स्वस्तिक – १ : ( क्रस ). दक्षिण खगोलार्धातील सर्वांत लहान; परंतु महत्त्वाचा असलेला हा तारकासमूह आकाशगंगेत असून होरा १२ तास ३० मिनिटे व क्रांती -६०° याच्या आसपास दिसतो [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति ]. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा तारकासमूह रात्री नऊच्या सुमारास दक्षिण क्षितिजावर याम्योत्तर वृत्तावर ( खगोलाचे दोन्ही ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक — निरीक्षकाच्या थेट डोयावरचा बिंदू — यांमधून जाणार्‍या मोठ्या वर्तुळावर ) दिसतो. यातील आल्फा ( सर्वात खालचा ), बीटा ( डावीकडचा ), गॅमा ( वरचा ) व डेल्टा ( उजवीकडचा ) या तार्‍यांचा आकार पतंगासारखा किंवा क्रॉससारखा ( क्रुसासारखा ) भासतो, म्हणून याला सदर्न क्रॉस असेही व्यावहारिक नाव आहे. यांशिवाय डेल्टाक्रूसिस ( क्रस ) या तार्‍याच्या खाली एप्सायलॉन हा यातील लहान तारा, बीटा तार्‍याजवळ शंभर तारे असलेला एन. जी. सी. ४७५५ हा सुंदर तारकागुच्छ व कोलसॅक ( तारे नसलेले कृष्णवर्णी क्षेत्र ) हे सर्व खस्थ पदार्थही यात आहेत. यातील गॅमा व आल्फा तारे यांना सांधणारी रेषा साधारणपणे खगोलीय दक्षिण ध्रुवातून जाते. मित्र व मित्रक ( आल्फा व बीटा सेंटॉरी ) ही तार्‍यांची जोडी स्वस्तिक तारकासमूहाच्या डाव्या बाजूस दिसते.

प्राचीन काळापासून हा तारकासमूह माहीत असला, तरी याला क्रस हे नाव १६७९ मध्ये ऑगस्टाइन रोयर यांनी दिले. याला त्रिशंकू हेही नाव आहे. हा तारकासमूह ३० अक्षांशाच्या उत्तरेकडील भागातून दिसत नाही. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांच्या राष्ट्रध्वजांवर हा तारकासमूह चितारला आहे.

ठाकूर, अ. ना.