गोडबोले, रघुनाथ भास्कर : (?–जुलै १८८७). मराठीतील एक आद्य कोशकार. जन्म वाई येथे. काही काळ लष्करात आणि शाळाखात्यात नोकरी. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश (१८७६) आणि भरतखंडाचा अर्वाचीन कोश (१८८१) हे त्यांचे विशेष महत्त्वाचे कोश. भरतवर्षातील व्यक्ती आणि स्थळे ह्यांची साधार माहिती पहिल्या कोशात आलेली असून दुसऱ्या कोशात भरतवर्षामध्ये ‘युधिष्ठिरशकाच्या आरंभापासून आजपावेतो’ जे जे नामांकित पुरुष होऊन गेले, त्या सर्वांची चरित्रे शक्य तेवढी शकमितीवार देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कुरुयुद्ध ही प्राचीन व अर्वाचीन काळांना विभागणारी रेषा होय, असे ते मानतात तसेच भरतखंडाची त्यांना अभिप्रेत असलेली व्याप्ती हिंदुस्थानाच्या नऊपट आहे. ह्या दोन कोशांनी मराठीतील चरित्रकोशांचा पाया घातला, असे म्हणता येईल.

प्राचीन मराठी कवितेतील कठीण आणि निवडक शब्दांचा अर्थ देण्यासाठी त्यांनी हंसकोशाची रचना केली (१८६३), तसेच मराठी भाषेचा एक नवीन, सुटसुटीत कोशही रचिला (१८७०). त्यांच्या कोशरचनेवरून त्यांच्या गाढ्या विद्याव्यासंगाची उत्तम कल्पना येऊ शकते. त्यांनी विविध कोशांना जोडलेल्या इंग्रजी प्रस्तावना पाहिल्यास त्या भाषेचे चांगले ज्ञान त्यांनी संपादन केले होते, असे दिसते. विवेकसिंधु  आणि ज्ञानदेवगाथा  ह्यांचे त्यांनी संपादन केले. 

कुलकर्णी, अ. र.