सोहिरोबा आंबिये : (१७१४-१७९२). नाथसंप्रदायी संतकवी. सोहिरा व सोहिरोबानाथ या नावांनीही ते ओळखले जातात. गोमंतकातील पालिये हे ह्यांचे मूळ गाव. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचे वडील तत्कालीन सावंतवाडी संस्थानातील बांदे ह्या गावी स्थायिक झाले होते. तेथेच सोहिरोबांचा जन्म झाला. सावंतवाडी संस्थानातील काही गावांचे कुलकर्णीपण त्यांनी काही वर्षे केले पण परमार्थाकडे त्यांचा पहिल्यापासूनच ओढा होता. त्यातच सावंतवाडीच्या राजेसाहेबांना भेटण्यासाठी ते निघाले असता, एका तेजस्वी सिद्ध पुरुषाशी त्यांची भेट झाली. ह्या सिद्ध पुरुषाने सोहिरोबांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना मंत्र दिला. तसेच त्यांना समाधीचाही अनुभव दिला. सोहिरोबांना गुरूपदेश देणारा हा सिद्धपुरुष कोण हे निश्चितपणे सांगता येत नाही. सोहिरोबांनीही आपल्या गुरुपरंपरेचा कोठेच निर्देश केलेला नाही तथापि त्यांच्या पदांतून आढळणाऱ्या काही उल्लेखांवरून त्यांच्या या गुरूंचे नाव गैबीनाथ असावे, असा एक तर्क आहे. ह्या सिद्धपुरुषाच्या भेटीनंतर सोहिरोबांनी राजसेवेतून स्वतःला मुक्त करून घेतले आणि आपले उर्वरित आयुष्य ईश्वरभक्तीसाठी वेचले. सु. १७७४ मध्ये ते उत्तर भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रे पाहण्यासाठी निघाले. ग्वाल्हेरला त्यांचा बरीच वर्षे मुक्काम झाला. पुढे उज्जैन येथेही ते राहिले. तेथे त्यांचे बरेच शिष्य होते आणि एक मठही होता परंतु तेथून ते एक दिवस सर्वांच्या नकळत बाहेर पडले, ते पुन्हा परत आले नाहीत.
सोहिरोबांचे ग्रंथ असे : सिद्धान्तसंहिता, अक्षयबोध, अद्वयानंद, पूर्णाक्षरी, महदनुभवेश्वरी आणि चित्सुखानंद. ह्यांपैकी चित्सुखानंद हा ग्रंथ मुद्रित झालेला नाही.
स्वतः अनुभवलेल्या संवित्-ज्ञानाचा सिद्धान्त सिद्धान्तसंहितेत सांगताना स्वतः रचलेल्या संस्कृत श्लोकात मूळ विचार सांगून त्याच्यावरील स्वतःची टीका मराठीत करावयाची अशी पद्धती सोहिरोबा यांनी अवलंबिलेली आहे. मराठीत अशा प्रकारची पद्धती दुर्मिळ आहे. संस्कृतातील बहुतेक रचना अनुष्टुभ छंदात असून अधूनमधून उपजाती किंवा इंद्रवज्रा ह्यांसारखी वृत्ते योजिलेली आहेत. ह्या ग्रंथातील मराठी रचना मात्र ओवीबद्ध आहे. ह्यातील संस्कृत श्लोक ७२९ आणि मराठी ओव्या ४,९१७ आहेत. या ग्रंथाचे एकूण अध्याय १८ आहेत. अक्षयबोध (आठ प्रकरणे ओव्या ४०८), अद्वयानंद (रचनाकाल १७४९, आठ प्रकरणे ओव्या ५५४), पूर्णाक्षरी (नऊ प्रकरणे ओव्या ४८९) हे तीन ग्रंथ वेदान्तविषयक आहेत. महदनुभवेश्वरी (रचनाकाल १७५०) हा अठरा अध्यायांचा ग्रंथही (ओव्या ९,०९३) वेदान्तपर असून तो गुरुशिष्यसंवादात्मक आहे. ह्या ग्रंथात सोहिरोबा उपमा-दृष्टांताचा प्रभावीपणे उपयोग करतात. सोहिरोबांवर ज्ञानेश्वरांच्या शैलीचा प्रभाव होता. तो सिद्धान्तसंहितेत तसाच महदनुभवेश्वरीतही दिसून येतो. ह्या ग्रंथांखेरीज सोहिरोबांची बखर ह्या नावाने ओळखला जाणारा त्यांचा आणखी एक ग्रंथ आहे. तत्त्वज्ञानपर बखर म्हणून मराठी बखरसाहित्यात तिला स्वतंत्र स्थान द्यावे लागेल. त्यात एका किल्ल्याच्या रूपकातून देहाच्या रचनेवर केलेली गद्यरचना आहे. सच्चिदानंद परमात्मा हा ह्या देहरूपी किल्ल्याचा धनी आणि हा ग्रंथ म्हणजे त्याला धाडलेला खलिता.
सोहिरोबांनी पदरचनाही विपुल केली होती. श्लोक, अभंग, आरत्या, कटिबंध, सवाया ह्यांचा त्यांत अंतर्भाव होतो. विविध रागांत गाता येतील अशी त्यांची पदे आहेत.
तात्त्विक विषयांवर काव्यरचना केल्यामुळे सोहिरोबांच्या मराठीत संस्कृतप्राचुर्य लक्षणीयपणे आलेले आहे. मात्र त्यांच्या शैलीत कुठेही क्लिष्टपणा आलेला दिसत नाही. त्यांचे बरेचसे आयुष्य कोकणात गेल्यामुळे त्यांच्या रचनांतून कोकणात प्रचलित असलेले शब्दही आढळतात. त्यांच्या दृष्टांतातही समुद्रविषयक दृष्टांत लक्ष वेधून घेतात. सोहिरोबा हठयोगी होते, असे म्हणतात. हठयोगाविषयीचे त्यांचे प्रेम विशेषतः महदनुभवेश्वरीसारख्या ग्रंथात दिसून येते. त्यांच्या तात्त्विक ग्रंथांतून तत्त्वज्ञानाचा त्यांचा सखोल व्यासंगही प्रत्ययास येतो पण व्यवहारातील दृष्टांतांच्या आणि आपल्या काव्यशैलीच्या योगे ते गहन, तात्त्विक विषयांचे विवेचनही सहजसोपे आणि विलोभनीय करतात.
संदर्भ : १. खानोलकर, गं. दे. संपा. मराठी वाङ्मयकोश, खंड पहिला, मुंबई, १९७७.
२. जोग, रा. श्री. संपा. मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड तिसरा, पुणे, १९७३.
३. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, खंड पहिला, मुंबई, १९८२.
४. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत (आवृ. सहावी), खंड २, पुरवणी, तुळपुळे, शं. गो. मुंबई, १९८३.
कुलकर्णी, अ. र.