हणतात. त्याचा आढळ सहारा वाळवंटी प्रदेश व उत्तर आफ्रिकेतील प्रदेशांत आहे. हे वाळवंटातील खरे हरिण असून ही जाती नष्ट होण्याच्या मार्गावरील जाती म्हणून घोषित केली आहे. त्याची खांद्याजवळ उंचीसु. १.५ मी. असून वजन ९८–२०० किग्रॅ. असते. शिंगे टोकाकडील बाजूस वक्र असून आकाराने जंबियासारखी असतात. त्याचे खूर मोठे व पसरलेले असून वाळवंटात चालण्यासाठी अनुकूल आहेत. तो कित्येक महिने पाण्याशिवाय राहू शकतो. त्याला काही किमी.पर्यंतचा पाण्याचासाठा असल्याचा सुगावा लागत असल्यामुळे वाळवंटात पाण्याचा शोध घेणे त्यास सोपे जाते.
(७) मळसूत्राकार शिंगांचे हरिण : यामध्ये ॲडॅक्स नासो-मॅक्यूलॅटस या जातीचा समावेश होतो. नर व मादी दोघांनाही शिंगेअसून ती नागमोडी आणि पिळवटलेली असतात. नराची खांद्याजवळउंची सु. १.०२ मी. असते. मादी नरापेक्षा लहान असते. शिंगे व पायांची ठेवण सोडून इतर शरीराची ठेवण काळविटासारखी असते. ही जाती व्हाइट ऑरिक्स जातीप्रमाणे कित्येक महिने पाण्याशिवाय राहू शकते.
(८) लांब (मोठ्या) चेहऱ्याची हरिणे : यामध्ये ॲल्सिलॅफिनी वर्गातील डॅमालिस्कस, काँगोनी हार्टबीस्ट व नू-प्रेटो (कॉनोकीटीस नोऊ) यांचा समावेश होतो. डॅमालिस्कस ॲल्बिफॉन्स ही जाती लहान वसुंदर असून तिची खांद्याजवळ उंची सु. १.०१ मी. असते. तिचा चेहरा लांबट व अरुंद असतो. नर-मादीमध्ये शिंगे असून ती लहान, जड आणि सारंगीच्या आकाराची असून त्यावर हिरवी चमक व पिवळी कडी असतात. शरीराचा रंग निळसर-तपकिरी असून पार्श्वभाग फिकट रंगाचा असतो. समागमानंतर ९-१० महिन्यांनी ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये मादीला पिलू होते.
(९) पिग्मी अँटिलोप : या लहान हरिणांचा समावेश निओट्रॅजिनी वर्गात होतो. यामध्ये रॉयल अँटिलोप, क्लिपस्प्रिंजर (ओरिओट्रॅगस ओरिओट्रॅगस), सुनी व ओरिबी स्टेनबॉक, डिक डिक, बेअर आणि ड्वार्फ अँटिलोप यांचा समावेश होतो.
रॉयल अँटिलोप : निओट्रॅगस या प्रजातीमध्ये यांचा समावेश होतो. जगामध्ये आजपर्यंत जिवंत असलेला हा सर्वांत लहान खूर असलेलाप्राणी आहे. त्याची खांद्याजवळ उंची सु. २५ सेंमी. असून शिंगेसु. २.५ सेंमी. लांब असतात. त्याचा रंग तांबूस-तपकिरी असतो. धोक्याची सूचना मिळताच ते मोठ्याने ओरडतात. ते उष्ण, ओलसर दमट भागांत तसेच पश्चिम आफ्रिकन किनाऱ्यावरील लायबीरियापासून नायजेरियापर्यंत जंगली प्रदेशांत राहतात.
ड्वार्फ अँटिलोप : हायलारनस प्रजातीतील ही छोटी पश्चिम आफ्रिकन जाती रॉयल अँटिलोपपेक्षा आकाराने मोठी असून हिच्याशी तिचे जवळचे संबंध आहेत. तिची शिंगे लहान व मऊ असतात. ती आफ्रिकेतील पश्चिमेकडील जंगलांत आढळते.
(१०) गॅझेल अँटिलोप : यामध्ये अँटिलोपिनी वर्गातील प्राण्यांचा समावेश होतो. ते आफ्रिका व आशिया येथील वाळवंटी भागांत आढळतात. ही हरिणे लहान असून यांमध्ये एण, इम्पाला, गोट गॅझेल, स्प्रिंबॉक यांचा समावेश होतो. [→कुरंग].
एण : याचे शास्त्रीय नाव अँटिलोप सर्व्हिकॅप्रा असे आहे. ते भारतीय हरिण म्हणूनही ओळखले जाते. शास्त्रीय नावानुसार हे खरे हरिण असून त्याला यूरोपियनांनी पहिल्यांदा हरिण हे नाव दिले.
नराची (काळविटाची) खांद्याजवळ उंची सु. ८१ सेंमी. असून वजनसु. ३८.५ किग्रॅ.पर्यंत असते. फक्त नरामध्ये शिंगे असून ती शक्यतो४०–५० सेंमी. लांब असतात परंतु काहींमध्ये जास्तीत जास्त लांबीसु. ७६ सेंमी.पर्यंत असते. त्याची शिंगे लांब, कडी असलेली, नागमोडी पिळवटलेली असून डोक्यावर इंग्रजी व्ही (त) आकारात असतात.नराचा रंग काळा किंवा काळसर-तपकिरी असून मादी (हरिणी) तांबूस–तपकिरी रंगाची असते. त्यांची दृष्टी (नजर) तीक्ष्ण असते. प्रजनन काळ फेब्रुवारी ते मार्चमध्ये असतो. समागमानंतर मादीला एक किंवा दोन पिले होतात. आयुर्मर्यादा सु. १५ वर्षे असते.
एण भारतीय मैदानावरील अतिशय वेगवान प्राणी आहे. त्याचा वेग ताशी ८० किमी. असतो. फक्त चित्ता त्यांचा वेग पार करू शकतो.तो कळपाने वावरतो. कळपामध्ये थोड्या संख्येपासून ते शेकडोपर्यंतसंख्या असते. तो भारतातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी असून हिमालयाच्या विस्तीर्ण मोकळ्या व गवताळ प्रदेशांत आणि पंजाबपासून आसामपर्यंतआढळतो. [→ एण].
जीवाश्म : हरिणे खूप प्रगत समखुरी प्राणी असून तुलनात्मकदृष्ट्या भूगर्भीय काळानुसार उशिरा उत्क्रांत झाली. त्यांचा उगम बैल,शेळी व मेंढी यांपासून झाला आहे. पहिल्यांदा ते यूरोपमध्ये दक्षिणे-कडील भागांत आढळले आणि नंतर ते पूर्व आशियातील आणि आफ्रिकेतील दक्षिण भागांत पसरले. मध्य मायोसीन काळातील (२ ते १.२ कोटी वर्षांपूर्वी) प्राचीन हरिणांचे जीवाश्म (उदा. प्रोट्रॅगोसेरस व मायोट्रॅगोसेरस) फ्रान्समध्ये आढळले. प्लायोसीन काळात (१.२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वी) नागमोडी व पिळवटलेली शिंगे असलेली मोठीहरिणे दक्षिण यूरोपमध्ये सामान्य होती. त्या काळातील त्यांचे जीवाश्म आशिया व आफ्रिका येथील खडकांत आढळल्याची नोंद आहे. प्लाइस्टोसीन काळात (६ लाख ते ११,००० वर्षांपूर्वी) यूरोप, आशिया व आफ्रिकेत सगळीकडे त्यांचा आढळ सामान्य होता.
संदर्भ : 1. Macdonald, D. The Encyclopaedia of Mammals, Oxford, 2001.
2. Nowak, R. M. Walker’s Mammals of the World, 6th Ed. Baltimore, 1999.
मगर, सुरेखा अ.
“