घंटा : संगीत दृष्ट्या एक आघात वाद्य व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे प्रतीकात्मक उपकरण. घंटेचा आकार सामान्यतः पालथ्या पेल्यासारखा असतो. ती टांगण्यासाठी तिच्या वरील भागाला कडी असून आतील पोकळ भागात एक लोळी लोंबत असते. ही लोळी घंटेच्या काठावर आपटली की तिच्यातून नाद निघतो.
घंटेची निर्मिती प्रथम आशियातच झाली असावी, असे अभ्यासकांचे मत असून, ब्राँझ युगात ती प्रथम बनल्याचे उल्लेख सापडतात. थाळ्या किंवा भांडी यांच्यापासून निघणारा नाद ऐकून त्यापासून मनोरंजन किंवा करमणूक होते अथवा दूर असणाऱ्यांना इशारा अगर सूचना देण्यासाठी हा नाद उपयुक्त आहे असे जेव्हा मानवाच्या ध्यानी आले, तेव्हा घंटेची निर्मिती झाली. प्राथमिक स्वरूपाची घंटा म्हणजे एक धातूची सपाट थाळी असून ती एका ठोक्याने बडविण्यात येई. पुढे मात्र गोलाकार भांड्याच्या आकाराच्या घंटा तयार होऊ लागल्या. त्या वेळी घंटेचा आकारही लहान असे. ती हाताने मागेपुढे हलवून किंवा लाकडी हातोडीने वाजवीत. मध्ययुगातील घंटा धातूंच्या पत्र्यापासून घडविलेल्या असून त्यांचा आकार बहिर्वक्र व उंची सु. १३ ते २१ सेंमी. (५ ते ८ इंच) असे. उत्तरोत्तर त्यात सुधारणा होत गेली आणि नवव्या शतकात घंटेचा आकार मोठा झाला. वाजविताना घंटा फुटू नये म्हणून तिच्या कडेची जाडीही वाढविण्यात आली. नंतर तेराव्या शतकात घंटेचा आकार अंतर्वक्र झाला व आजच्या घंटेच्या आकाराच्या जवळ आला आणि शेवटी १४०० च्या सुमारास आजची सुधारलेली ओतीव घंटा तयार झाली. पंधराव्या शतकात नादमधुरता आणि आवाजाची शुद्धता या गोष्टींकडे लक्ष देऊन पश्चिम यूरोपमध्ये घंटा ओतल्या जाऊ लागल्या.
चीन, जपान, ब्रह्मदेश, भारत व ईजिप्त येथील प्राचीन संस्कृतीत घंटेचा उपयोग निरनिराळ्या स्वरूपांत केला जात असे. इ. स. पू. दहाव्या शतकात सॉलोमन राजाने आपल्या देवळावर सोन्याच्या घंटा टांगल्याचा उल्लेख सापडतो, तर इ. स. च्या पहिल्या शतकात ऑगस्टस राजाने जूपिटरच्या देवळासमोर मोठी घंटा टांगली होती, असे म्हणतात. बॅबिलनजवळ सापडलेली घंटा ३,००० वर्षांपूर्वीची आहे. यूरोप किंवा दक्षिण-पूर्व आशियातील काही देशांत भव्य घंटा आढळून येतात. पीकिंगमध्ये एका मठात सु. ४८ मे. टन (सु. ५३ टन) वजनाची घंटा असून तिच्यावर बुद्धाची उपदेश-वचने कोरलेली आहेत. मॉस्कोमधील क्रेमलिन राजवड्यात एक फार मोठी घंटा आहे. ती १७३३ मध्ये बनविण्यात आली असून ती जगातील सर्वांत मोठी मानण्यात येते. तिचे वजन सु. १७४ मे. टन (१९३ टन), उंची सु. ६ मी. (१९ फूट), व्यास सु. ७ मी. (२२ फूट) व परीघ सु. २० मी. (६३ फूट) आहे. तिचा सु. १० मे. टन (११ टन) वजनाचा तुकडा तुटलेला आहे. ही घंटा म्हणजे एक लहानसे प्रार्थना मंदिरच असून तुटलेला भाग म्हणजे त्याचा दरवाजा वाटतो. या घंटेचे नाव ‘झार कोलेकोल’ म्हणजे ‘घंटेची सम्राज्ञी’’ असे आहे. १७३७ मध्ये ही घंटा वाजवितानाच फुटली, असा निर्देश आढळतो. मॉस्कोमधील दुसरी एक घंटा सु. १०० मे. टन (११० टन) वजनाची आहे. सध्या उपयोगात असलेली ही सर्वांत मोठी घंटा होय. ही १८१९ साली बनविण्यात आली. ब्रह्मदेशात भिंगूनची घंटा सु. ९१,५२६ किग्रॅ. (२,०१,६०० पौंड) वजनाची व सु. ५ मी. (२०३ इंच) व्यासाची आहे, तर जर्मनीतील कोलोन कॅथीड्रलमधील ‘सेंट पीटरची घंटा’ सर्वांत नादघन असून ती सु. २२ मे. टनाची (२५ टन) आहे. ब्रिटनमधील लंडन येथे लोकसभागृहाच्या मनोऱ्यातील ‘बिगबेन’ नावाची घंटा इतिहासप्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धातील पडझडीनंतर तिची पुनर्बांधणी करण्यात आली. अमेरिकेत न्यूयॉर्क येथील ‘रिव्हरसाइड चर्च’ मधील घंटाही प्रसिद्ध आहे. तिची बनावट १९३० सालची असून वजन सु. १७ मे. टन (१८.५ टन) आहे.
सामान्यपणे तांबे व जस्त यांचे ३ : १ किंवा ४ : १ या प्रमाणात मिश्रण करून घंटा बनवितात. घंटेतून इष्ट नादध्वनी येण्यासाठी तिची वरची रुंदी, उंची व जाडी यांचे प्रमाण आणि व्यास आधीच निश्चित करतात. घंटेतून दोन प्रकारचे नाद अपेक्षित असतात : (१) स्थायीस्वर (की नोट), (२) गुंजन स्वर (हम नोट). पुष्कळदा घंटा तयार करताना अनेक धार्मिक विधी करण्यात येऊन तिचे नामकरणही केले जाते तसेच तिच्यावर पवित्र धार्मिक वचनेही कोरतात.
भारतीय घंटा काशाची किंवा पितळेची असते. हिंदू संस्कृतीमध्ये घंटावादन शुभकारक समजले जाते. बौद्ध व जैन संप्रदायांतील अर्चनापद्धतीमध्येही घंटा आवश्यक मानली जाते. देवपूजेतील घंटेचे कास्यताल, ताल, घंटिका, जयघंटिका, क्षुद्रघंट व क्रम असे भेद आहेत. घंटा ही कित्येक देवतांचे आयुधही आहे.
भारतीय घंटेचे काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असे : वज्रघंटा– हिच्यावर वज्राकृती असून ही भौतिक व आध्यात्मिक विश्वाच्या एकतेचे प्रतीक मानली जाते गरुड घंटा– हिच्यावर गरुडाकृती असते. श्रीविष्णूला ही घंटा फार प्रिय आहे. ही सर्प, अग्नी आणि वीज यांपासून अभय देणारी मानतात. घंटानाद सर्व देवतांना प्रसन्न करणारा आणि असुरादिकांना पळवून लावणारा आहे, अशी समजूत असून सर्जनसामर्थ्य घंटानादाने सूचित होते, असे मानतात. भारतातील काही घंटा फार मोठ्या आकाराच्या आहेत. उदा., नासिक येथील नारो शंकराची घंटा. बौद्ध धर्मातही घंटेला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. बौद्धधर्मीय लोक स्तूपघंटा पवित्र मानतात. ही घंटा स्तूपाकार असते.
घंटा देवळाच्या गाभाऱ्यात, सभामंडपात वा द्वारात टांगलेली असते. देवदर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाने देवळात प्रवेश करताना घंटानाद करून देवाला आपल्या आगमनाची सूचना करावयाची असते, असा संकेत आहे. तसेच देवपूजेमध्येही काही उपचारांच्या वेळी घंटानाद करावयाचा असतो.
ख्रिस्ती प्रार्थनामंदिराच्या मनोऱ्यातही घंटा टांगलेली असते. प्रार्थनेची सूचना देण्यासाठी ती वाजवितात, तसेच जन्म, मृत्यू, युद्धातील विजय किंवा पराभव, परकीय आक्रमण, आग आणि महापूर अशा घटनांची सूचना देण्यासाठीही घंटानाद करण्याची प्राचीन रूढी आहे. फक्त इस्लाम धर्मात मात्र घंटेचा वापर टाळलेला आहे. काही आदिम जमातींत घंटानाद त्यांच्या मंत्रतंत्रात्मक उपचाराचा एक भाग असल्याचे आढळते.
गाई-म्हशी, घोडे, उंट, हत्ती वगैरे पाळीव प्राण्यांच्या गळ्यातही घंटा बांधण्याची पूर्वापार पद्धत आहेच. त्यामुळे त्यांचे संरक्षण होते, अशी कल्पना आहे. काही अलंकारांत व दागदागिन्यांतही बारीक बारीक अशा नादमधुर घंटिकांच्या झुपक्यांचा उपयोग केला जातो.
अलीकडे घंटेचे आकार-प्रकार व उपयोग यांबाबत बरेच बदल घडून आले आहेत. हाताने वा स्प्रिंगच्या साहाय्याने वाजविण्यात येणारी टेबलावरील घंटा, पडद्याला लावलेली किंवा दारावरील घंटिका माला अथवा ⇨विद्युत् घंटा हे सर्व त्यांचेच आविष्कार आहेत. १९३० पासून इलेक्ट्रॉनिकीमुळे घंटेमध्ये घडून आलेले बदल वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे आहेत. घंटानादाची निर्दोषता व नादमाधुर्य हा त्यामागील मूळ उद्देश आहे. तसेच घंटानिर्मिती खर्चाच्या दृष्टीने स्वस्त पडावी आणि घंटेची बनावट आकर्षक व अद्ययावत असावी हेही उद्देश त्यामध्ये अनुस्यूत आहेत. आकारवैचित्र्य, नादमाधुर्य आणि सहजसुलभता या गुणांमुळे आज घंटेचा वापर अग्निशामकदले, रेल्वेस्थानके, विद्यालये, कारखाने इ. ठिकाणी सर्रास होऊ लागला आहे.
सांगितिक द्दष्ट्या घंटा वाद्य म्हणून वापरले जाण्याचे तीन प्रमुख प्रकार रूढ आहेत. घंटेमधील लोळी फक्त तिच्या बाजूंवर आपटली जाऊन ध्वनिनिर्मिती होते, त्यास इंग्रजीत ‘चाइम’ असे म्हणतात. पाच ते बारा घंटा संपूर्ण वर्तुळात फिरून वाजतात, त्यास ‘घंटामंडलनाद’ (रिंगिंग) म्हणतात. पाच घंटा असल्यास त्यांच्या वर्तुळक्रमाचे १२० प्रकार शक्य होतात. अशा प्रकारे केलेल्या घंटावादनास इंग्रजीत ‘चेंज रिंगिंग’ म्हणतात. या क्रमबदलाचेही काही प्रकार निश्चित झाले असून त्यांस ‘ग्रँडसायर ट्रिपल्स’, ‘बॉब मेजर’ इ. नावे आहेत. या तऱ्हेचे घंटावादन करणाऱ्यांच्या संस्था वा संघटना असून इंग्लंडमधील सोसायटी ऑफ कॉलेज यूथ्स ही संस्था १६३७ साली स्थापन झालेली आहे.
यूरोप खंडात ‘कॅप्यिल्यन’ हा तिसरा घंटावादन प्रकार आढळतो. बेल्जियम आणि हॉलंडमध्ये विशेषेकरून आढळणाऱ्या या प्रकारात सत्तरपर्यंत कितीही घंटांची मालिका ऑर्गनमधील मॅन्युअल आणि पेडलसारख्या भागांनी कुशल वादकांकरवी वाजवली जाते. साध्या स्वरधुनी आणि स्वरसंवाद या तत्त्वांवर आधारलेल्या सुरावटीही यावर वाजविता येतात. सध्या या वादनप्रकाराचा प्रघात वाढता असून त्यासाठी स्वतंत्र अशा स्वररचनाही केल्या जात आहेत.
याशिवाय नलिकाघंटाही प्रचारात आहेत. विवक्षित लांबीच्या धातूच्या नळ्यांवर कातड्याने वेष्टिलेल्या वा साध्या हातोड्याने आघात करून नलिकाघंटेचे वादन होते. पाश्चात्त्य वाद्यवृंदांतील आघात वाद्यांत ही नलिकाघंटा अंतर्भूत असते. आता यांचे इलेक्ट्रॉनिकी स्वरूपही प्रचारात आहे.
घंटा या वाद्याचा शेवटचा प्रकार हस्तघंटा हा होय. एक सप्तक वा अधिक स्वरांच्या छोट्या घंटा असून त्यांतील लोळी अशा तऱ्हेने बांधलेली असते, की तिची हालचाल एकाच दिशेने व्हावी. दोन वादक आपल्या एकेका हातात दोन-दोन घंट्यांच्या दोऱ्या ठेवून वादन करितात.
भारतात नाट्यशास्त्राच्या कालापासून घंट्यांचे उल्लेख सापडतात, पण यापलीकडे वाद्य म्हणून संगीतांत त्याचा व्यापक प्रमाणावर उपयोग झालेला दिसत नाही.
कानडे, गो. चिं.; जोशी, चंद्रहास; रानडे, अशोक