स्क्वॉश : रॅकेट व चेंडू यांच्या साहाय्याने खेळावयाचा एक खेळ. या खेळात वापरल्या जाणार्या रॅकेटवरून यास ‘स्क्वॉश रॅकेट’ असेही म्हणतात. १८३० मध्ये लंडन येथील हॅरो स्कूलमध्ये या खेळाचा उगम झाला. स्क्वॉश हा त्याच्या वेगासाठी विशेष प्रसिद्ध आहे. याच्या खेळासाठी लागणारे क्रीडाक्षेत्र चहुबाजूंनी बंदिस्त असते. स्क्वॉशचा चेंडू हा रबराचा, आतून पोकळ आणि काळ्या रंगाचा असतो. त्याचा व्यास ४ सेंमी. असतो आणि तो २३—२८ ग्रॅम एवढ्या वजनाचा असतो. चेंडूवर जे रंगीत ठिपके असतात, ते त्या चेंडूच्या चलनशीलतेची पातळी किंवा उसळी घेण्याची क्षमता दर्शवितात. उदा., दोन पिवळे ठिपके असणारा चेंडू हा अतिशय कमी उसळी घेणारा असतो, तर एकच निळ्या रंगाचा ठिपका असणारा चेंडू सर्वांत जास्त उसळी घेणारा असतो. तो विशिष्ट प्रकारे बनविलेला असून, तो सहजपणे दाबला जाऊ शकतो. भिंतीवर आदळल्यानंतर या चेंडूचा एक विशिष्ट प्रकारचा— स्क्वाशी— आवाज होतो. स्क्वॉशच्या रॅकेटची लांबी सर्वसाधारणपणे ६८ सेंमी. इतकी असून तिचे वजन २८० ग्रॅम इतके असते. स्क्वॉशचे क्रीडांगण ९.६० मी. लांब व ५.५५ मी. रुंद असते. भिंतीची उंची ४.८० मी. इतकी असते. पुढील भिंतीच्या तळाशी ३.५० सेंमी. इतक्या जाडीचे टेलटेट असते. ते जमिनीपासून ४३ सेंमी. इतके उंच असते. समोरील भिंतीवर जमिनीपासून १.९५ मी. इतक्या उंचीवर आरंभखेळी रेषा ( सर्व्हिस लाइन ) आखलेली असते. मागच्या भिंतीपासून ३ मी.अंतरावर तळ रेषा ( फ्लोअर लाइन ) आखलेली असते. या तळ रेषेच्या मध्यापासून सरळ मागच्या भिंतीपर्यंत एक मध्य रेषा आखलेली असते.त्या मध्य रेषेच्या योगाने मागच्या भिंतीच्या पुढील भागाचे दोन चौकोनाकृती भाग तयार होतात. या चौकोनाच्या भिंतीलगतच्या पुढील कोपर्यांत वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आखलेला असतो. त्यास आरंभखेळी चौकट ( सर्व्हिस बॉक्स ) असे म्हणतात. त्याची त्रिज्या १.३५ मी. इतकी असते.
स्क्वॉश हा खेळ सुरू करण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अडीच मिनिटे ‘वॉर्मअप’ ( शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी लागणारा व्यायाम ) दिला जातो. या खेळात सर्वप्रथम कोणत्या खेळाडूने आरंभखेळी ( सर्व्हिस ) करावयाची ते रॅकेटच्या साहाय्याने ओली-सुकी करून होते. रॅकेटला जमिनीवर ठेवून तिला गती दिली जाते आणि ज्या दिशेने रॅकेटच्या दांड्याचे टोक असेल, त्या खेळाडूला सर्वप्रथम संधी देण्यात येते. आरंभखेळी करणारा खेळाडू त्याच्या इच्छेप्रमाणे डाव्या किंवा उजव्या खेळीच्या चौकटीतून खेळास सुरुवात करतो. आरंभखेळी करताना खेळाडूला त्याचा एकतरी पाय चौकटीत ठेवणे आवश्यक असते. त्याने तो चेंडू समोरच्या भिंतीवर मारावयाचा असतो. तो आरंभरेषेच्या वर लागावा लागतो आणि तेथून उसळी घेऊन आलेला तो चेंडू प्रतिस्पर्ध्याने टोलवायचा असतो. त्याच्याकडून तो टोलवला गेल्यावर मूळ खेळाडूलातो परत टोलवावा लागतो. चेंडू परतविण्यात खेळाडूंना अपयश येईपर्यंत ही खेळी चालते. प्रतिस्पर्धी खेळाडू चेंडू टोलवण्यात अयशस्वी झाल्यास त्याच्यावर पहिल्याचा एक गुण ( पॉइंट ) लागू झाला असे मानले जाते.
हा खेळ केवळ ताकदीचाच नव्हे, तर तो युक्तीचाही आहे. ⇨ बॅडमिंटन, ⇨ टेनिस या खेळांप्रमाणेच हा खेळ एकेरी वा दुहेरी स्वरूपाचा असतो. या खेळामध्ये जेव्हा दोनच प्रतिस्पर्धी भाग घेतात, तेव्हा त्यास ‘ एकेरी ’ ( सिंगल्स् ) स्पर्धा असे म्हणतात. एकेरी स्पर्धेमध्ये दोन्हीही खेळाडू ९ गुणांचा एक डाव ( गेम ), असे तीन किंवा पाच डाव खेळतात. त्यांत सर्वाधिक डाव जिंकणारा विजयी म्हणून घोषित होतो. साधारणतः दोन खेळाडूंमध्येच हा खेळ जास्त खेळला जातो. चार खेळाडूंसाठी लागणार्या क्रीडांगणाचा आकार मोठा असतो.
गोखले, अरविंद व्यं.
“