सोळंकी घराणे : गुजरात, कच्छ, सौराष्ट्र इ. प्रदेशांवर राज्य करणारा एक मध्ययुगीन राजवंश. याचा चौलुक्य वा चालुक्य राजवंश असाही उल्लेख करतात. राजपुतांच्या चार अग्निकुलांत याचा अंतर्भाव होतो. वरील प्रदेशांवर सोळंकी घराण्याचा दहावे ते तेरावे शतकांदरम्यान अंमल होता. या घराण्याचा मूळ पुरुष मूलराज हा सामंतसिंह या चावडा (चाप) घराण्यातील राजाचा सेनापती व भाचा होता. त्याने सामंतसिंहाचा पराभव करून अनहिलवाड (पाटण) येथे राजधानी केली. चाप घराण्याच्या आधिपत्याखालील उर्वरित प्रदेश पादाक्रांत करून त्याने कच्छसह उत्तरेस सांचोरपर्यंत (सत्यपुर) व दक्षिणेस साबरमतीपर्यंत राज्यविस्तार केला. त्याला शाकंभरीच्या पहिला विग्रहराज या चाहमान राजाच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. मूलराजने आपले राज्य चामुण्डराज (कार. ९९५-१०१०) या मुलाकडे सुपूर्द केले. त्याने परमार सिंधुराज याच्या आक्रमणाला यशस्वी रीत्या तोंड दिले मात्र कलचुरी राजा दुसरा कोक्कल याच्या सामर्थ्यापुढे त्याला नमावे लागले. चामुण्डराजला वल्लभराज व दुर्लभराज हे दोन मुलगे होते. वल्लभराजच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या दुसऱ्या मुलाकडे सत्ता सोपविली. दुर्लभराज (कार. १०१०-२२) यास चाहमान राजा महेंद्र याने स्वयंवर सभेत (नाडोल येथे) बहीण दिली. तेव्हा तिला लग्नाची मागणी घालणारे माळवा, मथुरा आदी राज्यकर्ते निराश झाले. त्यांनी दुर्लभराजवर आक्रमण केले. परंतु दुर्लभराजने त्यांचा पराभव करून कीर्तिराजचे लाट लुटले (१०१८) मात्र कीर्तिराजला पदच्युत करून ते आपल्या राज्यात समाविष्ट केले नाही. दुर्लभराजने आपला पुतण्या व नागदेवचा मुलगा पहिला भीमदेव याच्यासाठी राजत्याग केला. पहिल्या भीमदेव (कार. १०२२-६४) राजाच्या कारकिर्दीत महमूद गझनीने सोमनाथ मंदिर लुटून गुजरात पादाक्रांत केले (१०२४) तेव्हा भीमदेवने कच्छमधील कंठकोटमध्ये आश्रय घेतला आणि महमूद परत गेल्यानंतर राजधानीत परतला. नंतर त्याने परमार धंधुकाकडून मौंट अबू घेतले आणि त्या ठिकाणी प्राग्वाट घराण्यातील विमल याला राज्यपाल नेमले. विमलने तेथे प्रसिद्ध आदिनाथ मंदिर बांधले. धंधुकाला पुनःस्थापित केले. पुढे धंधुकाचा मुलगा पूर्णपाल मौंट अबू येथे स्वतंत्रपणे १०४२ पर्यंत राज्य करीत होता परंतु भीमदेवच्या मौंट अबू येथील कोरीव लेखांवरून (१०६२) हा प्रदेश भीमदेवच्या आधिपत्याखाली आला असावा आणि तो तेराव्या शतकाअखेर सोळंकीच्या अधिसत्तेखाली होता. भिनमालच्या परमार कृष्णराजला भीमदेवने पदच्युत करून तुरुंगात टाकले परंतु दक्षिण मारवाडवर स्वामीत्व मिळविण्यात नाडोलच्या चाहमान अहिल व त्याचा वारस अणहिल्ल यांच्यामुळे अडथळा आला. एवढेच नव्हे, तर अहिलच्या नातवाने (बालप्रसाद) त्याला कृष्णराजला मुक्त करण्यास भाग पाडले. पुढे भीमदेवने सिंधू नदी पार करून पंजाबात प्रवेश केला आणि सिंधच्या हम्मुकराजाचा पराभव केला. त्याच्या गुजरातमधील अनुपस्थितीत परमार भोजाच्या कुलचंद्र या सेनापतीने अनहिलवाड लुटले. परत आल्यानंतर भीमदेवने कलचुरी कर्णाच्या मदतीने माळव्यावर आक्रमण केले. तसेच दशार्ण, काशी, अयोध्या आणि यांत्रीदेश येथील राजांचा पराभव केला. पुंड्र आणि आंध्र येथील सत्ताधीशांनी त्याच्याबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.
भीमदेवला मूलराज, क्षेमराज आणि कर्ण असे तीन मुलगे होते. त्यांपैकी मूलराज लहानपणीच वारला. क्षेमराजाची माता उपस्त्री होती. म्हणून भीम-देवने कर्णाला राज्य देऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारला. कर्णाने (कार. १०६४-९४) त्रैलोक्यमल्ल हे बिरुद धारण केले आणि नवसारीपर्यंत राज्यविस्तार केला. त्याने परमार जयसिंह याला ठार मारून माळवा हस्तगत केला परंतु नंतर त्यास परमार जगद्देवच्या हातून पराभव पत्करावा लागला. त्याने भिल्ल राजा आश याचा पराभव करून अहमदाबाद-जवळील आशपल्ली (आधुनिक अस्वल) घेतले. त्याने गोव्याच्या कदंबवंशी जयकेशीन राजाच्या मयणल्लदेवीनामाक कन्येशी विवाह करून राजनैतिक संबंध जोडले. त्याच्यानंतर त्याचा अज्ञान मुलगा जयसिंह (कार. १०९४-११४३) गादीवर आला. तेव्हा त्याची आई मयणल्लदेवी राजमुखत्यार (रीजंट) म्हणून राज्यकारभार पाहात असे. तो सज्ञान झाल्यावर त्याने सिद्धराज ही पदवी धारण केली. सौराष्ट्रातील आभीरांचा पराभव करून तो प्रदेश जिंकला. तसेच परमारांकडून भिनमालही घेतले. नाडोल व शाकंभरी येथील चाहमान राजे त्याचे मांडलिक झाले. नंतर त्याने माळवा घेऊन चंदेल्लांच्या महोबा व कालंजरवर स्वारी केली. त्यांची भिल्सा नगरी जिंकली. कल्याणीचा चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य याचाही पराभव केला. जयसिंह हा सोळंकी घराण्यातील एक श्रेष्ठ, कलाभिज्ञ व पराक्रमी राजा होता. त्याच्या कारकिर्दीतील कोरीव लेखांत त्याचे राज्य उत्तरेकडे जोधपूर येथील बाली आणि सांभर (जयपूर) पर्यंत तर पूर्वेकडे भिल्सा आणि पश्चिमेकडे काठेवाड व कच्छपर्यंत विस्तारले होते. सिद्धपूर येथील साधू-संन्याशांना उपद्रव देणाऱ्या बार्बरा यांचे बंड त्याने मोडले. सौराष्ट्रात त्याने सज्जन या दंडाधिपतीस राज्यपाल नेमले. चाहमान अर्णोराज यास आपली कन्या देऊन त्यास मांडलिक केले. त्याच्या अखेरच्या कारकिर्दीत परमार राजा जयवर्मन याने माळवा परत जिंकून घेतला आणि नाडोलचा चाहमान राजा आशा यानेही सोळंकीची सत्ता झुगारून दिली.
जयसिंह शैवपंथी होता. त्याने सिद्धपूर येथे रुद्रमहाकालाचे मंदिर बांधले. परमार राजा भोजाप्रमाणेच तो विद्येचा चाहता होता. त्याने ज्योतिष, न्याय, पुराण या विषयांच्या अध्ययनासाठी नेक पाठशाळा स्थापन केल्या. त्याच्या दरबारात अनेक विद्वान होते. त्यांपैकीच जैन पंडित हेमचंद्र हे होत.
जयसिंह निपुत्रिक मरण पावला. तेव्हा पहिला भीमदेव याच्या एका दासीचा मुलगा कुमारपाल (कार. ११४३-७२) याने जैन लोक आणि मेहुणा कृष्ण यांच्या मदतीने अनहिलवाडची गादी हस्तगत केली. तो स्वतः शैव संप्रदायी होता पण जैन लोकांनी त्याला मदत केली होती. त्यामुळे त्याने हेमचंद्रांकडून जैन धर्माची दीक्षा घेतली. गादीवर आल्यानंतर त्याने आपल्याविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या मंत्र्यांना कंठस्नान घातले आणि कृष्ण या मेहुण्यास त्याच्या उन्मतपणाबद्दल अंध केले. चाहमान व परमार राजांनी त्याच्यावर आक्रमण केले पण कुमारपालने त्यांचा पराभव करून माळवा आपल्या राज्यास जोडला. पुढे त्याने ११५० मध्ये चाहमान राजा अर्णोराज याच्या सपादलक्ष देशावर स्वारी करून त्याचा पराभव केला तेव्हा अर्णोराजने आपल्या कन्येचा विवाह कुमारपालबरोबर करून शांतता तह केला. कुमारपालच्या कोरीव लेखांवरून त्याच्या राज्याचा विस्तार उत्तरेकडे बर्मर, पाली आणि चितोंड पूर्वेकडे भिल्सा आणि पश्चिमेकडे काठेवाडपर्यंत झाला होता. त्याने मौंट अबूवर आक्रमण करून परमार विक्रमसिंहाला पदच्युत केले आणि त्याचा पुतण्या यशोधवल यास सिंहासनाधिष्ट केले. त्याने यशोधवल आणि आपले सेनापती विजय व कृष्ण यांच्यासह माळव्याच्या बल्लाळवर आक्रमण केले. त्यात बल्लाळ मारला गेला. तेव्हा त्याने भिल्सापर्यंतचा माळवा आपल्या गुजरात राज्यात समाविष्ट केला. कुमारपालने नंतर नाडोलच्या राज्यपालाचा पराभव करून त्याचा दंडनायक वैजल्लदेव याच्या ताब्यात ते राज्य दिले. तसेच त्याने चाहमान राजा अर्णोराज याच्या शाकंभरीवर हल्ला केला कारण त्याने त्याच्या राणीचा अपमान केला होता. परिणामतः अर्णोराजने समझोता करून कुमारपालच्या सैन्यास मदत करण्यासाठी आपल्या सोमोश्वरनामक मुलास पाठविले. त्याचा सेनापती अंबड याने १९६० – ६२ दरम्यान कोकण देश जिंकून घेतला आणि गुजरात राज्यात अंतर्भूत केला.
कुमारपालच्या दरबारात हेमचंद्र हे जैन पंडित होते. त्यांच्या प्रभावाखाली त्याने पशुहत्येला बंदी केली होती. तिचे पालन सौराष्ट्र, लाट, मालव, आभीर, मेदपाट, मेरू आणि सपादलक्ष या प्रदेशांनी केले. कुमारपालच्या मारवाडमधील मांडलिकांनीही पशुहत्या बंद केली तथापि कुमारपालच्या कोरीव लेखांवरून असे आढळते की, त्याने जैन धर्माची दीक्षा घेऊनही आपले कुलदैवत असलेल्या शंकराचा (शिव) मानसन्मान ठेवला आणि जैन मंदिरांबरोबरच हिंदू मंदिरे बांधली. ज्यांनी आपल्या संपत्तीचे मृत्युपत्र केले नाही, त्यांची संपत्ती जप्त करण्याचा कायदा त्याने रद्द केला. तसेच जुगारावर बंदी आणली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या अजयपाल व भाचा प्रतापमल्ल यांत सिंहासनासाठी संघर्ष उद्भवला. अजयपालला ब्राह्मणांचा तर प्रतापमल्ल याला जैनांचा पाठिंबा होता. या संघर्षात अजयपाल (कार. ११७२–७६) यशस्वी होऊन त्याने परमार व चाहमानावर आपले प्रभुत्व कायम ठेवले आणि गुहिल राजा सामंतसिंह याचे आक्रमण परतवून लावले. जैन वृत्तपत्रांच्या वृत्तांतानुसार अजयपालने जैनांचा छळ करून काही जैन मंदिरे पाडली. अजयपाल प्रतीहार वयजलदेव बरोबरच्या संघर्षात मारला गेला (११७६) तेव्हा त्याचा अज्ञान मुलगा दुसरा मूलराज (कार. ११७६–७८) अनहिलवाडच्या गादीवर सिंहासनाधिष्ट झाला आणि त्याची आई नाईकीदेवी (कदंब परमर्दिनची कन्या) राज्यकारभार पाहू लागली. या सुमारास मुइझ्झुद्दीन मुहम्मद घोरीने गुजरातवर स्वारी केली (११७८). तेव्हा नाईकीदेवीने सोळंकींच्या सैन्याचे नेतृत्व करून घोरीच्या सैन्याचा मौंट अबूच्या पायथ्याशी असलेल्या गदरघट्ट येथे पराभव केला तथापि या संधीचा फायदा घेऊन परमार राजा विंध्यवर्मन याने सोळंकींच्या अखत्यारीतील माळवा हस्तगत केला. मूलराज बालवयातच मरण पावला (११७८) तेव्हा त्याचा लहान भाऊ दुसरा भीम (कार. ११७८–१२३९) गादीवर आला. त्यामुळे त्याच्या राज्यातील अनेक प्रांताधिकारी स्वतंत्र झाले. परिणामतः केंद्रसत्ता दुबळी झाली तथापि त्याच्या कारकिर्दीतील कोरीव लेखांवरून त्याच्या अंमलाखाली बार्मर, गोडवार, डुंगरपूर आणि काठेवाड हे प्रदेश होते. परकीय आक्रमणे आणि अंतर्गत दुही यांमुळे दुसरा भीम नामधारीच सत्ताधीश होता. अशा परिस्थितीत भीमपल्ली येथे उदयास आलेल्या वाघेल घराण्यातील सहकार्यावरच त्यास राहावे लागले. कुत्बुद्दीन ऐबक याने गुजरातवर स्वारी करून अनहिलवाड लुटले होते पण तो परतल्यावर वाघेलनृपती लवणप्रसाद, त्याचा पुत्र वीरधवल आणि त्याचे मंत्री वस्तुपाल व तेजपाल हेच गुजरातचे खरे सत्ताधीश झाले. भीमानंतर लवकरच सोळंकी घराण्याची सत्ता संपुष्टात आली आणि गुजरातवर वाघेल घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली.
सोळंकी राजवंशाच्या कारकिर्दीत गुजरात-सौराष्ट्रात हिंदू मंदिरांबरोबरच काही जैन मंदिरेही बांधण्यात आली. सोळंकी वास्तुशैलीचा सर्वश्रेष्ठ आविष्कार मोढेरा येथील सूर्यमंदिरात (१०२६) आढळतो. येथे अन्य देवदेवतांच्या पारंपरिक रूपकांबरोबरच चुंबनापासून संभोगापर्यंतची कामशिल्पे खोदलेली आहेत. सद्यस्थितीत हे मंदिर जीर्णशीर्ण अवस्थेत अवशिष्ट आहे. या सूर्यमंदिराच्या आदर्शानुसार दिलमाल येथील तिंबाजी माता, नवलाखामंदिर, सिद्धपूरचे रुद्रमहालय ही या समूहातील विशेष उल्लेखनीय मंदिरे होत. यांतून मूर्तिकामाचा अतिरेक आढळतो. नारिंगा, गिरनार, पालिठाणा आणि मौंट अबू ही जैन धर्मीयांची क्षेत्रे असून येथील मंदिरांत बनासकाठा जिल्ह्यातील कुंभरिया येथील जैन मंदिर समूह आणि मौंट अबूवरील मंदिरे विशेष ख्यातनाम आहेत. राजस्थान व गुजरात यांच्या सीमेवरील चंद्रावती हेही जैनांचे तीर्थक्षेत्र होय. दिलवाडा येथील जैन मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. मौंट अबूवरील विमलवसही (आदिनाथ-१०३२) छतांवरील अप्रतिम शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. एकूण सोळंकी वंशाच्या वास्तुशिल्पशैलीत जैन मंदिरांचे प्रमाण जास्त असून जैन मूर्तिसंभारात चोवीस तीर्थंकारांच्या मूर्तींबरोबर अनेक जिनांच्या सुद्धा मूर्ती आहेत. शिवाय तीर्थंकारांच्या चक्रेश्वरी, सरस्वती, सोळा विद्यादेवता आणि काही यश्रींच्या मूर्ती आढळतात.
पहा: वाघेल वंश.
संदर्भ : 1. Majumdar, R. D. Ed. The struggle for Empire, Mumbai, 1998.
२. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव, पुणे, २००५.
देशपांडे, सु. र.