कुबेर — २ : (प्लुटो). हा सूर्यकुलातील सर्वांत बाहेरची कक्षा असलेला म्हणजे तूर्त तरी ज्ञात असलेल्यांपैकी सर्वांत दूरचा ग्रह आहे. तो नुसत्या डोळ्यांनी तर दिसत नाहीच, पण मोठ्या दूरदर्शकातूनही ठिपक्यासारखाच दिसतो. १९३० मध्ये याचा शोध लागला. प्रजापतीच्या (यूरेनसाच्या) हालचालींमध्ये सूक्ष्म दोष आढळून आला म्हणून वरुणाचा (नेपच्युनाचा) शोध लागला, तरीही त्या दोषाची पूर्णपणे उपपत्ती लागली नाहीच. म्हणून वरुणाच्या कक्षेबाहेर कक्षा असणारा आणखी एखादा दूरचा ग्रह असावा असा संशय १८७९ च्या सुमारास फ्रान्समधील ज्योतिर्विदांना आला होता. असा ग्रह असल्याचे गृहीत धरून गणिताने त्याची कक्षा, स्थान वगैरे अनुमाने काढण्यासाठी पर्सिव्हल लोएल यांनी पुष्कळ कष्ट घेतले. पिकरिंग यांनीसुद्धा स्वतंत्रपणे अशीच अनुमाने काढली. लोएल यांच्या मृत्यूनंतर १४ वर्षांनी आणि वरुणाच्या शोधानंतर ८४ वर्षांनी लोएल वेधशाळेतील एक साहाय्यक टाँबा यांना याच संशोधनासाठी बनविलेल्या तेरा इंची दूरदर्शकातून एका छायाचित्रातील मिथुन तारकासमूहात १८ फेब्रुवारी १९३० रोजी एक ठिपका आढळला. नंतर त्यांनी वेध घेणे चालूच ठेवले. त्याचे अंतर, व्यास वगैरेसंबंधी संशोधन करण्यात आले आणि १३ मार्च १९३० रोजी म्हणजे लोएल यांच्या जन्मदिनी आणि प्रजापतीच्या संशोधनदिनी कुबेराचा शोध लागल्याचे जाहीर करण्यात आले.
या ग्रहाचा अगदी अलीकडेच शोध लागलेला असल्याने त्याच्या उपलब्ध माहितीत पुष्कळ अनिश्चितपणा आहे. त्याची ⇨ प्रत सु. १४ असून बिंबाचा कोनीय व्यास ०·२ सेकंद इतका आहे. त्याचे सूर्यापासून सरासरी अंतर ६०० कोटी किमी. असून अपसूर्य बिंदूत (कक्षेत सूर्यापासून सर्वांत दूर असताना) तो ७३६ कोटी किमी. दूर असतो व उपसूर्य बिंदूत (कक्षेत सूर्यापासून सर्वांत जवळ) असताना तो ४४६ कोटी किमी. दूर असतो, म्हणजे वरुणाच्याही कक्षेच्या थोडासा आत येतो. अशा स्थितीत तो १९८९ च्या सुमारास येईल तेव्हा त्याची अधिक माहिती उपलब्ध होईल. याच्या कक्षेची विमध्यता (वर्तुळाकार कक्षेपासून होणारे विचलन) सर्व ग्रहांत जास्तीत जास्त म्हणजे ०·२४७ इतकी आहे. (बुधाची विमध्यता ०·२०६). तसेच याच्या कक्षेचा क्रांतिवृत्ताशी (सूर्याच्या वार्षिक भासमान गतिमार्गाशी) होणारा कोन सर्व ग्रहांत जास्तीत जास्त म्हणजे १७·१० आहे. (बुधाचा ७०). यामुळे वरुण–कक्षा व कुबेर–कक्षा एकमेकींस छेदत नाहीत. असाधारण विमध्यता व कक्षेचा कल यांवरून कुबेर हा ग्रह पूर्वी वरुणाचा उपग्रहच असून तो थोडक्यात निसटून ग्रहमालिकेत आला असावा, असे अनुमान काढण्यात येते. याचा अक्षभ्रमण काल (स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्याचा काळ) ६·३ दिवस आणि कक्षीय परिभ्रमण काल (सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा काळ) २४८·४ वर्षे इतका आहे. याचा व्यास व वस्तुमान यांबाबत फारच मतभेद आहेत. मात्र व्यास मंगळापेक्षा कमी परंतु बुधापेक्षा जास्त सु. ६,००० किमी. तापमान ५०० के. (केल्व्हिन निरपेक्ष तापक्रमानुसार) व वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या आसपास असावे असा अंदाज व्यक्तविला जातो. या मापनांवरून त्याची घनता पृथ्वीच्या घनतेच्या दसपट आहे, असा निष्कर्ष निघेल व तो पटण्यासारखा नाही. एकंदरीत कुबेर हा ग्रह गुरु–गटातील कमी घनतेच्या मोठ्या ग्रहांपैकी नसून लहान व जास्त घनतेच्या पृथ्वी–गटातील ग्रह आहे.
याचा वेधाने आलेला व्यास व गणिताने आलेले वस्तुमान यांतील विसंगतीवरून सूर्यकुलात कुबेराच्या पलीकडे अतिदूर एखादा दुसरा ग्रह असावा अशी शास्त्रज्ञांना शंका आहे.
याला उपग्रह असल्याचे अजून तरी आढळलेले नाही.
काजरेकर, स. ग.
“