खुले रंगमंदिर : खुल्या रंगमंदिराचा विचार दोन दृष्टिकोनांतून केला पाहिजे : पहिला दृष्टिकोन रंगमंदिराच्या उत्क्रांतीच्या इतिहासाचा आणि दुसरा त्याच्या सद्यःकालीन वापरातील इष्टानिष्टता व गुणदोष यांचा.

जगातील विविध संस्कृतींमध्ये रंगभूमीचा विकास त्यांच्या आदिपर्वातील धार्मिक विधींपासून झालेला दिसतो. कालौघाबरोबर विधींचे स्वरूप सूक्ष्म तपशिलांच्या बाबतीतही निश्चित झाले, सहभागी होणारी माणसे व प्रेक्षक हे दोन घटक वेगवेगळे दिसू लागले आणि रंगभूमीच्या विकासास प्रांरभ झाला. धार्मिक विधींमध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रवेशासाठी दरवाजे, पार्श्वभूमी, रंगमंच, रंगणे व कपडे बदलणे यांसाठी जागा, सामानसुमान ठेवण्यासाठी जागा इ. गोष्टींची गरज भासू लागली. प्रेक्षकांना आपापल्या सामाजिक स्तरानुसार बसण्याच्या जागेची गरज वाटू लागली. या विकासावस्थेमधील प्रेक्षकांची प्रचंड संख्या व विधी पाहण्यातील त्यांची धर्मश्रद्धा यांमुळे हे खेळ बंद जागेत करणे अशक्य होते. त्यामुळे देवळांची आवारे यासाठी वापरात येऊ लागली. यातूनच खुल्या रंगमंदिरांची सुरुवात झाली.

इतिहासाला माहित असलेले पहिले खुले रंगमंदिर म्हणजे अथेन्समधील डायोनिससचे रंगमंदिर. ते इ. स. पू. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले गेले. इ. स. पू. ३००० च्याही पूर्वी ईजिप्तमध्ये नाटके होत. पण त्यावेळी तेथे रंगमंदिरे होती किंवा नाही, याविषयी काहीही पुरावा उपलब्ध नाही. ग्रीक रंगमंदिरे आणि त्यांचे अनुकरण करणारी रोमन संस्कृतीतील रंगमंदिरे यांच्या रचनेमध्ये डिथिरॅब (ज्यामधून पुढे ग्रीक शोकात्मिका विकसित झाली) या धार्मिक विधीचे पडसाद उमटलेले दिसतात. या विधीमध्ये एक वक्ता व नर्तक यांचा वृंद असे आणि त्यांच्याभोवती वर्तुळाकारात प्रेक्षक असत. या परंपरेमुळे ग्रीक रंगमंदिरामधील अभिनयक्षेत्र वर्तुळाकार असे व प्रेक्षागृहही वर्तुळाकार असे. या रंगमंदिरात एका वेळी पंधरा ते सतरा हजार प्रेक्षक बसत. प्रेक्षकांची आसने टेकड्यांच्या उतारावर असत व अभिनयक्षेत्र पायथ्याशी असे. अभिनयक्षेत्राच्या पार्श्वभूमीस एक इमारत असे. तिच्यामध्ये नेपथ्याचे सामान असे, अभिनेते तेथूनच अभिनय क्षेत्रात येत आणि काम नसले, की तेथेच जाऊन बसत. वृंदाच्या प्रवेशाचे व निर्गमनाचे मार्ग मात्र वेगळे असत.

डायोनिससचे प्राचीन खुले रंगमंदिर, अथेन्स.

या खुल्या रंगमंदिरांच्या रचनावैशिष्ट्यांचा ग्रीक नाटके व ती सादर करण्याची पद्धत यांवर परिणाम झालेला दिसतो. प्रचंड प्रेक्षकसमूहामुळे कृती व शब्दोच्चार यांबाबतीत सूक्ष्मतेपेक्षा ढोबळपणा, शैलीदारपणा व परिणामकारकता यांना महत्त्व आले. त्यामुळे पात्रवैशिष्ट्य दर्शविणारे मुखवटे वापरले जात  अभिनेत्यांची उंची व जाडी वाढविण्यासाठी उंच लाकडी पादत्राणे व कपड्यांचे भरताड (पॅडिंग) यांचा उपयोग करण्यात येई. नाट्यप्रयोगाचा कालावधी दीर्घ असल्यामुळे नृत्यगायनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होई आणि नाटककार नाट्यत्रयी लिहीत. दर्शनी पडदा, दृश्यबदल इत्यादींना वाव नसल्यामुळे रंगमंचावर घटना प्रत्यक्ष दाखविण्याऐवजी त्यांचे निवेदन केले जाई. म्हणून मोठा आवाका, भारदस्तपणा, भव्योदात्तता व भावनांची तीव्रता इ. वैशिष्ट्ये ग्रीक शोकात्मिकेमध्ये, तर विडंबन, विदूषकी चाळे, उपहास, संगती इ. वैशिष्ट्ये ग्रीक सुखात्मिकेमध्ये आढळतात.

ग्रीक संस्कृती प्रगत असल्यामुळे ग्रीसला जिंकणाऱ्या रोमन समाजावर तिचा प्रभाव पडला. रोमनांनी ग्रीक रंगमंदिराचा मूलभूत आराखडा स्वीकारला आणि त्याच्यात आपल्या गरजांप्रमाणे आवश्यक ते बदल केले. अभिनयक्षेत्राची उंची कमी करून ते वृंदक्षेत्राला पायऱ्यांनी जोडले आणि ते प्रेक्षागृहाच्या शक्य तितक्या जवळ नेले. वृंदक्षेत्र फरसबंदी केले व त्याभोवती ठेंगणी भिंत उभारली. त्यामुळे खऱ्याखुऱ्या पशुयुद्धांच्या वेळी प्रेक्षकांना संरक्षण मिळे आणि काही प्रसंगी त्या जागेत पाणी भरून जलयुद्धे दाखविता येत. अभिनयक्षेत्राच्या पार्श्वभूमीस असलेल्या इमारतीची दर्शनी भिंत चित्रशिल्पादींच्या अलंकृत तपशिलांनी सजविण्यात येई. रोमन काळातच दर्शनी पडदा, नेपथ्य व त्यातील प्रसंगानुरूप बदल इत्यादींचा प्रारंभ झाला. पार्श्वभूमीच्या इमारतीत तीन दरवाजे असत आणि त्यांचा प्रवेश व निर्गमन यांसाठी उपयोग होई. स्थिर प्रवेश-निर्गमनामुळे बहुतेक रोमन नाटके पात्रांच्या घरांसमोर किंवा रस्त्यावर घडतात. रोमन रंगमंदिरे सपाट जमिनीवर असल्यामुळे लाकडी (आणि नंतरच्या काळात दगडी) घोडे उभारून त्यांच्यावर प्रेक्षकांच्या आसनांची व्यवस्था करावी लागे, त्यामुळे प्रेक्षागृहे लहान व अर्धवर्तुळाकृती झाले. या आकारामुळे बहुतेक प्रेक्षकांना थंडीवाऱ्यांपासून आपोआप संरक्षण मिळे. हळूहळू ताडपत्र्यांनी प्रेक्षागृह झाकण्याची प्रथा सुरू झाली. काही रोमन रंगमंदिरे चौकोनी होती व त्यांच्यावर लाकडी छपरे होती.


रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर ही रंगमंदिरे ओस पडली. ख्रिस्ती धर्माचा नाटकांना कडवा विरोध होता. पण मध्ययुगाच्या उत्तरार्धात ख्रिस्ती धर्मविधीतूनच परत रंगभूमीच्या विकासाला चालना मिळाली. नाटक चर्चमधून हळूहळू चौकात आले व विविध व्यवसायांच्या संघटनांनी त्याला आश्रय दिला. इटली, फ्रान्स व काही शतकांनंतर इंग्लंड येथे रंगभूमीच्या प्रगतीमध्ये संगीतनृत्यनाट्यादी दरबारी आविष्कार व कॉमेडिया-डेल-आर्टसारख्या लोकनाट्यप्रकारांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. पैकी संगीतनृत्यनाट्यादी (ऑपेरा, बॅले, मास्क इ.) आविष्कार आच्छादित रंगमंदिरात किंवा दिवाणखान्यात सादर केले जात, तर लोकनाट्यप्रकार चौक, बाजार, खाणावळी इ. ठिकाणी तात्पुरत्या उभारलेल्या लाकडी चौथऱ्यावर होत. त्यांचे प्रेक्षक चौथऱ्याभोवती उभेच असत. इटलीतील मध्ययुगीन रंगमंदिरे बंदिस्त व यांत्रिक क्लृप्त्यांनी युक्त होती. इंग्लंडमध्ये चारी बाजूंना इमारत व मध्ये अनाच्छादित चौक, या प्रकारच्या खाणावळींच्या रचनेतून रंगमंदिराच्या वास्तूचा विकास झाला. चौकाची एक बाजू म्हणजे लाकडी चौथऱ्याचा अनाच्छादित रंगमंच. त्याच्या पार्श्वभूमीच्या इमारतीच्या गच्चीचाही अभिनयक्षेत्र म्हणून उपयोग होई. चौकाच्या उरलेल्या तीन बाजूंना प्रेक्षकसज्जे असत. गरीब प्रेक्षक चौकातच उभे राहत, तर काही अमीर-उमराव रंगमंचावरच बैठक मारत. नेपथ्य सूचक असे.  लाकडी चौथऱ्याचे अभिनयक्षेत्र व त्यामागील इमारतीचे तळमजल्याचे अभिनयक्षेत्र यांमध्ये पडदा असे. नाटके दुपारी सुरू होत व सायंकाळी संपत. जरूर तेव्हा मशाली, टेंभे इत्यादींचा उपयोग केला जाई. स्वॉन, ग्लोब इ. रंगमंदिरे या प्रकारची होती. शेक्सपिअरची बहुसंख्य नाटके याच रंगमंदिरांतून सादर केली गेली. परंतु सतराव्या शतकाच्या पहिल्या दशकातच अधिकाधिक नाटके उमरावांच्या दिवाणखान्यातच होऊ लागली.

पौर्वात्य रंगमंदिरे खुली होती, असे दिसत नाही. ⇨ काबुकी  व ⇨ नो नाट्य  या जपानी नाट्यप्रकारांची रंगमंदिरे आच्छादित आणि अधिक प्रगत होती. भरताच्या नाट्यशास्त्रावरून प्राचीन भारतीय रंगमंदिरे आच्छादित असावी, असे दिसते. अर्थात नाट्याचे लोककला म्हणून असलेले विविध आविष्कार खुल्या जागीच होत आले आहेत, यात शंका नाही.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी ⇨ अडॉल्फ आप्प्या  व गॉर्डन क्रेग  इत्यादींनी रंगमंच आणि रंगमंदिर यांबद्दलच्या दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल घडवून आणले. त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांत व चळवळींत खुल्या रंगमंदिराचाही समावेश होतो. जर्मनी, इंग्लंड, स्वित्झर्लंड (व भारतसुद्धा) इ. देशांत खुली रंगमंदिरे बांधण्यात आली. आजही दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यविद्यालयातील प्रायोगिक रंगमंदिर खुलेच आहे. या विद्यालयाने अंधायुगसारख्या नाटकांचे खेळ मुद्दाम खुल्या मैदानात केले.

१९४२ च्या शतसांवत्सरिक उत्सवानंतर मराठी रंगभूमीच्या पुनरुत्थानाचे जे प्रयत्न डॉ. अ. ना. भालेरावांच्या प्रेरणेने सुरू झाले, त्यांमध्ये खुल्या रंगमंदिराने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तात्पुरत्या उभारलेल्या खुल्या रंगमंदिरामध्ये नाट्यमहोत्सव होऊ लागले. मुंबई मराठी साहित्यसंघमंदिर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थांनी खुली रंगमंदिरे सुरू केली. पक्क्या स्वरूपात बांधलेली खुली रंगमंदिरे मुंबईमध्ये धोबीतलाव (रंगभवन-महाराष्ट्र शासन) आणि वांद्रे (बालगंधर्व रंगमंदिर-मुंबई महानगरपालिका) येथे आजही आहेत. पुणे महानगरपालिकेनेही कुस्तीचे मैदान आणि खुले रंगमंदिर असे एक संयुक्त स्थळ उभे केले होते. (१९६२ च्या पानशेत प्रलयात ते वाहून गेले). याच धर्तीवर महाराष्ट्रात अनेक गावी कामचलाऊ खुली रंगमंदिरे उभी राहिली.

खुल्या रंगमंदिरांना खर्च कमी येत असल्यामुळे आणि त्यांत अधिक प्रेक्षकांची सोय होत असल्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांना खुले रंगमंदिर हे एक वरदानच ठरते. नियमित ऋतुमानामुळे ते वर्षातून सातआठ महिने तरी वापरता येते. नाटकांबरोबरच सभा, संमेलने, उत्सव यांसाठीही त्यांचा उपयोग होतो. अर्थात दिवसा व पावसाळ्यात ते निरुपयोगी ठरते आणि त्यात चांदण्या रात्री नाटकातील प्रकाशयोजनेची परिणामकारकता कमी होते हे खरे पण नाट्याभिवृद्धीसाठी आवश्यक असलेले सामूहिक उत्सवी वातावरण निर्माण करणे व नाटक सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे या दोन महत्त्वाच्या गोष्टी खुली रंगमंदिरे साध्य करतात.

पहा: रंगमंच रंगमंदिर.

संदर्भ : 1. Beate, W. The Roman Stage, London, 1950.

            2. Craig, E. G. On the Art of the Theatre, London, 1962.

            3. Leacreft, Helen and Richard, The Theatre, London, 1958.

            4. Southern, Richard, The Seven Ages of the Theatre, London, 1962.

परांजपे, प्र. ना.