गीबेर्ती, लोरेंत्सो : (? १३७८—१ डिसेंबर १४५५). इटालियन मूर्तिकार, चित्रकार, सुवर्णकार व वास्तुरचनाकार. फ्लॉरेन्स येथे जन्म. १४०१ पासून त्याची फ्लॉरेन्स येथील बाप्तिस्मागृहासाठी ब्राँझची द्वारे

'सेल्फ-पोर्ट्रेट', द गेट्‌स ऑफ पॅरडाइज फ्लॉरेन्स.

घडविण्याच्या कार्यात नियुक्ती करण्यात आली. ह्यांपैकी दोन द्वारांवर बायबलमधील इसाकच्या आत्मार्पणाची कथा शिल्पांकित केलेली आहे. दुसरी दोन द्वारे — ‘द गेट्स ऑफ पॅरडाइज, — घडविण्यासाठी त्याने आयुष्याची बरीच वर्षे व्यतीत केली (१४२५—५२). ह्या दरवाज्यांच्या दहा आयताकृती चौकटींमध्ये जुन्या करारातील सदतीस दृश्यांचे चित्रण केले आहे. सेंट स्टीव्हेन, सेंट मॅथ्यू व सेंट जॉन द बॅप्टिस्ट ह्यांचे भव्य ब्राँझ पुतळे घडविण्यासाठी गीबेर्तीची नेमणूक करण्यात आली होती. फ्लॉरेन्सच्या कॅथीड्रलचा घुमट उभारण्यासाठी श्रेष्ठ वास्तुकार ब्रूनेल्लेस्कीबरोबर त्याने काम केले. गीबेर्तीची कार्यशाळा म्हणजे तत्कालीन तरुण कलावंतांचे प्रशिक्षण केंद्र होते. गॉथिक कलेतील तपशिलांचा हव्यास गीबेर्तीच्या कलानिर्मितीत दिसत असला, तरी सुसंवाद व समतोल ही प्रबोधनकालीन कलेची गुणवैशिष्ट्येही तीत दिसून येतात. Commentarii  हा त्याचा आत्मचरित्रपर ग्रंथ आरंभीच्या प्रबोधनकालीन कलेचा एक प्रमुख संदर्भ ग्रंथ मानला जातो. फ्लॉरेन्स येथे त्याचे निधन झाले.

 मेहता, कुमुद (इं) इनामदार, श्री. दे. (म.)       “