खडू : चॉक (सूक्ष्मकणी व सापेक्षत: मऊ असलेला चुनखडक), मेण, विशिष्ट प्रकारची माती, पाणी इ. पदार्थांचे मिश्रण साच्यात ओतून तयार केलेल्या कांडीला खडूची कांडी किंवा नुसतेच खडू म्हणतात. खडूमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिससारखा मुख्य घटक, केओलिनासारखे भरणद्रव्य, रंजकद्रव्ये आणि बंधकद्रव्य ही प्रामुख्याने असतात. फळ्यावर लिहावयाच्या खडूच्या कांड्या सु. ८ सेंमी. लांब असून त्या एका बाजूस किंचित निमुळत्या असतात. ह्या तयार करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये इतर आवश्यक ते पदार्थ मिसळून त्यांचे पातळ मिश्रण साच्यात ओततात. मिश्रण थोड्याच वेळात घट्ट होते. नंतर साचा उघडून कांड्या काढून घेऊन हवेत वाळवितात. रंगीत खडूसाठी त्यात रंजकद्रव्ये मिसळतात. कपडा बेतताना कापडावर खुणा करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या खडूमध्ये साबण, ग्लिसरीन, मेण इ. मिसळतात. हा खडू चपट्या वडीसारखा असून त्याने केलेल्या खुणा सहज पुसत नाहीत. खडूच्या मिश्रणात मेण, साबण, जवसाचे तेल, रंजकद्रव्ये इ. मिसळून चित्रे काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगीत खडूच्या कांड्या बनवितात. काचेच्या पृष्ठभागावर खुणा करण्यासाठी बनविलेल्या कांड्या पेन्सिलीच्या स्वरूपात मिळतात. त्यामध्ये मेण, जवसाचे तेल आणि रंजकद्रव्ये असतात. दगड, धातूंचे पत्रे, कातडी इत्यादींवर खुणा करण्याकरिता वापरता येतील अशा खडूच्या कांड्या मिळतात. त्यांत साबण, मेण, रेझीन, काजळी इ. असतात. अशा खडूंनी केलेले आरेखन शिलामुद्रणात वापरतात. वस्तूंवर केलेल्या खुणा, काम झाल्यावर संपूर्णपणे पुसून किंवा धुवून टाकता येतील अशा तऱ्हेच्या कांड्या बनविण्याचे प्रयत्न चालू आहेत. विविध प्रकारच्या खडूंच्या कांड्या व वड्या बनविणे हा कुटिरोद्योग म्हणून भारतात सर्व राज्यांत चालू आहे.