हयगय : (नेग्लिजन्स). कर्तव्यातील कुचराई-निष्काळजीपणा. असंयुक्तिक वा अकल्पित धोक्यांविरुद्ध समाजाचे संरक्षण करण्याकरिता जे प्रमाणित (स्टँडर्ड) वर्तन अपेक्षित असते, त्याची पूर्तता करण्यातील अपयश म्हणजेच हयगय होय. हयगय हा अपकृत्य दायित्वाचा (टॉर्ट लाइबिलिटी) पाया असून वैयक्तिक हानी व सांपत्तिक नुकसान यांविषयीच्या दाव्यांतील प्रमुख घटक होय.

मानवी जीवनात अनेक जबाबदाऱ्या व कर्तव्ये असतात. त्या जबाब-दाऱ्या व्यवस्थित, लक्षपूर्वक व काळजीपूर्वक पार पाडाव्या लागतात. त्यांमध्ये हेळसांड करून चालत नाही. समाजात निरनिराळे व्यवसाय करणारे अनेक लोक असतात. उदा., डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कार- खानदार, अभियंता, कंत्राटदार, वाहनचालक, वाहतूकदार इत्यादी. त्यांची कामे व कर्तव्ये ठरलेली असतात. ते फी, भाडे, मेहनताना वगैरे घेतात. त्यांनी काळजीपूर्वक व कर्तव्यदक्षतेनेच सेवा द्यावयास हवी. त्यामध्ये निष्काळजीपणा किंवा हयगय होता कामा नये. व्यवस्थित काम करणे, ही त्यांची नैतिक जबाबदारी असते परंतु काही व्यक्ती त्यांनी स्वीकार- लेले काम वा सेवा काळजीपूर्वक करीत नाहीत. म्हणून व्यवहारात वागताना, काम करताना त्यांच्या हातून किरकोळ किंवा गंभीर चुका होतात. त्यांचे भयंकर परिणाम त्यांना स्वतःला व समाजाला भोगावे लागतात. त्यामुळे अनेकांचे जीवही जातात. उदा., डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करताना हयगय केल्यास रुग्णाच्या जिवावर बेतते. बसचालकाने निष्काळजीपणा केल्यास अपघातात अनेक लोकांचे जीव जातात व काही लोकांना गंभीर इजाही होते. तसेच वकिलांनी पक्षकाराचे काम स्वीकारलेले असते परंतु यात हयगय केल्यामुळे, कोर्टात दाव्याला हजर न राहिल्यास दाव्याचा निकाल एकतर्फी होऊन पक्षकाराचे नुकसान होते. कंत्राटदार अथवा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगाराने काम करताना दुर्लक्ष केल्यास घराचे अगर मोठ्या पुलाचे काम निकृष्ट होते. त्यात पडझड होऊन जीवितहानीसुद्धा होऊ शकते. थोडक्यात, कामचुकारपणा व निष्काळजीपणा यांमुळे समाजाचे व परिणामतः कुटुंबाचे, व्यक्तीचे फार मोठे नुकसान होते. तसेच जीवित व वित्तहानी होते.

हयगय ही एक प्रकारची विकृती आहे. या विकृतीची कारणे अनेक असू शकतात. समाजात वर्तनासंबंधी, कर्तव्यासंबंधी काही प्रमाणभूत आदर्श अधोरेखित केलेले असतात. व्यवहारदृष्टी असलेला माणूस जे कर्तव्य करतो, त्यानुसार त्याची वर्तणूक योग्य का अयोग्य ठरविले जाते. म्हणजेच सर्वसामान्य माणूस ज्या कर्तव्याने काळजीपूर्वक, लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक काम करेल, ते काम योग्य धरले जाते.

हयगय केल्यास नुकसानभरपाई द्यावी लागते. कायद्यात दायित्व हा शब्द नुकसानभरपाईसंबंधी दिला आहे कारण हे दिवाणी अपकृत्य असून त्याबद्दल नुकसानभरपाई द्यावी लागते. गैरकृत्य किंवा गैरकृती, दोषपूर्ण कृती जर घडली, तर त्याबद्दल नुकसानभरपाईचा दिवाणी दावा लावता येतो. तसेच निष्काळजीपणा केला किंवा गैरकृत्य केले म्हणजेच हयगय केली, तर तो फौजदारी गुन्हा ठरतो. उदा., ‘मुंबई मोटार व्हीइकल ॲक्ट’ प्रमाणे दावे दाखल होतात व हलगर्जीपणाबद्दल नुकसानभरपाई द्यावी लागते. चारचाकी-दुचाकी वाहने निष्काळजीपणाने चालविल्यास जीवित व वित्तहानी होते आणि त्याबद्दल नुकसानभरपाई द्यावी लागते.

नोकराने योग्य त्या रीतीने एखादी गोष्ट पार न पाडल्यास ती गोष्टही हयगयमध्ये मोडते. जाणीवपूर्वक योग्य ती काळजी न घेता काम करणे म्हणजे हयगय. उदा., रेल्वे, विमान अपघात यांतही हयगय होऊन अनेक दुर्घटना घडतात.

गुजर, के. के.