हमी : (गॅरन्टी). एखादी गोष्ट किंवा करारातील भाग निश्चित पूर्ण होईल यासाठी दिलेले आश्वासन वा वचन. दोन व्यक्ती किंवा संस्था ज्या वेळी एखादा करार करतात, त्या वेळी त्यांतील एक व्यक्ती अगर संस्था करारातील तिचा भाग पूर्ण करील, याचे तिसऱ्या व्यक्तीने किंवा संस्थेने दिलेले आश्वासन, असे हमीचे सर्वसाधारण स्वरूप असते. हमी हासुद्धा एक करार असल्याने तो बंधनकारक असतो. उदा., ‘अ’ ने बँकेकडून कर्ज घेतले व ते त्याने फेडले नाही, तर त्याच्या हमीदाराकडून म्हणजेच जामीनदाराकडून ते कर्ज बँक वसूल करू शकते. कर्जदाराने कर्ज फेडण्याचे कबूल केलेले असते. त्याने त्याचे वचन पाळले नाही, तर हमीदार ते कर्ज फेडील, अशी ती हमी असते.
हमीची गरज विविध कारणांसाठी पडते. बँक अगर पतपेढी यांनी दिलेल्या कर्जाची वसुली निश्चित व्हावी म्हणून त्यांना हमीदार किंवा जामीनदार हवा असतो. काही वेळा एखाद्या संस्थेने कर्ज घेतले, तर त्या संस्थेची हमी दुसरी एखादी संस्था घेते. उदा., विणकरांच्या सहकारी संस्थेने एखाद्या विकास संस्थेकडून कर्ज घेतले, तर त्या कर्जाच्या परतफेडीची हमी जिल्हा सहकारी बँक देऊ शकते.
काही वेळा करार करणारी व्यक्तीच आपण आपले वचन किंवा करारातील आपला भाग पूर्ण करू, अशी हमी देते. उदा., विशिष्ट काल-मऱ्यादेत एखादा रस्ता किंवा धरण आपण पूर्ण बांधू , असे करारात म्हटलेले असते. जर तो रस्ता, धरण अथवा तत्सम काम कंत्राटदाराने ठरलेल्या मुदतीत पूर्ण केले नाही, तर त्याने दंड म्हणून किंवा भरपाई म्हणून विशिष्ट रक्कम द्यावी, असे कलम करारात असते. ते कलमसुद्धा हमीच समजली जाते.
हमीचा आणखी एक प्रकार म्हणजे उत्पादक जेव्हा एखादी वस्तू तयार करून बाजारात विक्री करतात, त्या वेळेला ती वस्तू ठराविक मुदतीपर्यंत टिकून राहील, त्यात कोणताही दोष राहिलेला नाही, असे आश्वासन खरेदीदाराला देतात. अशी वस्तू – उदा., मोटार, टीव्ही, पाण्याचा पंप – जर हमीच्या काळात बिघडली, तर ती वस्तू दुरुस्त करण्याचे आश्वासन (वॉरंटी) किंवा जबाबदारी उत्पादक किंवा विक्रेत्याची असते. जर ती वस्तू दुरुस्त होऊ शकत नसेल, तर दुसरी वस्तू ग्राहकाला विनामूल्य द्यावी लागते. याला वस्तुनिर्मात्याची हमी असे म्हणता येईल.
भारतीय कराराचा कायदा (१८७२) यातील आठव्या प्रकरणात हमीसंबंधीच्या तरतुदी आहेत. हमीच्या नुकसानभरपाईचे आश्वासन देणारा करार वा क्षतिपूर्ती करार (इन्डेम्निटी), असेही तिचे स्वरूप असते. उदा., बँकेने दिलेले मूळ ठेवपत्र हरवले किंवा मूळ मालक मृत झाला, तर वारस म्हणविणाऱ्याला ठेवीची किंवा खात्यातील रक्कम देण्यासाठी त्याच्याकडून एक हमीपत्र घेण्यात येते, त्याला क्षतिपूर्ती बंधपत्र (इन्डेम्निटी बाँड) म्हणतात. तिसऱ्या व्यक्तीने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, तर ते मी करीन असे आश्वासन देणारा करार म्हणजे ‘हमीचा करार’ अशी व्याख्या कलम १२६ मध्ये दिलेली आहे.
चपळगावकर, नरेंद्र