ग्लेसर, डॉनल्ड आर्थर : (२१ सप्टेंबर १९२६–   ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९६० सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म क्लीव्हलँड, ओहायओ येथे झाला आणि शिक्षण केस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे झाले. १९५० साली त्यांनी पीएच्.डी. पदवी मिळविली. प्रथमतः ते मिशिगन विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक होते (१९४९–५९) व नंतर १९५९ पासून कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. १९६१ मध्ये त्यांनी डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठात सूक्ष्मजीवविज्ञानासंबंधी अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात रेणवीय जीवविज्ञानात भौतिकीच्या पद्धतींचा उपयोग करण्यासंबंधी संशोधन सुरू केले.

मूलकणांच्या अभिज्ञानासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी) ‘बुद्‌बुद्‌ कोठी’ या उपकरणाचा त्यांनी १९५२ मध्ये शोध लावला. या उपकरणात नंतर काही सुधारणा करण्यात आल्या व आता अणुकेंद्रीय भौतिकीतील संशोधनाचे ते प्रमुख उपकरण ठरले आहे. या उपकरणाच्या साहाय्याने उच्च ऊर्जा अणुकेंद्रीय विक्रियांसंबंधीची माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली असून अनेक नव्या मूलकणांचा शोध लागण्यास या उपकरणाची बहुमोल मदत झालेली आहे [⟶ कण अभिज्ञातक मूलकण] .

बुद्‌बुद्‌ कोठीच्या शोधाकरिता त्यांना नोबेल पारितोषिक, हेन्री रसेल पारितोषिक (१९५५), बॉईज पारितोषिक (१९५८) व इतर अनेक सन्मान देण्यात आले. १९६२ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली. त्याशिवाय ते अमेरिकन फिजिकल सोसायटी व इतर अनेक शास्त्रीय संस्थांचे सन्माननीय सदस्य आहेत. बुद्‌बुद्‌ कोठीच्या साहाय्याने त्यांनी केलेले प्रयोग व मूलकण यांसंबंधी त्यांनी अनेक निबंध विविध शास्त्रीय नियतकालिकांतून लिहिले आहेत.

भदे, व. ग.