सोंगट्यांचा खेळ : सोंगट्या, पट व फासे किंवा कवड्या यांच्या साहाय्याने खेळावयाचा एक जुना बैठा खेळ. हा खेळ प्राचीन काळी भारतात फार लोकप्रिय होता. हल्ली तो काही खेडेगावातच प्रचलित असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. महाभारत काळातील कौरव-पांडवांच्यावेळी हा खेळ द्यूत या नावाने प्रचलित होता. या द्यूतात पांडव द्रौपदीसह सर्वस्व पणाला लावून हरले हे सर्वश्रूतच आहे. त्या काळात हा खेळ सोंगट्या व फासे यांनी खेळत असत. हल्ली फाशांच्या ऐवजी सहा कवड्यांनी हा खेळ खेळला जातो.

या खेळासाठी पिवळ्या, तांबड्या, हिरव्या व काळ्या अशा चार रंगांच्या प्रत्येकी चार सोंगट्या अशा एकूण सोळा सोंगट्या लागतात. याशिवाय चार पट्टे असलेला पट व ६ कवड्या हे साहित्य लागते. या खेळात दोन पक्ष असतात व प्रत्येक पक्षात दोन, तीन, चार अशा समान संख्यात्मक व्यक्ती खेळू शकतात. चार ते सहा खेळाडू प्रत्येक पक्षात असल्यास आदर्श खेळाडूसंख्या होते.

या खेळातील एक पक्ष चार पिवळ्या व चार तांबड्या सोंगट्या घेतो व दुसरा पक्ष चार हिरव्या व चार काळ्या सोंगट्या वापरतो. पिवळ्या व तांबड्या सोंगट्यांच्या सटास (सेट) हळदकुंकू म्हणतात व हिरव्या व काळ्या सोंगट्यांच्या सटास बेलभंडार म्हणतात. खेळाचा पट चौकोनी असतो व त्याच्या चारी बाजूंस चार आयताकृती पट्टे असतात. या चारी पट्ट्यांवर ३-३ घरांचे आठ समांतर पट्टे असतात, त्यांना घरे म्हणतात. अशी एकूण ३ X ८ = २४ घरे असतात, म्हणजे आडवी तीन उभी आठ. यांपैकी बाहेरच्या बाजूच्या पट्ट्यांवर पाचव्या घरात एकेक फुली असते. अशा चार पट्ट्यांवर ८ फुल्या असतात. या फुल्यांच्या घरांना कट म्हणतात. या फुलीच्या घरात असलेली सोंगटी प्रतिपक्षाला मारता येत नाही. ‘सोंगटीस नरद’ किंवा ‘पगडे’ असेही या खेळात म्हणतात.

या खेळाची सुरुवात दोन पक्षांमध्ये पट मांडून आपापल्या सोंगट्यांचे सट निवडून करतात. सहा कवड्या हातातील मुठीत खुळखुळवून जमिनीवर पसरावयाच्या याला दान घेणे असे म्हणतात. किती कवड्या पालथ्या व किती कवड्या उताण्या पडल्या यावर किती गुण मिळाले हे ठरवितात. दानाचे गुण व प्रकार कवड्यांच्य उताणे व पालथे किती यांवर अवलंबून असते, ते पुढीलप्रमाणे असते : ६ कवड्या पालथ्या पडल्यास ६ गुण ६ कवड्या उताण्या पडल्यास १२ गुण १ कवडी उताणी व ५ कवड्या पालथ्या पडल्यास १० गुण १ कवडी पालथी व ५ कवड्या उताण्या पडल्यास २५ गुण २ कवड्या उताण्या व बाकीच्या ४ पालथ्या पडल्यास २ गुण ३ उताण्या व ३ पालथ्या पडल्यास ३ गुण ४ उताण्या व २ पालथ्या पडल्यांस ४ गुण याप्रमाणे दानांचे गुण मोजतात. कोणत्याही खेळाडूस १० अगर २५ गुणांचे दान पडल्याशिवाय डावात सामील होता येत नाही. १० किंवा २५ चे दान पडल्यासच सोंगटी पटावर ठेवण्याचा अधिकार मिळतो. अशा रीतीने आठही सोंगट्या पटावर बसल्यानंतर आणखी १० अगर २५ चे दान पडावे लागते. त्याला फर्जी जाणे असे म्हणतात. फर्जी गेल्याशिवाय प्रतिपक्षाची सोंगटी मारावयाचा हक्क मिळत नाही.

हा खेळ सुरू करण्यापूर्वी तोडी कशी करावयाची याचा करार (ठराव) करावा लागतो. दानाची तोडी म्हणजे दोन हे दान प्रतिपक्षाच्या सोंगटीच्या घरावर यावे लागते. याप्रमाणे तिनाची तोडी, चाराची तोडी, पगड्याची तोडी असे प्रथम करार ठरवावे लागतात. फर्जी गेल्यानंतर प्रत्येक १० अगर २५ चे दान पडल्यास एक घर जास्त सोंगटी सरकविण्याची प्रथा आहे. या एक घरास ‘पगडे’ असे म्हणतात. म्हणजे १० चे दान पडल्यास ११ वे घर जादा, व २५ चे दान पडल्यास २६ वे घर जादा सोंगटी सरकवितात व प्रतिपक्षाच्या सोंगट्या मारण्यासाठी नेमके त्या घरात येणे (नरदाच्या तोडीतच असे होते).

दान पडल्यानंतर जेवढे दान पडले असेल तितकी घरे आपली सोंगटी सरकविणे. याची सुरुवात पटाच्या आपल्या बाजूच्या मधल्या घरांतून निघून उजव्या बाजून सर्वपट (४ पट) फिरून शेवटी सोंगटी आपल्या बाजूच्या मधल्या घरातून वर नेऊन पटाच्या मधल्या चौकोनात न्यावयाची. याप्रमाणे आम्ही सोंगट्यांनी सर्व पट-मार्गक्रमण करून गेल्यावर पटाच्या मधल्या चौकोनात आडव्या ठेवतात. त्याला ‘सोंगटी झोपली’ असे म्हणतात. अशा आठ सोंगट्यांची ‘आठ नरदाची तोडी’ किंवा ‘आठ पगड्याची तोडी होणे’ हा सोंगट्यांच्या खेळातील प्रतिपक्षावर मिळविण्याचा सर्वोत्तम विजय मानतात. यानंतर दुसरा विजय म्हणजे ‘तोडातोडी’ याचा अर्थ दोन्ही पक्षांचा बरोबरीचा डाव झाला असा होतो. यात ‘तोड होणे’ म्हणजे ठरलेल्या कराराप्रमाणे प्रतिपक्षाची सोंगटी मारणे. अशी दोन पक्षांनी कराराप्रमाणे एकमेकांची सोंगटी मारल्यास डाव बरोबरीने सुटतो. विजयाचा तिसरा प्रकार म्हणजे आपल्या सर्व सोंगट्या पकाच्या कटीवर नेऊन ठेवणे. याला ‘काडी’ असे म्हणतात. असे एका पक्षाने अगोदर केल्यास खेळ संपतो व दुसरा पक्ष हरतो.

प्रत्येक पक्ष आळी-पाळीने दान घेऊन खेळ संपेपर्यंत खेळत राहातो. हा खेळ इतर बैठ्या खेळाप्रमाणे चांगला रंगणारा असून त्यात बराच वेळ जातो. पूर्वी दुपारी व अगर रात्री भोजनानंतर हा खेळ खेळावयास लोक बसत असत. हा खेळ आता फारसा लोकप्रिय नाही.

पहा : पटावरील खेळ फाशांचे खेळ.

 

शहाणे, शा. वि.