स्ट्रोफँथस हिस्पिडस : ( इं. पॉयझन ॲरो व्हाइन, ब्राउन स्ट्रोफँथस, हेअरी स्ट्रोफँथस, कुल-ॲपोसायनेसी ). ही बहुवर्षायू व काष्ठ-युक्त वेल मूळची उत्तर आफ्रिकेतील असून तिचा आढळ पूर्व सेनेगल,मध्य आफ्रिका, काँगो, युगांडा, पश्चिम टांझानिया आणि उत्तर अँगोला या भागांत आहे. सस.पासून सु. १,६०० मी. उंचीपर्यंत ती आढळते. स्ट्रोफँथस हे नाव ग्रीक स्ट्रोफोज ( पीळदार दोरी किंवा रोप ) आणि अँथोस ( फूल ) यांपासून तयार झाले आहे यावरून त्याच्या दृश्य रूपाचे प्रमुख वैशिष्ट्य लक्षात येते. पुष्पमुकुटाचे बाहू पाच, लांब व शेपटीसारख्या भागात विभागलेले असतात. फुले द्विलिंगी, घंटेसारख्या आकाराची, पिवळसर पांढरी व तळाशी पिवळ्या रंगाची असून त्यावर जांभळ्या रंगाचे ठिपके असतात. फळाचे दोन पेटिकासम फलांश परस्परापासून दुरावलेले असतात. बिया अंडाकृती, चपट्या, विशालकोनी किनार्याच्या, ७—२० मिमी. लांब व सु. २ मिमी. रुंद असतात. त्या पिवळसर तपकिरी रंगाच्या असून किंचित हिरव्या रंगाची झाक असते. बाह्य आवरणावर दाट लव असते. पृष्ठभाग पांढरटसर व तेलकट असतो. बिया कुस्करल्यावर आणि आर्द्र केल्यावर तीव्र वास येतो चवीने त्या कडू असतात. पाने समोरासमोर, गर्द हिरवी व चकचकीत असतात. इतर शारीरिक लक्षणे ⇨ ॲपोसायनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. स्ट्रो. हिस्पिडस ही वनस्पती एकट्याने झुडपाच्या आकारात वाढते, मात्र जंगलांत ती वेल म्हणूनच आढळून येते. तेथे ती वृक्षाला वेटोळे घालत सर्वोच्च टोकापर्यंत वाढते. तसेच वृक्षांच्या फांद्यांवरून ती दुसर्या वृक्षांपर्यंत देखील पसरते. तिचे खोड साधारण ६ सेंमी. व्यासाचे असते.
स्ट्रोफँथस प्रजातीत सु. ३८ जाती आढळतात. स्ट्रो. हिस्पिडस या जातीशी अगदी जवळचे साम्य असलेली जाती स्ट्रो. कोम्बे होय. या वनस्पतीची लागवड बियांपासून किंवा मूलयुक्त शाखांचा वापर करून करता येते. जर्मनीमध्ये स्ट्रो. हिस्पिडस हिच्या बियांचा वापर मुख्यतः लागवडीसाठी केला जातो, कारण त्यांची शुद्धता सहज रीत्या तपासता येते. उत्तर टोगोच्या प्रदेशात एक मी. लांबीची फांदी जमिनीत नुसतीच गाडली तरी वनस्पतीची वाढ होते. कोवळ्या वनस्पतीला काळजीपूर्वक पाणी द्यावे लागते. तसेच तिचे कीटक व इतर प्राण्यांपासून संरक्षण करावे लागते.
नियमितपणे छाटणी केल्यास छाट कलमांद्वारे पावसाळ्यात लागवड केलेल्या वनस्पती काही वर्षांतच जाड झुडूप वा लहान वृक्षांसारख्या वाढतात आणि जंगली वनस्पतींपेक्षा अधिक प्रमाणात फळांचे उत्पादन करतात. उत्तर आफ्रिकेत फुले फेब्रुवारी — एप्रिल या काळात ( क्वचित जुलैमध्ये ) येतात आणि फळे जानेवारी — जुलै या काळात धरतात. कोरड्या व पावसाळी भागात फुले कोरड्या ऋतूच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात. फळे कोरड्या ऋतूत पक्व होतात.
स्ट्रो. हिस्पिडस वनस्पतीच्या पक्व बियांपासून ग्लुकोसाइडे वेगळी काढली जातात. त्यांना एकत्रित रीत्या ‘ स्ट्रोफँथिने ’ म्हणतात. त्यांचा वापर दीर्घकालिक हृदयाच्या विकारासाठी तसेच रक्ताभिसरणासाठीच्या औषधांत केला जातो. तसेच ते मूत्रल ( लघवी साफ करणारे ) देखील असते. या वनस्पतीपासून काढलेल्या ब्राऊन स्ट्रोफँथस या विषारी द्रव्याचा वापर स्थानिक शिकारी बाणांच्या टोकास लावण्यासाठी करतात. तिचा शोभेसाठी देखील वापर होतो.
भारतात स्ट्रो. डायकॉटोमस व स्ट्रो. वायटिएनस या जाती रानटी अवस्थेत आढळतात.
जमदाडे, ज. वि.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..