ग्लायकोसाइडे : शर्करादींच्या अनुजातांचा (रसायनिक विक्रियांनी बनविलेल्या संयुगांचा) एक वर्ग. शर्करादींच्या वलयी संरचनांमध्ये जो हेमिॲसिटल हायड्रॉक्सी गट असतो (खालील सूत्र पहावे) त्यातील हायड्रोजनाच्या जागी तो गट येण्याने) हे अनुजात बनतात. उदाहरणादाखल ग्लुकोज घेऊन त्याच्या पायरॅनोज संरचनेतील [→ ग्लुकोज व फ्रुक्टोज] हेमिॲसिटल हायड्रॉक्सी गट व त्यापासून बनणारे ग्लायकोसाइड खाली दाखविले आहे.
ग्लायकोसाइडाचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे पाडणे ) केल्यास मूळ शर्करादी घटक व शर्करेतर संयुगे मिळतात. या शर्करेतर संयुगाला अग्लायकोन म्हणतात. ते ॲलिफॅटिक (कार्बन अणूंची वलयी संरचना नसलेल्या), ॲरोमॅटिक (कार्बन अणूंची वलयी संरचना असलेल्या), हायड्रोॲरोमॅटिक किंवा विषमवलयी (एक किंवा अधिक वलयांचे बनलेल्या आणि त्यांतील काही वलयांत भिन्न मूलद्रव्ये असलेल्या) संयुग वर्गातील असू शकतात.
ग्लायकोसाइड ही संज्ञा वर्गवाचक असून तीमध्ये ग्लुकोजापासून बनलेली ग्लुकोसाइडे, फ्रुक्टोजापासून झालेली फ्रुक्टोसाइडे, मॅनोजापासून मिळणारी मॅनोसाइडे इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आल्डोजांपासून बनलेल्या ग्लायकोसाइडांना आल्डोसाइडे आणि कीटोजांपासून बनलेल्यांना कीटोसाइडे म्हणतात. ग्लायकोसाइडांचे त्यांच्या रेणवीय संरचनेनुसार (रेणूतील अणूंच्या मांडणीनुसार) आल्फा व बीटा असेही वर्गीकरण करतात.
ग्लायकोसाइडे वनस्पतींची मुळे, साली, फळे, फुले, रंगीत पाने यांत व प्राण्यांच्या मेंदूंच्या ऊतकांत (समान रचना आणि कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत), तंत्रिका तंतूंत (मज्जातंतूत) आणि मूत्रात आढळतात. अनेक फळांचे व फुलांचे रंग रंजक द्रव्ये, स्वादयुक्त व सुगंधी द्रव्ये, औषधी व विषारी द्रव्ये सामान्यतः ग्लायकोसाइडांच्या रूपात निसर्गात अस्तित्वात असतात.
वनस्पती ग्लायकोसाइडाच्या रूपाने शर्करादींचा साठा करतात. एखादे द्रव्य निरुपयोगी किंवा बाधक असेल, तर त्याचे ग्लायकोसाइड बनवून दूर करतात अथवा एखादे आवश्यक द्रव्य टिकणारे नसेल, तर ग्लायकोसाइडात त्याचे रूपांतर करून टिकवितात. कित्येक द्रव्ये ग्लायकोसाइडांच्या रूपाने विद्राव्य (विरघळणारी) बनतात.
प्रत्यक्ष शर्करादींऐवजी त्यापासून बनणारी आल्डिहाइडी अम्लेही (यूरॉनिक अम्ले) अशा तऱ्हेची संयुगे बनवू शकतात. त्यांचा समावेशही याच वर्गात केला जातो. त्यांचा उल्लेख त्यातील अम्लानुसार (ग्लुकुरॉनिक अम्ले), गॅलॅक्ट्युरॉनाइडे (गॅलॅक्ट्युरॉनिक अम्ल) इ. संज्ञांनी केला जातो. प्राण्यांच्या शरीरात तयार होणारी अनावश्यक फिनॉले व अल्कोहॉले ग्लुकुरॉनाइडांच्या रूपाने मूत्रातून बाहेर टाकली जातात.
नैसर्गिक पदार्थापासून ग्लायकोसाइडे वेगळी काढण्यासाठी त्या नैसर्गिक पदार्थाचे अल्कोहॉल किंवा पाणी यांनी निष्कर्षण (विद्राव तयार करून अलग करणे) करतात व निष्कर्षापासून ती स्फटिकरूपाने मिळवितात. ग्लायकोसाइडांचे जलीय विच्छेदन करणारी एंझाइमेही (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी प्रथिनयुक्त संयुगेही) नैसर्गिक पदार्थात उपस्थित असतात. त्यांचा परिणाम होऊ नये म्हणून निष्कर्षण करताना काळजी घ्यावी लागते.
सामान्यतः ग्लायकोसाइडे स्फटिकरूप व जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी) असतात. ती ॲसिटल वर्गातील असल्यामुळे ॲसिटलांचे विशिष्ट गुणधर्म दाखवितात. उदा., ती फेलिंग विद्रावाचे ⇨क्षपण करीत नाहीत. तसेच त्यांचे प्रकाशीय वलनांतर (एकाच पातळीत कंप पावणाऱ्या म्हणजे ध्रुवीय प्रकाशाची पातळी फिरविण्याच्या गुणधर्मात कालावधीनुसार फरक पडणे) होत नाही. क्षारीय (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या, अल्कलाइन) विद्रावांचा त्यांच्यावर सामान्यतः परिणाम होत नाही. परंतु उष्ण व विरल अम्लांच्या योगाने त्यांचे जलीय विच्छेदन होते व शर्करादी संयुग आणि शर्करेतर संयुग (अग्लायकोन) वेगळे होतात.
एंझाइमांच्या योगानेही जलीय विच्छेदन होते परंतु त्यांच्या विक्रिया ग्लायकोसाइडांच्या संरचनांवर अवलंबून असतात. उदा., माल्टेज या एंझाइमाने फक्त आल्फा ग्लायकोसाइडांचेच आणि इमल्सिनामुळे बीटा ग्लायकोसाइडांचेच जलीय विच्छेदन घडते.
ग्लायकोसाइडांचे संश्लेषण (रासायनिक विक्रियांनी कृत्रिम रीत्या तयार करणे) करण्याकरिता संबंधित शर्करादी संयुग व इष्ट अल्कोहॉल (किंवा फिनॉल) यांचे मिश्रण हायड्रोक्लोरिक अम्ल या उत्प्रेरकाच्या (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थाच्या) सान्निध्यात तापवितात किंवा त्या शर्करादी संयुगाचे ॲसिटल हॅलाइडात (उदा., टेट्राॲसिटिल आल्फा D – ग्लुकोसिल ब्रोमाइड) रूपांतर करून व त्यामध्ये अल्कोहॉल अथवा फिनॉल मिसळून चांदीचे लवण किंवा नायट्रोजनी क्षारक या उत्प्रेरकांच्या सान्निध्यात मिश्रण तापविले, तर ग्लायकोसाइडे सुलभतेने बनतात. ही दुसरी पद्धत जास्त रूढ आहे.
निसर्गात ग्लुकोजापासून बनलेली ग्लायकोसाइडे बहुसंख्य आहेत. त्यांना ⇨ग्लुकोसाइडे म्हणतात. मॅनोसाइडे व फ्रुक्टोसाइडे क्वचित आढळतात. डेसॉक्सिहेक्झोजांपासून बनलेली, उदा., ऱ्हॅम्नोसाइडे व फ्यूकोसाइडेही ज्ञात आहेत. केशरात असलेले क्रॉसीन हे ग्लायकोसाइड क्रॉसेटीन हे द्विक्षारीय अम्ल आणि जेन्शियोबायोज यांच्या संयोगाने बनलेले आहे. ते वनस्पतींच्या लैंगिक ⇨हॉर्मोनांच्या वर्गात पडते. जीवनसत्त्व अ आणि कॅरोटीन [→ कॅरोटिनॉइडे ] यांच्या वनस्पतीतील चयापचयाशी (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींशी) याचा संबंध असावा.
हृदयक्रियाउत्तेजक म्हणून वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाची हृदयास बल देणारी ग्लायकोसाइडे डिजिटॅलीस या वनस्पतीपासून मिळतात. त्यांच्या घटनेत डी-ऑक्सि-शर्करांचे एक वा अधिक गट शर्करागटांना (सामान्यतः ग्लुकोजाला) जोडलेले असून त्या संयुक्त गटाचा स्टेरॉइड वर्गाच्या अग्लायकोनाशी पुढे दाखविल्याप्रमाणे संयोग झालेला असतो : [(ग्लुकोज)क्ष –(डी-ऑक्सिशर्करा)य] – अग्लायकोन.
काही वनस्पतींमध्ये सॅपोनीन नावाची ग्लायकोसाइडे असतात. त्यांच्या अंगी पाण्याबरोबर फेस देण्याचा गुण असतो. त्यांपैकी कित्येक रक्तात भिनल्यास विषारी असतात पण पोटात घेतल्यास मनुष्यास अपाय करीत नाहीत. त्यामुळे मत्स्यविषे म्हणून ती वापरीत असत. त्यांचे दोन वर्ग पडतात. (१) उदासीन सॅपोनिने : यांच्या घटनेत सायक्लोपेंटॅनोपरहायड्रोफेनँथ्रिनांशी संबंधित असे गट व (२) अम्लीय सॅपोनिने : यामध्ये ट्रायटर्पिनॉइडाशी संबंधित गट शर्करादींशी जोडलेले असतात [→ सॅपोनिने].
सेरिब्रोसाइड नावाने ओळखली जाणारी ग्लायकोसाइडे गॅलॅक्टोज किंवा ग्लुकोज शर्करा, एक नायट्रोजनयुक्त क्षारक आणि वसाम्ल यांच्या संयोगाने बनलेली असतात.
गँग्लिओसाइडांच्या रेणूंत अनेक शर्करांचे गट असतात. त्यांत पुष्कळदा ॲमिनो शर्करांचाही समावेश असतो.
स्ट्रेप्टोमायसीन हे प्रतिजैव (अँटिबायॉटिक) एक जटिल ग्लायकोसाइड आहे [→ प्रतिजैव पदार्थ].
दोन अथवा अधिक शर्करागट ग्लायकोसाइडी बंधांनी जोडले गेल्याने डायसॅकॅराइड व पॉलिसॅकॅराइड वर्गांतील संयुगे बनतात.रासायनिक दृष्ट्या ही संयुगे म्हणजे शर्करागट अग्लायकोन असलेली ग्लायकोसाइडेच होत.
पहा : कार्बोहायड्रेटे.
संदर्भ : 1. McIlroy, R. J. The Plant Glycosides, London, 1950.
2. Pigman, W. W. Geopp, R. M. Jr. Chemistry of Glycosides, New York, 1948
केळकर, गो. रा.
“