सेबल (मुस्टेला झिबेलिना)सेबल : अमेरिकन किंवा यूरोपियन ⇨ मार्टेनच्या प्रजातीतील रशियात सापडणाऱ्या जातीला सेबल या सर्वसामान्य नावाने ओळखतात. त्यांचा समावेश मुस्टेलिडी कुलात होतो. त्यांचे शास्त्रीय नाव मार्टेस (मुस्टेला) झिबेलिना असे आहे. उत्तर आशियात विशेषतः सायबीरियात ते प्रामुख्याने सापडतात. याशिवाय उत्तर यूरोप, रशिया, उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग, उरल पर्वताचा पूर्व व दक्षिण भाग, कॅमचॅटका या प्रदेशांतही ते सापडतात.

सेबल साधारणपणे मांजरासारखा दिसणारा प्राणी आहे. शरीराची लांबी ५०-६० सेंमी. व शेपूट १२-२० सेंमी. लांब असते. त्याच्या शरीराचे वजन ०·९-१·८ किग्रॅ. असते. शरीर गुबगुबीत असून पाय आखूड, बळकट व नखरयुक्त असतात. सर्व शरीरावर थंडीपासून रक्षण करणारी मऊ व ऊबदार फर असते. कान लहान असतात. शेपूट झुबकेदार असते. फरचा रंग गडद उदी ते काळा, क्वचित करड्या रंगाची छटादेखील दिसते. गळ्यावर फिकट सोनेरी, पिवळसर किंवा पांढरट रंगाचा डाग असतो.

सेबल स्वभावाने लाजाळू व बुजरा असून तो वृक्षवासी आहे. झुडपांमध्ये बीळ करून किंवा झाडाच्या ढोलीत तो राहतो. रात्री तो भक्ष्य शोधायला बाहेर पडतो. त्याचे खाद्य खारी, उंदीर, लहान पक्षी व त्यांची अंडी, किडे, छोटे प्राणी, मासे हे आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये २५०-२९० दिवसांच्या गर्भावधीनंतर मादीला एका वेळी ३-५ पिले होतात.

सेबलची फर सर्व प्रकारच्या फरींमध्ये अत्यंत मौल्यवान असल्यामुळे फरसाठी त्यांची फार मोठ्या प्रमाणावर शिकार होते. कडक थंडीच्या मोसमात त्यांची फर उत्कृष्ट वाढलेली असते. थंडीत त्यांच्या केसांचा रंग बदलत नाही. अशा वेळी सापळे लावून सेबल पकडण्यात येतात. त्यांच्या फरचा उपयोग स्कार्फ, जाकीट, कोट, राजवस्त्रे यांसाठी व स्त्रियांचे कपडे सुशोभित करण्यासाठी करतात. गडद रंगाच्या फरला जास्त मागणी असते. फरसाठी केलेल्या शिकारीमुळे सेबलचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती वाटू लागली होती. परंतु रशियन सरकारने कायद्याने त्यांच्या शिकारीवर बंदी घातली. आता सेबल फर फार्ममध्ये पद्धतशीरपणे वाढविले जातात.

जोशी, लीना