केस : त्वचेपासून निघणाऱ्या लांबट तंतूसारख्या व ⇨केराटीन  या प्रथिन पदार्थांनी बनलेल्या उद्वर्धांना (बाह्य वाढींना) ‘केस’ असे म्हणतात. सस्तन प्राण्यांतच केस आढळतात म्हणून त्या वर्गाच्या प्राण्यांचे ते वैशिष्ट्य मानले जाते. काही सरडे, कीटक आणि वनस्पती यांच्या बाह्यांगावर केसासारखी दिसणारी बाह्य वाढ आढळते, परंतु ते खरे केस नव्हेत. हिप्पोपोटॅमस, गेंडा, हत्ती इ. अगदी थोडे केस असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरील केसांना ‘दृढरोम’ म्हणतात. देवमासा आणि शिरस यांना सर्वांगावर केस नसतात परंतु त्यांच्या मुखाभोवती थोडे भरभरीत, खुंटासारखे केस असून त्यांच्यामुळे स्पर्शसंवेदना होत असल्यामुळे त्यांना ‘स्पर्शरोम’ असे म्हणतात. इतर बहुतेक सस्तन प्राण्यांमध्ये शरीरावर सर्वत्र कमी जास्त प्रमाणात केस असतात. मानवामध्ये तळहात व तळपाय यांखेरीज सर्वत्र केस असतात, परंतु शरीराच्या विविध भागांवर विविध प्रकारांचे केस आढळतात. डोके, भुवया, हातपाय आणि जघन (जांघ) या सर्व ठिकाणी केस असले तरी ते वेगवेगळ्या प्रकारांचे असतात. लांबी, जाडी, रंग आणि कुरळेपणा यांमध्ये हे फरक दिसून येतात. काटेरी मुंगीखाऊ आणि जाहक (हेजहॉग) यांच्या अंगावरचे काटे, गेंड्याच्या नाकावरील शिंग आणि साळीच्या अंगावरील तीक्ष्ण शलली (साळीची पिसे) हे सर्व प्रकार केसांच्या परिवर्तनाने उत्पन्न झालेले आहेत. गेंड्याचे शिंग हे सायुज्यित (एकमेकांत गुंतून एकजीव झालेल्या) केसांचा घट्ट जुडगाच असतो.

आ.१. केसांचे प्रकार : (१) उपत्वचा, (२) बाह्यक, (३) मध्यक. वरच्या बाजूला केसांचे आडवे छेद दाखविले आहेत.

संरचना : केस चिवट तंतुमय प्रथिनांचा बनलेला असतो. या प्रथिनांना ‘केराटिने’ अथवा ‘शृंगीप्रथिने’ असे म्हणतात. केस तीन थरांचा बनलेला असतो. सर्वांत बाहेरचा थर अगदी पातळ असून त्याला ‘उपत्वचा’ असे नाव आहे. हा थर केराटिनाच्या अगदी चपट्या कोशिकांचा (पेशींचा) बनलेला असून त्या कोशिकांची मांडणी घराच्या छपरावरील कौलांसारखी असते. या कोशिकांच्या मोकळ्या कडा केसाच्या बाहेरच्या टोकाकडे वळलेल्या असतात. उपत्वचेच्या आत बाह्यक (कवचासारखा भाग) असतो. हा थरही केराटीनमय कोशिकांचा बनलेला असून तो नलिकाकार असतो. बाह्यकातील कोशिका लांब व तर्कूच्या (चातीच्या) आकाराच्या असून त्या एकमेकींस घट्ट चिकटलेल्या असतात. त्यांची मांडणी अनुदैर्ध्य म्हणजे केसाच्या मुख्य अक्षाशी समांतर असून त्या थरामुळे केसाला मजबुती येते. ज्या रंजकद्रव्यामुळे केसांना रंग येतो ते द्रव्य या बाह्यक कोशिकांमध्ये असते, त्याला ‘काली’ किंवा ‘कृष्णा’ (मेलॅनीन) रंजकद्रव्य असे म्हणतात. बाह्यकाच्या आतील थर म्हणजे केसाचा गाभा असून त्याला मध्यक असे म्हणतात. मध्यक अतिशय चपट्या कोशिकांचे बनलेले असून त्या केराटीनसदृश पदार्थाच्या बनलेल्या असतात. त्या कोशिकांभोवती हवेचे सूक्ष्म बुडबुडे असल्यामुळे मध्यकावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे केस काळे व चमकदार दिसतात.

उत्पत्ती : बाह्य त्वचेतील काही कोशिका त्वचेत खोलवर जाऊन तेथे त्यांच्यामुळे फुगीर असा ‘लोमपुटक’ (केसाचे मूळ जेथे असते तो त्वचेवरील खोलगट भाग) बनतो. या लोमपुटकापासूनच केसाची उत्पत्ती होते. हा पुटक अंतस्त्वचेत किंवा त्याच्याही खाली जाऊन त्याचा कांद्याच्या आकाराचा कंद बनतो. त्याला ‘पुटक-कंद’ (केशकंद) असे नाव असून त्यालाच केसाचे मूळ म्हणतात. पुटकाच्या एका बाजूला त्वचेतील वसा ग्रंथीची (स्निग्ध द्रव्य तयार करणाऱ्या ग्रंथीची) नलिका आलेली असून त्या नलिकेवाटे वसा ग्रंथीचा तेलकट स्राव केसाला मिळत असल्यामुळे केस कोरडा वा ठिसूळ होत नाही. पुटकालाच एक सूक्ष्म स्नायू जोडलेला असून त्या स्नायूच्या आकुंचनामुळे केस ताठ उभे राहतात. लोमपुटकाच्या तळाशी मध्यभागी त्वचेतील कोशिकांचा एक पुंज असतो त्याला ‘त्वचापिंडिका’ असे नाव असून त्या पिंडिकेभोवती केशवाहिन्यांचे (अतिशय बारीक वाहिन्यांचे) जाळे असते. त्यामुळे केशमूळाला रक्ताचा पुरवठा होतो. त्वचापिंडिकेभोवती पुटक-कंदामध्ये विभाजी कोशिकांचे वलय असते त्याला ‘आधारद्रव्य’ असे नाव असून पुटकात नव्याने उत्पन्न होणाऱ्या कोशिकांचा गाभा बनून तो पुटकाच्या मध्यापासून वर सरकू लागतो. गाभ्याच्या सर्वांत आत असलेल्या कोशिका लवकरच कठीण व निर्जीव होऊन त्यांचाच केस बनतो. गाभ्यातील बाहेरच्या कोशिकाही निर्जीव व कठीण होऊन द्विस्तरी केशावरण बनते. केसाचा गाभा व केशावरण यांची वाढ होते तसतसे ते पुटकामधून वर वाढत जातांना एकमेकांस घट्ट चिकटलेले असतात. पण त्वचेच्या पृष्ठभागाशी पोहोचल्यावर त्यांच्याभोवती असणाऱ्या पुटकभित्तीतील कोशिकांपासून उत्पन्न होणाऱ्या रासायनिक पदार्थामुळे आवरणाचा नाश होऊन हळूहळू केस मोकळा होतो व त्वचेच्या पृष्ठभागावरून बाहेर पडतो. त्यापूर्वी वसा ग्रंथीचा तेलकट स्राव त्याला दिला जातो.

आ. २. वाढणाऱ्या केसाची संरचना दाखविणारा अनुदैर्ध्य छेद : (१) बाह्य त्वचा, (२) मोकळा केस, (३) केशावरण, (४) मूलावरण, (५) कृष्णरंजक कोशिका, (६) त्वचापिंडिका, (७) आधारद्रव्य, (८) पुटककंद. (९) त्वचा, (१०) केस कठीण होतो ती जागा, (११) केशोत्थापक स्नायू, (१२) वसा ग्रंथी.

केसांच्या उत्पत्तीतील महत्त्वाच्या प्रक्रिया पुढील होत : (१) त्वचापिंडिकेला होणाऱ्या रक्ताच्या पुरवठ्यातून योग्य पोषण, (२) पुटक-कंदातील कोशिकांचे विभाजन, (३) अंतःकोशिकी संश्लेषणामुळे (साध्या संयुगांपासून जटिल संयुगे तयार होण्याच्या प्रक्रियेमुळे) होणारी कोशिकांची संख्यावृद्धी, (४) हायड्रोसल्फाइड गटाच्या (- HS -) ऑक्सिडीकरणाने [→ ऑक्सिडीभवन] दृढीभवन वा शृंगीभवन (शिंगात असणाऱ्या घटकामध्ये रूपांतर) होऊन डायसल्फाइड अनुप्रस्थ (आडवा) बंध (- S – S -) उत्पन्न होतो. केसामध्ये गंधकाचे अस्तित्व असते.

लोमपुटकापासून सतत केशोत्पत्ती होत नाही. आलटून पालटून त्याच्या दोन अवस्था दिसतात. एक सक्रिय म्हणजे केशोत्पत्ती आणि केसांची वाढ होण्याची अवस्था व दुसरी म्हणजे विरामावस्था. या अवस्थेत लोमपुटक विश्रांती घेत असल्यामुळे केशोत्पत्ती होत नाही. काही काळानंतर पुन्हा सक्रिय अवस्था येऊन केशोत्पत्ती होते, असे हे केशोत्पत्तीचे चक्र आहे. त्यालाच ‘लोमचक्र’ असे नाव आहे. सक्रियावस्थेचा काळ दोन-तीन वर्षांइतका दीर्घ किंवा बारा दिवसांइतका अल्पही असतो. माणसाच्या डोक्यावरील केसांची वाढ व उत्पत्ती अनेक वर्षे चालू असते, तर काही प्राण्यांच्या केसांची वाढ मर्यादित कालातच होते.

केस ही कायम स्वरूपाची संरचना नसून प्राण्यांच्या आयुष्यात पहिल्या केसांच्या जागी नवे केस उत्पन्न होत असतात. काही सस्तन प्राण्यांत केसांचे हे पुनःस्थापन शरीराच्या एका भागात सुरू होऊन हळूहळू शरीरभर पसरते. उंदीर, घुशी, ससे वगैरे प्राण्यांत हा प्रकार आढळतो. माणूस, मांजर, गिनिपिग वगैरे अनेक सस्तन प्राण्यांत केसांचे पुनःस्थापन हे प्रत्येक लोमपुटकाकडून स्वतंत्रपणे होत असल्यामुळे शरीरातील एखाद्या क्षेत्रातील केस वृद्धिचक्राच्या वेगवेगळ्या अवस्थांत असतात.

 

 

 

 

 

 

आ. ३. सस्तन प्राण्याच्या केसाच्या दंडाच्या एका भागाचा अनुदैर्ध्य छेद : (१) मध्यक, (२) बाह्यक, (३) उपत्वचा.

रंग : त्वचा पिंडिकेवर रंजकद्रव्य असलेल्या कोशिकांचा एक थर असतो. या कोशिकांच्या जीवद्रव्यात काळ्या रंगाच्या कणिका (लहान कण) उत्पन्न होतात. त्या कणिका केस निर्जीव व कठीण होण्यापूर्वी केशकोशिकांत शिरतात व त्यामुळे केसांना काळा रंग येतो या कोशिकांना ‘कृष्णकोशिका’ असे नाव असून त्यांना लांब फाटे असल्यामुळे त्या फाट्यांतून कृष्णकणिका केशकोशिकांमध्ये प्रवेश करतात. काही कोशिकांमध्ये लाल वा पिवळ्या रंजकद्रव्याच्या कणिकाही आढळतात. केसाच्या अगदी बाहेरच्या थरांतील कोशिकांमधील कृष्णकणिकांचा पुरवठा कमी जास्त होऊ शकतो त्याचप्रमाणे रंजककोशिकांचे फाटे अगदी आखूड होण्याचीही शक्यता असते त्यामुळे रंजकद्रव्य कणिका केशकोशिकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. वयोमानाप्रमाणे माणसाचे केस पांढरे होतात त्याचे कारण हे रंजककोशिकांचे फाटे आखूड होणे व त्यांच्यातील रंजककणिकांची संख्या अतिशय कमी होणे हे होय.

वर्गीकरण : माणसाच्या केसांचे तीन प्रकार आहेत : (१) गर्भरोम, (२) प्रतिस्थापी (गळून पडणारे) लोम अथवा लव आणि (३) अंतिम. आकार, उत्पत्तिकाल व संरचनेची भिन्नता यांवरून हे प्रकार कल्पिले आहेत. गर्भावस्थेच्या तिसऱ्या व चौथ्या महिन्यात गर्भरोम गर्भाच्या सर्व शरीरावर उत्पन्न होऊन त्यांची पूर्ण वाढ गर्भावस्थेच्या सहाव्या व सातव्या महिन्यात पूर्ण होते. हे केस अगदी बारीक आकाराचे अरंजक अथवा अगदी थोडे रंजकद्रव्य असलेले असून त्यांना मध्यक नसते. जन्मानंतर हे गर्भरोम गळून जातात डोके, भुवया व पापण्या या ठिकाणचे केस अजून गर्भरोमासारखेच परंतु अधिक रंजकद्रव्ययुक्त आणि वाढलेले असतात. पहिल्या काही महिन्यांनंतर हे प्रतिस्थापी लोम अथवा लव ही गळून पडून अंतिम आकाराचे केस उत्पन्न होतात. यौवनावस्थेच्या सुरुवातीत काखा व जघनावरील केस उत्पन्न होतात आणि त्यांना गौण लैंगिक लक्षणे मानलेली आहेत. पुरुषांमध्ये दाढी, मिशा, पोट व छाती यांवरही केस उत्पन्न होतात.

इतर सस्तन प्राण्यांच्या शरीरावरील केसांचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक विशेष उत्थानोत्तक असणारे (ताठ होणारे) केस (मिशा) आणि दुसरा उत्थानोत्तक नसणारे शरीरावरणावरील केस. पहिल्या प्रकाराच्या केसांना स्पर्शरोम अथवा दृढरोम असे नाव असून ते माणसाखेरीज इतर सर्व सस्तन प्राण्यांत आढळतात. हे केस अतिशय संवेदनाक्षम असून त्यांच्याभोवती तंत्रिकातंतूंचे (मज्जातंतूंचे) जाळे असते. त्यांच्याभोवती रक्ताने भरलेली गुहामय कोटरे (कप्पे) असतात व त्या कोटरांमुळे केसांचे उत्थापन होऊ शकते. हे स्पर्शरोम बहुधा ओठाभोवती असतात. दुसऱ्या प्रकाराचे केस संरक्षण आणि प्रतिरक्षण करतात. आकारमान, लांबी, ताठपणा इ. लक्षणांवरून त्या केसांचे गट बनविलेले आहेत. रक्षक केस जाडेभरडे आणि ताठ असतात, तर त्यांच्याखाली असलेले केस लहान, मऊ व सुरेख असतात.

रक्षक केसांची रूपे विविध असतात. उदा., डुकराच्या अंगावरील केस जाडेभरडे दृढरोम असतात, तर साळीच्या अंगावरील केस लांब, जाड, दंडगोलाकार आणि अणकुचीदार असतात. त्यांच्याखाली असलेले अधःस्थ केस हे रक्षक केसांच्या बुडापाशी असून ते फर अथवा लोकरीसारखे आखूड व मऊ असतात.

मानववंशशास्त्रामध्ये केसांची संरचना, वाढ, ठेवण आणि सूक्ष्म मांडणी यांचे फार महत्त्व मानलेले आहे. केसांची सर्वसाधारण संरचना सारखवट (सारखेपणा असलेली) असली, तरी वंशभेदामुळे तीमध्ये फरक आढळतात. म्हणून मानववंशाचे वर्गीकरण करताना केसांच्या ठेवणीला महत्त्व देतात.

हॉवेल या शास्त्रज्ञांनी १९४४ मध्ये मानवाचे तीन अथवा चार प्रकार कल्पिले. पीतवर्णी, कृष्णवर्णी आणि श्वेतवर्णी असे हे तीन प्रकार असून ऑस्ट्रेलियातील आदिवासींचा चौथा प्रकार मानण्यात आलेला आहे. पीतवर्णी लोकांचे केस लांब, सरळ, चरबट व पातळ असतात. त्यांचा छेज गोल असतो त्याच्या मध्यभागी मध्यक असून रंगाने तो काळा किंवा गडद पिंगट रंगाचा असतो. चिनी आणि अमेरिकन इंडियन लोकांत हा प्रकार दिसतो. कृष्णवर्णी लोकांचे केस आखूड, नागमोडी कुरळे आणि पुंजकेदार असतात. हा प्रकार नीग्रो लोकांत दिसतो. या केसाचा छेद लंबवर्तुळाकृती असून त्याच्या मध्यकामध्ये गडद काळ्या रंगाच्या कणिका भरपूर प्रमाणात असतात. श्वेतवर्णी लोकांचे केस मऊ, लांबसडक व कुरळे असतात. त्यांमध्ये काळ्या, पिंगट रंगाच्या कणिका असतात. क्वचित काही लोकांमध्ये ह्या केसाचा रंग, सोनेरीपासून पिंगट, लाल आणि काळ्यापर्यंतही असू शकतो. या केसांचा छेदही लंबवर्तुळाकृती असून त्यांतील रंजककणिकांचे प्रमाण कमीजास्त असू शकते. ऑस्ट्रेलियातील आदिवासींच्या चौथ्या प्रकारात केस चरबट, सरळ असून त्यांच्या रंग गडद पिंगट वा काळा असून त्यांत क्वचित कुरळेपणा दिसतो. या केसाचा छेदही लंबवर्तुळाकृती असतो.

कार्ये : केसांमुळे त्वचेच्या तापमानाचे नियंत्रण होते. थंड हवेमध्ये केसांची मुळे स्नायूच्या आकुंचनामुळे उचलली जाऊन केसांच्या आवरणाची जाडी वाढते व थंडीपासून संरक्षण होते. पुष्कळ प्राण्यांमध्ये केसांमुळे आघातापासून संरक्षण मिळते. केशमुळापाशी असलेल्या तंत्रिकाजालामुळे केस हे स्पर्शसंवेदनेचे उगमस्थान असू शकते. कित्येक प्राण्यांत केसांच्या रंगामध्ये फरक झाल्यामुळे परिस्थितिसदृश असा प्राण्याचा रंग होत असल्यामुळे त्याला संरक्षण मिळते. साळीच्या शललींमुळे शत्रूवर आक्रमण करणे तिला शक्य होते. कित्येक प्राण्यांमध्ये विशिष्ट ठिकाणांच्या केसांची वाढ ही दुय्यम लैंगिक लक्षणे असू शकतात. उदा., सिंहाची आयाळ, मनुष्याच्या दाढी-मिशा वगैरे.

आ. ४. पाच महिन्याच्या गर्भाच्या चेहऱ्यावरील व डोक्यावरील गर्भरोम.

उपयोग : केसांचे अनेक उपयोग आहेत. माणूस, गाय, बैल, उंट, बकरा, डुक्कर व घोडा यांचे केस उपयुक्त आहेत. केसांपासून ब्रश, कुंचले, गंगावने वगैरे गोष्टी तयार होऊ शकतात. उंटाच्या केसांपासून आणि घोड्याच्या शेपटीच्या केसांपासून कापड, गालिचे वगैरे विणण्यात येतात. केसांपासून तुरे, टोप, कृत्रिम दाढी-मिशा वगैरे कृत्रिम सौंदर्यप्रसाधने तयार करतात. स्त्री-पुरुषांच्या सौंदर्यप्रसाधनात केशभूषेला अतिशय महत्त्व असते [→ केशभूषा केसांचे टोप].

रोग : केस हे त्वचेचेच उपांग असल्यामुळे त्वचेच्या रोगांमध्ये केसांतही विकृती उत्पन्न होते. टक्कल पडणे ही विकृती नसून काही अंशी आनुवंशिक व काही अंशी हॉर्मोनांच्या (वाहिनीविहीन ग्रंथींतून स्रवणाऱ्या उत्तेजक स्रावांच्या) क्रियेवर अवलंबून असते. इसब, गजकर्ण, उपदंशाची (गरमीची) दुसरी अवस्था, काळपुळी व जीवनसत्त्वाची न्यूनता यांमुळे केस गळून पडतात. ज्वर, चिरकारी (दीर्घ कालीन) आजार, वृद्धावस्था या प्रकारांतही केस गळून पडण्याची प्रवृत्ती दिसून येते.

केसांच्या मुळांमध्ये उवांचा संसर्ग होऊ शकतो तसेच त्वचेच्या अनेक प्रकारांच्या कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे होणाऱ्या) रोगांतही संसर्ग झाल्यामुळे केसांची विकृती आढळते. कवकसंसर्गामुळे केसांत कोंडा निर्माण होतो [→ कवकसंसर्ग रोग].

स्थानिक केशनाशामुळे डोक्यात व चेहऱ्यावर केशविहीन असे भाग दिसतात त्यांना ‘चाई लागणे’ असे म्हणतात. तसेच एखाद्या विशिष्ट जागेतील केसच तेवढे पांढरे होतात. या प्रकारचे कारण अजून अज्ञात आहे. काही वेळा चाई लागलेल्या जागी पुढे आपोआप केस येतात [→ चाई].

पांढरे केस काळे करणे यासाठी अनेक प्रकारचे कलप वापरण्यात येतात, परंतु त्यांच्यामुळे वरचे केस तेवढे काळे होतात, केशमूलात फरक पडत नाही. तसेच टक्कल पडले असता अनेक औषधांचा उपयोग केला जातो, परंतु त्यांपैकी एकही पूर्णपणे परिणामकारक असल्याचे आढळून आलेले नाही.

पहा : त्वचा फर लोकर सौंदर्यप्रसाधने.

संदर्भ: 1. Lyne, A. G. Short. B. F., Eds. Biology of the Skin and Hair Growth, New York, 1965.

2. Montagna, W. Ellis, R. A., Eds. The Biology of Hair Growth, New York, 1958.

कर्वे, ज. नी. ढमढेरे, वा. रा.