स्वयंभू : ( आठवे शतक ). अपभ्रंश भाषेतील पउमचरिउ या महाकाव्याचा कर्ता. त्याचा जन्म कुठे व केव्हा झाला, यांबद्दल निश्चित माहिती मिळत नाही तथापि हरिवल्लभ भायाणी यांच्या मते, तो मूळ विदर्भातील असावा. देवेंद्रकुमार जैन त्याला कर्नाटकचा रहिवासी मानतात. पउमचरिउच्या प्रस्तावनेत व उपसंहारात आलेल्या हकीकतीवरून त्याच्या पित्याचे नाव मारुतदेव व आईचे पद्मिनी होते. त्याला आईच्चांबा ( आदित्यांबा ) व आमिअव्वा ( अमृतांबा? ) अशा दोन स्त्रिया होत्या. पउमचरिउच्या अयोध्या व विद्याधर या कांडांत त्यांचा निर्देश आहे. या दोघी त्याला त्याच्या साहित्यकार्यात मदत करीत असत. त्याचा पुत्र त्रिभुवन स्वयंभू हाही कवी होता. स्वयंभू हा छंदःशास्त्र, अलंकारशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीत, व्याकरण या क्षेत्रांतला तज्ज्ञ होता, असे दिसते. त्याचे तीन ग्रंथ आज उपलब्ध आहेत : (१) पउमचरिउ ( पद्मचरित ), (२) रिट्ठणेमिचरिउ ( अरिष्टनेमिचरित अथवा हरिवंशपुराण ) व (३) स्वयंभूछंद.

पउमचरिउ हे रामाचे चरित्र आहे तथापि ते जैनमतानुकूल प्रसंग घालून लिहिलेले आहे. (१) विद्याधर, (२) अयोध्या, (३) सुंदर, (४) युद्ध व (५) उत्तर अशी पाच कांडे या रामचरिताची आहेत. यात सर्व मिळून ९० संधी ( अध्याय अथवा सर्ग ) आहेत. वाल्मीकीकृत रामायणापेक्षा या रामकथेच्या वेगळेपणाची काही उदाहरणे अशी : यातील सर्व महत्त्वाची पात्रे — उदा., राम, हनुमान, रावण — ही जिनभक्त आहेत. या महाकाव्यानुसार रावणाला फक्त एकच डोके होते पण त्याच्या गळ्यातील नवरत्नाच्या हारात त्याच्या चेहर्‍याची प्रतिबिंबे पडल्यामुळे त्याला दहा तोंडे आहेत, असे वाटे. रावणाने वालीबरोबर युद्ध केले पण त्यात त्याला माघार घ्यावी लागली. वालीने युद्धानंतर सुग्रीवाला राज्य देऊन स्वतः जिनदीक्षा घेतली. वानर हे विद्याधर या देवयोनीतले होते पण त्यांनी राजचिन्ह म्हणून वानराची प्रतिमा स्वीकारल्यामुळे त्यांना वानर म्हणत. जैन पुराणात नऊ वासुदेव व नऊ बलदेव आहेत. पउम ( पद्म ) म्हणजे राम हा आठवा बलदेव असून लक्ष्मण हा आठवा वासुदेव आहे. अग्निदिव्यानंतर सीता विरक्त होऊन ती मुनी सर्वभूषणाकडून दीक्षा घेते. लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर राम दीक्षा घेतो व तपश्चर्या करून मोक्षाला जातो. या काव्याचे ८३ संधी स्वयंभूने लिहिले असून पुढील संधी त्याचा पुत्र त्रिभुवन स्वयंभू याने वाढविले असावेत.

अरिष्टनेमी अथवा नेमिनाथ हा तेविसावा तीर्थंकर. रिट्ठणेमिचरिउ हे त्याचे चरित्र. याचे दुसरे नाव हरिवंशपुराण. स्वयंभूने यास हरिवंश असेही म्हटले आहे. याची कांडे चार : (१) यादव, (२) कुरू, (३) युद्ध व (४) उत्तर. जैनमत आणि पर ( ब्राह्मणी ) मत विचारात घेऊन हरिवंश ग्रंथ लिहिला, असे तो सांगतो. यादव कांडात हरिवंशाच्या आधारे कृष्णजन्म, कृष्णाच्या बाललीला, विवाह, तसेच प्रद्युम्न व तीर्थंकर नेमिनाथ यांच्या जन्मकथा आहेत. कुरू कांड व उत्तर कांड या दोन कांडांत कौरव पांडवांच्या जन्मा-पासून भारतीय युद्धात पांडव विजयी झाल्यापर्यंतची महाभारत कथा आहे. या काव्याची शैली साधी, पण सुंदर आहे. उत्तर कांडात तीर्थंकर नेमिनाथ यांचे चरित्र आहे.

स्वयंभूछंद हा मुख्यतः प्राकृत व अपभ्रंश वृत्तांवर संस्कृतात लिहिलेला ग्रंथ आहे. यात प्राकृत कवींचा नामनिर्देश करून तो त्यांची उदाहरणे घेतो. त्यामुळे अनेक अज्ञात कवींवर प्रकाश पडला आहे.

स्वयंभूला ख्याती आणि सन्मान या दोहोंचाही लाभ झाला होता. त्याच्या समकालीनांनी त्याला ‘कविराज’ आणि ‘छंदचूडामणि’ ही बिरुदे दिली होती.

तगारे, ग. वा.