स्टीव्हेन्सन ( स्टीफन्सन ), जॉर्ज : (९ जून १७८१—१२ ऑगस्ट १८४८). इंग्रज संशोधक व आगगाडीच्या शोधाचे जनक. स्टीव्हेन्सन यांचा जन्म इंग्लंडमधील न्यूकॅसलजवळ वायलॉम येथे झाला. वडिलांच्या हाताखाली दुय्यम फायरमन म्हणून काम करीत असताना फावल्या वेळी ते घड्याळे दुरुस्त करीत. १८०२ मध्ये विलिंग्टन बॅलॅस्टहिल येथे ते एंजिन चालविण्याचे काम करीत. ते १८०६ मध्ये मॉन्ट्रोज येथे बोल्टन अँड वॉट या वाफेवर चालणार्या एंजिनाची देखभाल करू लागले. त्यानंतर ते किलिंगवर्थ येथे एंजिन चालविण्याचे काम करू लागले (१८०८).
किलिंगवर्थ येथील खाणीवर चालणार्या ‘ न्यूकोमेन ’ एंजिनातील दोष काढून त्यात त्यांनी काही सुधारणा केल्या (१८११). किलिंगवर्थ येथील हायपिट खाणीत वर्षाला १०० पौंड पगारावर एंजिन यंत्रज्ञ म्हणून नोकरीला राहिले (१८१२). तेथे काम करीत असताना त्यांनी जेम्स वॉट यांच्या वाफेच्या एंजिनाचा बारकाईने अभ्यास केला. लोक त्यांना ‘ एंजिनाचा डॉक्टर ’ म्हणू लागले. आपल्या अनुभवाच्या बळावर व आर्थिक पाठिंब्यावर त्यांनी १८१४ मध्ये दोन संचलनी एंजिने बनविली. पहिल्या एंजिनाचे नाव ‘ मायलॉड ’ व दुसर्याचे ‘ पफिंग बिल्ली ’ ठेवले. दुसर्या एंजिनात त्यांनी बाष्पित्रातील [ ⟶ बाष्पित्र ] हवेचा झोत वाढविण्यासाठी वाफेचा झोत सोडण्याची युक्ती वापरली. त्यात त्यांना यश येऊन १८१५ मध्ये त्यांनी शोधाचे एकस्व (पेटंट) मिळविले. पहिले एंजिन त्यांनी खाणीजवळच्या ट्राममार्गावर सु. १४.४ किमी. लांब असलेल्या बंदरापर्यंत यशस्वीपणे चालवून दाखविले. या संचलनी एंजिनाला जोडलेल्या डब्यातून मालांची व माणसांची वाहतूक होऊ लागली. त्यांनी १८१५ मध्ये सर हंफ्री डेव्ही यांच्या सहकार्याने खाणीत हातात वापरावयाच्या सुरक्षा दिव्याचा, तसेच कोळ्यांनी समुद्रावर हातात वापरावयाच्या दिव्याचा व गजराच्या घड्याळाचाही शोध लावला. यामुळे ते थोर संशोधक म्हणून ओळखले जाऊ लागले.
खाणीत वापरावयाच्या दिव्याच्या शोधाबद्दल त्यांना १०० पौंडांची थैली मिळाली. या पैशातून त्यांनी १८२३ मध्ये न्यूकॅसेल येथे एडवर्ड पीज व टॉमस रिचर्ड्सन ( त्यांचा दूरचा भाऊ ) याच्या भागीदारीत संचलनी एंजिने बनविण्याचा कारखाना सुरू केला. परंतु, १८२१ पासूनच स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वे कंपनीने त्यांची रेल्वे अभियंता म्हणून नेमणूक केली. या कंपनीची पहिली संचलनी एंजिनाची ३० टन वजनाची आगगाडी ताशी सु. २५६ किमी. वेगाने २७ सप्टेंबर १८२५ पासून मालाची व माणसांची वाहतूक लोहमार्गावरून करू लागली. १८२६ मध्ये लिव्हरपूल ते मँचेस्टरपर्यंत लोहमार्ग टाकण्यासाठी मुख्य रेल्वे अभियंता म्हणून स्टीव्हेन्सन यांची नेमणूक करण्यात आली. १८२९ पर्यंत त्यांनी हे काम पूर्ण केले आणि त्यावर स्वतःच्या कारखान्यात तयार केलेले ‘ रॉकेट ’ हे संचलनी एंजिन जोडलेली आगगाडी ताशी सु. ४५ किमी. वेगाने १९ सप्टेंबर १८३० पासून धावू लागली. त्यांच्या ‘ रॉकेट ’ एंजिनाने संचलनी एंजिनासाठी ठेवलेली स्पर्धा जिंकून ५०० पौंडांचे बक्षीस पटकाविले. ‘ रॉकेट ’ एंजिनाच्या घडणीत त्यांच्या मुलाने प्रत्यक्ष भाग घेतला होता. त्यांनी या एंजिनाच्या रचनेत वाफेचा झोत सोडणारे प्रोथ धुराड्याला बसविले तसेच सिलिंडरात सुधारणा करून बाष्पित्राचे तापनपृष्ठ वाढविले व भट्टीतील झोत वाढवून बहुनलिका बाष्पित्र बनविले. यामुळे रॉकेट या एंजिनाने ५३ मिनिटांत सु. १९ किमी.चे अंतर पार केले.
स्टीव्हेन्सन यांनी लावलेल्या शोधांपासून मिळालेले पैसे व कारखान्यात झालेला नफा यांचा विनियोग मानवतावादी दृष्टिकोनामुळे खाणकामगारांसाठी रात्रीच्या शाळा, ग्रंथालये, संगीत शाळा व विश्रांती स्थाने चालविण्यासाठी केला. १८३० नंतर त्यांनी इंग्लंडमध्ये सर्वत्र रेल्वेमार्ग टाकण्यासाठी साहाय्य केले. लोहमार्गाची आखणी करताना डोंगरातून बोगदे काढणे व खड्ड्यात भराव घालणे या मार्गाचा त्यांनी अवलंब केला. बिडाच्या रुळांऐवजी वर्धनशील पोलादी रुळांचा त्यांनी पुरस्कार केला. स्पेन व बेल्जियम देशांनाही त्यांनी रेल्वेबांधणीत मदत केली. या त्यांच्या कामाबद्दल बेल्जियमच्या राजाने १८३५ मध्ये त्यांना ‘ ऑर्डर ऑफ लिओपोल्ड ’ हा किताब बहाल केला. मात्र, इंग्लंडकडून मानसन्मान स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी यांत्रिक अभियंत्यांची एक संस्था स्थापन केली. त्या ठिकाणी निरनिराळ्या अभियांत्रिकी समस्या सोडविण्यात येऊ लागल्या. ते या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
स्टीव्हेन्सन यांचे टॅपहाऊस, चेस्टरफील डर्बिशर ( इंग्लंड ) येथे निधन झाले.
कानिटकर, बा. मो.; दीक्षित, चं. ग.