चिनी व जपानी रेखनतंत्र : परंपरेनुसार चिनी व जपानी रेखांकन व रंगकला यांत एकरूपता  आहे. चिनी-जपानी चित्रकलेत ह्या दोन्हींचा उपयोग संमिश्र रीतीने केलेला आढळतो. या पद्धतीस ‘ह्यू’ (Hua) अशी संज्ञा आहे. चिनी व जपानी रेखनात शाईचा वापर प्राधान्याने  केला जातो. प्रथम लेखणीने ढोबळ रेखन करून त्याचे पक्के रेखन नंतर करावयाचे, अशी पद्धत चीन व जपान मध्ये नाही. तेथील कलावंत कुंचल्याने सरळ रेखन करीत जातो आणि तेच अंतिम रेखन असते. स्वतःचे समाधान होईपर्यंत पुनःपुन्हा रेखन करीत राहणे ही या कलावंताची प्रवृत्ती. चिनी व जपानी रेखनपद्धती समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांच्या भाषेतील लेखन अक्षरलिपीने होत नाही, तर चित्रलिपीनेच होते. त्यामुळे प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीला चित्रलिपीचे बाळकडू प्राथमिक शिक्षणापासूनच मिळते. अगदी तरल नाजूक रेषा आणि जाड, ठाशीव फटकारे देत रेषा व आकार घडविण्याच्या अनेक तंत्रामध्ये चीनी व जपानी कलावंत पारंगत असतो. रेखनाच्या प्रभावामुळे रेषेहून रंगाचे वेगळे भानही उरत नाही.

चिनी कुंचल्याचा निरनिराळ्या पद्धतींनी उपयोग करून जे रेखांकन केले जाते. त्याचे मुख्य दोन प्रकार आहेत : एक म्हणजे प्राचीन वास्तववादी पद्धतीत कुंचल्याद्वारा वस्तूंचे रेखांकन समान जाडी असलेल्या रेषेद्वारा केलेले आहे. व सर्व परिणाम केवळ रेषेद्वाराच साधलेले आहेत. रेखांकनाची दुसरी पद्धत म्हणजे सुलेखन तंत्र ही होय. ह्या पद्धतीचा विकास इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाला. कुंचल्यावरील प्रभुत्वामुळे त्याच्या फटकाऱ्यात मृदूपणा आला व समान जाडीच्या रेषेच्या जागी, विविध प्रकारच्या रेषांनी मंत्रमुग्ध करणारे आविष्कार निर्माण होऊ लागले. नंतरच्या काळात ह्या दोन्ही पद्धतीचा संमिश्र रीतीने उपयोग होऊ लागला. जपानी रेखांकनातही कुंचल्यावरील प्रभुत्व आणि काळ्या शाईच्या माध्यमातून रेषेद्वारा वस्तूंचे चित्रण करणे, हा मुख्य विशेष आहे. ह्या रेखणाचे चार प्रकार आहेत. (१) केवळ शाईच्या (Sum) माध्यमातून रेषेद्वारा वस्तूंचे रेखांकन करणे, हे रेखांकन स्केच स्वरूपाचे असते. उदा., बुद्धचित्रे. (२) शिता-ई (Shita-e) रेषेद्वारा चित्राची पूर्वतयारी म्हणून रेखांकन करणे. (३) काकीओ-कोशी (Kakio-Koshi) : कलाकृतीत प्रथम केलेल्या रेखांकनास रंग दिल्यानंतर परत रेखांकन करून ती प्रभावी करणे. (४) शेम-ई (Shem-e) :  शाईच्या माध्यमातून तरल किंवा जाड रेषेद्वारा छायाप्रकाशाचे परिणाम दाखविणे. जपानी चित्रकलेत रेखांकनाचा उपयोग केवळ वस्तूंचे बाह्य स्वरूप दाखविण्याकरिताच केलेला नसून, त्याद्वारा रंगांचे आभाससुद्धा निर्माण केलेले आहेत. एकोणिसाव्या शतकानंतर जपानी रेखांकनासाठी पेन्सिल, चारकोल, ग्रॅनाइट इत्यादींचा उपयोग होऊ लागला.        

करंजकर, वा. व्यं.