कीथ, सर आर्थर : (५ फेब्रुवारी १८६६ – ७ जानेवारी १९५५). ब्रिटिश शारीरशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील ॲबर्डीन येथे झाला. ॲबर्डीन, लंडन व लाइपसिक येथे त्यांचे शिक्षण झाले. वैद्यक, शास्त्र व कायदा या विषयांमध्ये त्यांनी सर्वोच्च पदव्या मिळविल्या. लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स, येथे प्राध्यापक म्हणून त्यांची १९०८ मध्ये नेमणूक झाली. रॉयल अँथ्रॉपॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून १९१२-१४ या काळात त्यांनी काम केले. १९१७–२३ या काळात व नंतर १९३०-३३ मध्ये अँबर्डीन येथे ते प्राध्यापक होते.
फ्लॅक या शास्त्रज्ञांबरोबर काम करून हृदयाचे स्पंदन जेथे प्रथम सुरू होते ते ठिकाण त्यांनी शोधून काढले व त्याचे वर्णन करून त्याला सायनोऑरिक्यूलर नोड (नीलाअलिंद-पर्व) असे नाव दिले. तसेच त्यांनी इस्राएल, यूरोप व उत्तर आफ्रिकेत सापडलेल्या अश्मींभूत (शिळारूप झालेल्या) अस्थींवरून मानवी विकासाबद्दल संशोधन केले.
इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ अँथ्रॅपॉइड एप्स (१८९६), द ह्यूमन बॉडी (१९१२), अँटिक्किटी ऑफ मॅन (१९१५),नॅशनॅलिटी अँड रेस (१९२०), रिलिजन ऑफ ए डार्विनिस्ट (१९२५), एन्शंट टाइप्स ऑफ मॅन (१९११), न्यू डिस्कव्हरीज रिलेटिंग टू अँटिक्किटी ऑफ मॅन (१९३१), डार्विनिझम अँड इट्स क्रिटिक्स (१९३५), एसेज ऑन ह्यूमन इव्होल्यूशन (१९४६), न्यू थिअरी ऑफ इव्होल्यूशन (१९४८) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. १९२१ मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला. ते डाऊने (केंट) येथे मृत्यू पावले.
ढमढेरे, वा. रा.