ग्रेशमचा नियम : ‘वाईट नाणी चांगल्या नाण्यांना विनिमय व्यवहारात बाजूस सारतात’ हा ग्रेशमचा नियम, असे मानले जाते. वास्तविक शब्दशः हा त्याचा नियम नव्हे तो त्याच्या नावावर १८५७ साली हेन्रीन मॅकलाउड ह्याने लादला.
सर टॉमस ग्रेशम (१५१९–७९) हा एलिझाबेथ राणीच्या काळातील उलाढाल्या व्यापारी आणि रॉयल एक्स्चेंजचा संस्थापक. द्विधातुक चलनपरिणाम असताना त्याचे परिणाम काय होतात, ह्यासंबंधी त्याने आपले मत असे व्यक्त केले : जेव्हा नाण्यांची धिकृत मूल्ये सारखीच असतील आणि त्यांची अंतर्गत धातुमूल्ये असमान असतील, तेव्हा कमी अंतर्गत मूल्य असलेले नाणेच बाजारात खेळते राहते व जास्त मूल्य असलेले नाणे हे साठवले जाते, औद्योगिक भांडवलात वापरले जाते वा परदेशी निर्यात केले जाते.
उदाहरणार्थ, एका देशात सोने व चांदी ह्या दोन्ही धातूंचा उपयोग नाणी पाडण्याकरिता होत असेल व सोन्याची एक मोहोर बरोबर कलदार चांदीचे पंधरा रुपये असे त्यांचे वटवण्याचे परस्परप्रमाण असेल, तर ही झाली दोहोंची कायद्याने ठरविलेली मूल्ये. प्रत्यक्षात सोने, चांदी इ. धातूंचे दर त्यांच्या मागणी-पुरवठ्याप्रमाणे सतत बदलत असतात. उदा., सोने व चांदी ह्यांतील विनिमय-दर १ : १५ ह्या प्रमाणात असताना, चांदीचा भाव काही कारणाने घसरला, तर हे प्रमाण १ : १६ वा त्यापेक्षा जास्त रुपये असे होईल. अशा वेळी लोक पंधरा रुपये देऊन त्याची वट्ट मोहोर करून स्वतःजवळ ठेवतील. ह्या सार्वत्रिक प्रवृत्तीमुळे सोन्याची नाणी दुर्मीळ होतील व चांदीच्या नाण्यांचा सर्रास वापर विनिमयात होत राहील.
अलीकडचे सोपे उदाहरण म्हणजे एक पैशाच्या तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या नाण्याचे. तांब्याचा भाव ॲल्युमिनियमपेक्षा जास्त झाल्याने लोकांनी तांब्याचे नवे पैसे मोडीत टाकून त्याचे त्याच्या मुद्रित किमतीपेक्षा जास्त पैसे केले आणि चलनात ॲल्युमिनियमचे पैसेच शिल्लक राहिले.
ग्रेशमचा नियम हा पर्यायतेच्या तत्त्वावर आधारलेला आहे. दोन वस्तू – एक उत्कृष्ट व दुसरी निकृष्ट – एकाच किमतीत मिळत असतील, तर उत्कृष्ट वस्तू संग्रहित करावयाची, ही ह्या नियमामागची मानवी प्रेरणा आहे.
परचुरे, कमलाकर